मिलान - फुटबॉलच्या मैदानात काल एक धक्कादायक निकाल नोंदवला गेला. 2018 साठीच्या फिफा फुटबॉल विश्वचषक पात्रता स्पर्धेत स्वीडनसोबतची लढत गोलशून्य बरोबरीत सुटल्याने चार वेळचा विश्वविजेता असलेल्या इटलीचे फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. तर स्वीडनने 2006 नंतर प्रथमच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात यशस्वी झाला आहे. 
चार वेळा फिफा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या इटलीच्या संघाला गेल्या 60 वर्षांत प्रथमच विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात अपयश आले आहे.स्टॉकहोम येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात इटलीला स्वीडनकडून 1-0 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी इटलीला स्वीडनवर विजय मिळवणे आवश्यक होते. त्या सामन्यात स्वीडनचा फुटबॉलपटू जेकब योहानन याने 61 व्या मिनिटाला गोल करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. 
दरम्यान, सोमवारी झालेल्या लढतीतही दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. पण या सामन्यात गोल करण्यात दोन्हीकडे खेळाडू अपयशी ठरले. त्यामुळे अखेरीस ही लढत गोलशून्य बरोबरीत समाप्त झाली. सामना संपल्याची घोषणा होताच निराश इटलीच्या खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आले. तर दीर्घकाळानंतर विश्वचषकासाठी पात्र ठरल्याने स्वीडनच्या खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा सुरू केला. 
हा सामना पाहण्यासाठी इटलीचे पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित होते. चार वेळा विश्वचषक जिंकणारा इटलीचा संघ या सामन्यात सहज बाजी मारेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र त्यांचाही हिरमोड झाला. याआधी 1958 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात इटलीला अपयश आले होते. आतापर्यंत केवळ तीन वेळा इटलीला विश्वचषक स्पर्धेत खेळता आलेले नाही. 1930 साली जेव्हा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पहिल्यांदा खेळवली गेली होती तेव्हा इटलीच्या संघाने त्या स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता.