रशियाची मैदानावरील लढाई कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:17 AM2018-06-15T02:17:11+5:302018-06-15T02:17:11+5:30

रशियासाठी विश्वचषक स्पर्धेत मैदानावरची लढाई महत्त्वाची ठरणार आहे. अशी विश्वस्तरावरची स्पर्धा आयोजित करण्यामागे मूळ हेतू असतो तो त्या देशातील एकूणच खेळाची व्यवस्था सुदृढ, सशक्त बनवून त्या खेळाचा विस्तार होऊन लोकप्रियता वाढविणे हा.

 The battle on the Russian field is difficult | रशियाची मैदानावरील लढाई कठीण

रशियाची मैदानावरील लढाई कठीण

Next

- रणजीत दळवी

रशियासाठी विश्वचषक स्पर्धेत मैदानावरची लढाई महत्त्वाची ठरणार आहे. अशी विश्वस्तरावरची स्पर्धा आयोजित करण्यामागे मूळ हेतू असतो तो त्या देशातील एकूणच खेळाची व्यवस्था सुदृढ, सशक्त बनवून त्या खेळाचा विस्तार होऊन लोकप्रियता वाढविणे हा. तसेच विश्वस्तरावर आपल्या देशाची प्रतिमा उंचावण्याचाही प्रमुख हेतू असतो. आपले अर्थकारण, त्यायोगे साध्य झालेला विकास, केलेली प्रगती याचा ताळेबंदही जगासमोर मांडण्याची ती अमूल्य संधी असते. बाकी पर्यटन वगैरे अशी दुय्यम कारणेही असतातच.
हा देश एकेकाळची क्रीडाविश्वातील महासत्ता! पण सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर त्यांच्या या प्रतिमेला ग्रहण लागले. एवढे की रिओ आॅलिम्पिकमध्ये त्यांच्या अ‍ॅथलिट्सना आॅलिम्पिक समितीच्या ध्वजाखाली स्पर्धा करावी लागली. यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे अनेक खेळाडू ‘डोपिंग’मध्ये अडकले होते. तेव्हा हे संशयाचे भूत दूर करण्यासाठी फुटबॉलला प्रथम संधी मिळते आहे. या देशाचा फुटबॉल इतिहास १०० वर्षांचा आहे. त्झारचे रशियन एम्पायर, त्यानंतर सोव्हिएत संघराज्य आणि आता रशिया असा खेळाचा प्रवास. तेव्हा, आपला संघ काय करतो याकडे देशाचे लक्ष असणारच! मात्र आपला संघ कुठपर्यंत मजल मारणार याचे उत्तर कट्टरातले कट्टर पाठीराखेही देऊ शकणार नाहीत. शिवाय युरोप आणि संपूर्ण जगाचे लक्ष रशियाकडे राहील. १९६०च्या पहिल्या युरो स्पर्धेचे विजेतेपद व त्यानंतर १९६६च्या इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीपर्यंतची धडक एवढीच रशियाची आतापर्यंतची ठळक कामगिरी. तो काळ होता ‘ब्लॅक स्पायडर’ संबोधला गेलेला त्यांचा विश्वातील सर्वोत्तम गोलरक्षक लेव मशीन याचा. आजवर ‘गोल्डन बॉल’ जिंकणारा तो जगातील एकमेव गोलरक्षक हे विशेष.
त्यानंतर संघ म्हणून रशियाची केव्हाच छाप पडली नाही. वैयक्तिक छाप पाडणारे अनेक स्टार पाहावयास मिळाले. रोमन पावलूचेन्को, व्हॅलेरी कार्पिन, आंद्रे आर्शविन असे स्ट्रायकर आणि रिनात दासेयेव्ह व इगॉर अकिनफिव्ह हे गोलरक्षक त्यात मोडतात. यातला इगॉर यंदा रशियाचा प्रमुख आधारस्तंभ असेल. त्याचा सीएसकेए मॉस्को या क्लबमधील सहकारी अ‍ॅलन झोगोएव्ह याकडेही मोठ्या आशेने बघितले जाईल. सेंटर बॅक जॉर्जी झिखिया गुडघा दुखापतीमुळे संघात नसेल आणि डेनिस चेरयेशेव (व्हिया रियाल) याचा अपवाद वगळता त्यांच्याकडील अन्य खेळाडू युरोपात अन्यत्र खेळत नाहीत. एका नवख्या, अननुभवी संघाला गटसाखळीतून पुढे नेणे प्रशिक्षक स्टॅनिसलाव्ह चेरचेसोव यांना शक्य होईल असे दिसत नाही. रशियाने स्पर्धात्मक फुटबॉलमध्ये शेवटचा विजय मिळवला त्याला वर्षे झाली जवळजवळ तीन! आणि येथे त्यांचा उरुग्वे व इजिप्त यांच्याशी कडा मुकाबला आहे. इजिप्तचा मोहम्मद सलाह काहीसा दुखापतग्रस्त आहे. तो खेळला किंवा नाही तरीही इजिप्तला हरविणे सोपे नाही. एकूणच रशियाची स्पर्धेतील वाटचाल कठीण आहे. त्यांना पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागेल.

Web Title:  The battle on the Russian field is difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.