ठळक मुद्दे* भात गरमच खाल्ला पाहिजे असाच हा पदार्थ. त्यामुळेच तो हमखास पुन्हा गरम करूनच वाढला जातो. परंतु, एकदा शिजवलेला भात पुन्हा गरम केला तर धोका निर्माण होऊ शकतो.* शिजवलेले बटाटे उघड्यावर राहिले आणि पुन्हा गरम केले गेले तर त्यापेक्षा वाईट विष काही नसतं.* पालक किंवा अन्य पालेभाज्या एकदा शिजवून पुन्हा पुन्हा गरम केल्यास त्यातील कार्सिजनिक घटक आरोग्यास घातक ठरु शकतात. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांना आमंत्रण देणारं विष देखील यामुळे तयार होऊ शकतं.

-सारिका पूरकर-गुजराथी


‘तू हात-पाय धुवून घे, मी जेवण गरम करते ’ किंवा ‘तुम मुँह-हाथ धो लो, मै खाना गरम करती हूँ’’ हे केवळ मराठी, हिंदी चित्रपटातील आईच्या तोंडचे संवाद नाहीयेत तर आपल्या रोजच्या जेवणाच्या सवयी, खाद्यसंस्कृतीशी निगडित अविभाज्य बाब आहे.. स्वयंपाक केल्याकेल्या घरातील सर्वजण जेवत नाहीत. प्रत्येकाच्या कामाच्या वेळेनुसार जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतात. साहजिकच तयार करून ठेवलेला स्वयंपाक घरातील प्रत्येक सदस्य जेवतो तोवर गार होतो. मग जेवायला बसताना तो गरम करूनच पानात वाढला जातो. कारण आमटी, भात, भाज्या यांची चव गरमच छान लागते. किंवा मग असंही होतं की, उरलेलं अन्न फ्रीजमध्ये साठवून पुन्हा वापरताना ते गरम केलं जातं.
जेवण गरम असायला हवं हे मान्यच..परंतु केलेला स्वयंपाक वारंवार गरम करणं कितपत योग्य आहे?
जेवणातील काही पदार्थ गरम केलेत तर काही बिघडत नाही, मात्र काही पदार्थ पुन्हा गरम केल्यास त्यातील घटकांची रासायनिक प्रक्रि या होऊन विष तयार होऊ शकतं, त्यातील पोषक मुल्यांचा-हास होऊ शकतो आणि यामुळे साहजिकच तुमच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच जेवण वाढताना अन्न पुन्हा गरम करत असाल तर नीट विचार करा. त्याआधी कोणते पदार्थ सारखे गरम का करू नये हे समजून घ्या!

1) भात
भात गरमच खाल्ला पाहिजे असाच हा पदार्थ. त्यामुळेच तो हमखास पुन्हा गरम करूनच वाढला जातो. परंतु, एकदा शिजवलेला भात पुन्हा गरम केला तर धोका निर्माण होऊ शकतो. भात शिजवण्यासाठी लागणा-या कच्च्या तांदळात विविध जीवाणू असतात. ते भात शिजल्यानंतर देखील कायम राहू शकतात. त्यामुळे शिजवलेला भात जर रुम टेंपरेचरला म्हणजेच उघड्यावर राहिला तर या जीवाणूंची संख्या खूप वाढू शकते. आणि या वाढलेल्या जीवाणूंमुळे अतिसार, उलट्या असा त्रास होऊ शकतो. त्यामुळेच उघड्यावर जास्त वेळ शिजवून ठेवलेला भात पुन्हा गरम करु नका.

 


 

2) बटाट्याचे पदार्थ
बटाटा तर सर्वांचा लाडका असतो. बटाट्याची भाजी द्या नाही तर पराठे, समोसा. काहीही. केव्हाही चालतं. त्यामुळेच बटाट्याची भाजी तर हमखास गरम करूनच वाढली जाते. परंतु, यामुळे बटाट्यातील पौष्टिक तत्वांचा नाश तर होतोच शिवाय पुन्हा पुन्हा गरम केल्यामुळे बटाट्यातील बोटुलिझम या बॅक्टेरियात वाढ होते. आणि त्यामुळे अनेक आजार बळावू शकतात. शिजवलेले बटाटे उघड्यावर राहिले आणि पुन्हा गरम केले गेले तर त्यापेक्षा वाईट विष काही नसतं. म्हणूनच जास्तीचे शिजवलेले बटाटे, भाजी उरली तर लगेचच फ्रीजमध्ये झाकून ठेवा. आणि पुन्हा फ्रीजमधून बाहेर काढून एकतासाच्या आतच त्याचा वापर करावा.

 


 

3) मशरूम्स

प्रोटीन्सचा खजिना असलेले मशरूम्स ज्यांना आवडतात त्यांनी मशरूम्सचे पदार्थ एकदा शिजवल्यावर वारंवार ते गरम करु नयेत. कारण यामुळे मशरूम्स आपली नैसर्गिक संरचना बदलतात आणि त्यामुळेच दरदरून घाम येणं, पोटाच्या समस्या असे विकार होऊ शकतात.

 


 

4) बीटरूट

रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीटरूट नेहमी खाल्ले जाते. मात्र त्यापासून तयार केलेले पदार्थ देखील पुन्हा गरम केल्यास बीटरुटपासून आरोग्यास लाभ नाही तर उलट धोकाच पोहाचतो. कारण बीटरूटमध्ये असलेले नायट्रेट्र्सचं रूपांतर गरम केल्यानंतर नाइट्रेट्समध्ये होतं आणि ते शरीरास खूप हानिकारक असतं.

 


 

5) हिरव्या पालेभाज्या
पालकासारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. पालक किंवा अन्य पालेभाज्या एकदा शिजवून पुन्हा पुन्हा गरम केल्यास त्यातील कार्सिजनिक घटक आरोग्यास घातक ठरु शकतात. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांना आमंत्रण देणारं विष देखील यामुळे तयार होऊ शकतं. म्हणनूच पालकाची भाजी करताना ती केल्याकेल्या लगेच पानात वाढा. किंवा पालक शक्यतो कच्चा खाण्यावर भर द्या. आणखी एक पर्याय म्हणजे पालकाची भाजी करून ठेवली असल्यास ती गरम न करता थंडच खा.

6) गाजर

गाजराचा हलवा हमखास पुन्हा पुन्हा गरम केला जातो. पण तसं अजिबातच करु नका. पालेभाज्याप्रमाणेच गाजराचे पदार्थ पुन्हा गरम केल्यास हानिकारक ठरु शकतात.
अन्न वाया न घालवणं, तसेच गरम-गरम जेवण वाढणं हे जरी योग्य असलं तरी ते पुन्हा गरम करताना आपण आपल्या शरीरात विष तर ढकलत नाहीये ना? याचा विचारही व्हायला हवा.

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.