FIFA Football World Cup 2018 : जर्मनी जिंकली; पात्रतेची गुंतागुंत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:14 AM2018-06-25T02:14:14+5:302018-06-25T02:15:01+5:30

जर्मनीच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित अवश्य केल्या आहेत; पण त्यासाठी त्यांना कोरियावर मात तर करावीच लागेल

FIFA Football World Cup 2018: Germany wins; Eligibility complications persist | FIFA Football World Cup 2018 : जर्मनी जिंकली; पात्रतेची गुंतागुंत कायम

FIFA Football World Cup 2018 : जर्मनी जिंकली; पात्रतेची गुंतागुंत कायम

Next

रणजित दळवी
मृत्यूशय्येवर शेवटचे काही श्वास घेणाऱ्या गतविजेत्या जर्मनीला तारले शेवटी त्यानेच! म्हणजे त्यांना मृत्यूच्या खाईत लोटणाºया टोनी क्रूसने. त्यानेच तो इंज्युरी टाईममधील गोल करून जर्मनीच्या शरीरात प्राण फुंकले. कदाचित हा त्याच्या आयुष्यातील फार मोठा क्षण ठरावा. त्याने जर्मनीच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित अवश्य केल्या आहेत; पण त्यासाठी त्यांना कोरियावर मात तर करावीच लागेल आणि त्याचबरोबर स्वीडन-मेक्सिको लढतीचा निकाल काय लागतो, हेही पाहावे लागेल. मात्र मध्यक्षेत्रात टोनी क्रूसची ती जीवघेणी चूक महागात पडली नाही, याबद्दल विधात्याचे आभारही मानावेत. टॉईव्होनेनचा तो गोल त्यांच्या गळ्यातले हाड नव्हता का बनला?
जर्मनीचा हा विजय अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेला. जेरोम बोआटेंगने विनाकारण दुसºया पिवळ्या कार्डची आफत ओढवून घेतली आणि जवळजवळ पंधरा मिनिटे जर्मनीला दहा जणांनिशी खेळावे लागले. या गटातून अजून एकाही संघाचे भवितव्य निश्चित झालेले नाही. सर्वांना संधी आहे. स्वीडन, जर्मनी आणि मेक्सिको शेवटच्या लढतींच्या अंती सहा-सहा गुणांनिशी ‘टाय’ होऊ शकतात. येथे मग गोलफरक विचारात घेतला जाईल आणि समजा, जर्मनी आणि स्वीडन यांना हार पत्करावी लागली तर? आहे ना गुंतागुंत?
जर्मनीचे प्रशिक्षक जोअकिम लो यांनी मेसुट ओझिलला बाकावर बसवून आपणच ‘बॉस’ आहोत हे सिद्ध केले. ओझिलने गटबाजीला खतपाणी घातल्याच्या अफवा पसरल्या होत्या, तेव्हा लो यांनी मुळावरच घाव घातला व मोठ्या संघर्षानंतर का होईना, त्यांचे आव्हान जिवंत राहिले. हा विजय जर्मनीचे मनोबल चांगलेच उंचावेल. विजेतेपदाच्या शर्यतीतील इतरांना हा मोठा इशारा आहे!
स्वीडिश गोलवर सुरुवातीलाच एखाद्या आग्या मोहोळासारखा हल्लाबोल जर्मनीने केला व आपला इरादा दाखविला. ड्रॅक्सलर, किम्मीच, क्रूस, बोआटेंग, म्युलर यांनी प्रचंड दबाव टाकला, पण थोडी सदोष नेमबाजी आणि प्रतिस्पर्ध्यांच्या भिंतीला पाठ लावून बचाव यामुळे तो दबाव कमी होत गेला. त्यात एका अपघातामुळे रुडीचे नाक फुटले व त्यातून प्रचंड रक्तस्राव झाला. जवळजवळ पाच मिनिटे त्याच्या जागी बदली खेळाडू न आणल्याने स्वीडनला जर्मनीची खेळावरील मगरमिठी ढिली करण्यात यश आले.
त्याआधीच त्यांच्यावरील पेनल्टीचे संकट टळले होते. स्वीडनच्या बर्गला बोआटेंगने पाठीत कोपर खुपसून खाली पाडले. बर्ग त्यावेळी गोल प्रयत्न करण्याच्या बेतात होता. पण अचानक झालेल्या प्रतिहल्ल्यामुळे त्या प्रसंगापासून ३०-३५ मीटर दूर असलेले पोलिश रेफरी झिमॉन मार्सिनिअ‍ॅक यांनी व्हिडीओची मदत का घेतली नाही? तेवढ्या अंतरावरून नेमके काय झाले, याचे अनुमान बांधता येते? आणि तेही जेव्हा आक्रमकाची पाठ, बचावपटूमुळे
दिसू शकत नाही तेव्हा? याचे उत्तर
आहे चक्क नाही! व्हिडीओ रेफरल उपलब्ध असताना ते का घेऊ नये? निर्णयामधील संदिग्धता, संशय दूर करण्यासाठीच तर ही योजना करण्यात आली!
मारिओ गोमेझ आणि ज्युलियन ब्रँइट (८७ वे मिनिट) यांना उतरवून जर्मनीला फारसे काही साधले नाही. उंचापुरा बचावपटू आंद्रे ग्रॅनक्सिस्ट आणि अनुभवी गोलरक्षक रॉबिन ओलसन यांनी बजदरस्त बचाव केला. शेवटी बदली दुरमाझने जर्मनीच्या वेर्नरला शेवटच्या मिनिटात पाडले व स्वीडनचा घात झाला. टोनी क्रूसने मोठ्या हुशारीने ती दोन माणसांची भिंत हलेल हे पाहिले व तितक्याच कौशल्याने विजयी गोल डागला.
या लढतीच्या आधी बेल्जियमने ट्युनिशियाविरुद्ध सराव सामना खेळत आहोत, या थाटात मोठा विजय मिळविला. आपली गोल करणारी यंत्रणा किती सक्षम आहे, ते त्यांनी दाखविलेच; पण आम्हीही शर्यतीतले मोठे स्पर्धक आहोत, हेही सहजपणे सिद्ध केले. प्रतिस्पर्ध्यांच्या गोलवर २२ हल्ले आणि डझनभर अचूक फटके यातच त्यांची दाहकता दिसली. इंग्लिश प्रीमिअर साखळीतले डझनभर खेळाडू, त्यात एडन हॅझार्ड आणि
रोमेलू लुकाकू हे बचावपटूंचे कर्दनकाळ आणि राखीव बाकावर फेलिनी, मिग्बोलेट आणि कॉम्पनीसारखे दिग्गज, आली का लक्षात यांची ताकद?

Web Title: FIFA Football World Cup 2018: Germany wins; Eligibility complications persist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.