फ्रान्स वरचढ; क्रोएशिया लढाईसाठी सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 03:46 AM2018-07-15T03:46:31+5:302018-07-15T03:49:39+5:30

एखाद्या अंतिम लढतीचे भाकीत किंवा अंदाज वर्तविणे हे तसे धोक्याचेच! बाहेरच्यांचे सोडा; पण आपल्या शक्तिस्थानांची आणि कमकुवत दुव्यांची पूर्ण कल्पना असलेले दोन्ही स्पर्धकही केव्हाच आश्वस्त असत नाहीत.

France; Croatia ready for battle! | फ्रान्स वरचढ; क्रोएशिया लढाईसाठी सज्ज!

फ्रान्स वरचढ; क्रोएशिया लढाईसाठी सज्ज!

Next

- रणजीत दळवी
एखाद्या अंतिम लढतीचे भाकीत किंवा अंदाज वर्तविणे हे तसे धोक्याचेच! बाहेरच्यांचे सोडा; पण आपल्या शक्तिस्थानांची आणि कमकुवत दुव्यांची पूर्ण कल्पना असलेले दोन्ही स्पर्धकही केव्हाच आश्वस्त असत नाहीत.
तर मग कोण जिंकणार, फ्रान्स की क्रोएशिया? आपण सध्याचा फॉर्म, प्रदर्शन आणि गुणवत्तेचा विचार केला तर फ्रान्सची बाजू बऱ्यापैकी वरचढ दिसते; पण क्रोएशिया शेवटच्या श्वासापर्यंत लढेल, याची खात्री असू द्या! याआधीच्या तीन लढतींमध्ये त्यांना घाम गाळताना आणि रक्त आटविताना आपण पाहिले आहे. ज्यादा वेळ आणि शूटआऊटमध्ये जिंकताना आपण त्यांचा दृढनिर्धार अनुभवला आहे. तरीही, दमछाक हा घटक महत्त्वाचा ठरेल!
फ्रान्ससारख्या तरुण संघाला एका दिवसाची अधिक विश्रांती मिळाली आहे, हे येथे विचारात घ्यायला हवे. त्याउलट, क्रोएशियाचे बहुतांश खेळाडू तिशीकडे झुकलेले व काही त्यापलीकडले आहेत. एकूण, फ्रान्स खेळाच्या सर्व विभागांमध्ये बºयापैकी सरस आहे.
क्रोएशियाला त्यांची कमकुवत बचावफळी मुख्य डोकेदुखी ठरावी. डेयान लॉव्हरेन आणि बºयाच वेळा चुका करणारा डॉमागोज व्हिडा यांना सांभाळण्याची जबाबदारी गोलरक्षक डॅनियेल सुबासीचवर असेल. फ्रान्सच्या वेगवान फॉरवर्डला मिळणारे थ्रू पासेस विफल ठरविण्यासाठी सुबासीचला चक्क स्वीपरची भूमिका बजवावी लागेल. इव्हान स्ट्रिनीच आणि सिमे व्रयालको या विंग-बॅक्सनाही आपल्या आक्रमणांना मुरड घालून बचावावरच भर द्यावा लागेल. बचावफळीला अभेद्य राखण्याची मोठी जबाबदारी मार्सेलो ब्रॉझोवीचला पार पाडावी लागेल.
फ्रान्सला विजेतेपदावर कब्जा करण्यासाठी सामन्यात प्रथम ‘स्कोअर’ करणे आवश्यक आहे, तेही लवकर! पण, त्यानंतर इंग्लंडसारखी आघाडी राखण्यात धन्यता न मानता लढतीचा निकाल लावून टाकावा लागेल. कारण, क्रोएशियाने आपण विपरीत स्थितीतून बाहेर पडताना फासे उलटवू शकतो हे नाही का सिद्ध केले? त्या दिवशी एका निरर्थक व लक्ष्यहीन पूर्वार्धानंतर ल्युका मॉड्रीच, इव्हान रॅकिटीच आणि इव्हान पेरिसीचने इंग्लंडला लोळविले, हे फ्रान्सला ठाऊक आहे; पण फ्रान्स मध्यक्षेत्रात अधिक प्रबळ आहे. त्यात पॉल पॉग्बा हा महत्त्वाचा दुवा आहे. त्याला एनगोलो कॉँटे या छोट्या, पण धडपड्या खेळाडूची भक्कम साथ आहे. शिवाय, ब्लेझ मॅटुइडी हा कुशल व चलाख ‘बॉल प्लेअर’ही या दोघांच्या दिमतीला आहे.
सॅम्युएल उमटिटी आणि राफाएल व्हराने यांनी केलेले ते गोल त्यांचा आत्मविश्वास गगनाएवढा उंचावला असून त्यांचा बचाव भेदणारे आक्रमक क्रोएशियापाशी उपलब्ध नाहीत. मारिओ मॅँडझुकीचच्या फिटनेसची ग्वाही या वेळी दिली जाऊ शकत नाही आणि अंते रेबीच त्या दर्जाचा नाही. बेंजामिन पावार्ड आणि ल्युकास हर्नांडेझ हे विशीत नुकतेच आलेले विंग-बॅक झटकन आक्रमणांमध्ये सामील होतात, ही क्रोएशियासाठी धोक्याची घंटा निश्चित आहे.
अखेर सर्व काही अवलंबून असेल, ल्युका मॉड्रीच आणि अंतोआॅँ ग्रिझमन या म्होरक्यांवर! ल्युकाला त्याच्या साथीदारांकडून सर्वतोपरी साह्य आवश्यक आहे, तर ग्रिझमनला आपला संघ उजवा आहे, याची पूरेपूर कल्पना असल्याने तो मोकळेपणाने खेळू शकेल. त्याच्यावर तुलनेने कमी दबाव असेल. शिवाय, त्याची शत्रूचे नुकसान करण्याची क्षमता अधिक आहे.
फ्रान्सने यापूर्वी दोनदा येथवर मजल मारली असून त्यांनी १९९८मध्ये विजेतेपदाला गवसणी घातली होती. त्या संघामध्ये महत्त्वाचा घटक असलेले डिडिएर डिशॉँ हे त्यांचे आता प्रशिक्षक आहेत. तेव्हा नेमके काय करावे लागते, हा मोलाचा कानमंत्र त्यांनी आपल्या खेळाडूंना दिला असणार. १९९८मध्ये स्पर्धेत पदार्पण केल्यानंतर एवढी मजल क्रोएशियाने मारली, हे लक्षणीय आहे; पण याआधी विघटनपूर्व युगोस्लाव्हियामध्ये फुटबॉलची पाळेमुळे भक्कम करण्यात त्यांच्या प्रदेशाचे मोठे योगदान आहे. जवळजवळ शतकभराचे! १९९१मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर जी यादवी उफाळली, त्याचे चटके या संघातील खेळाडूंना बसले आहेत. ते व्रण अर्थातच भरून न येणारे! तेव्हा अशा आपल्या अनेक देशवासीयांना विश्वविजेतेपदाची अमूल्य भेट देण्यासाठी ते हरतºहेने प्रयत्नशील असतील!

Web Title: France; Croatia ready for battle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.