ठळक मुद्देशाकाहारी असलं की बऱ्याचदा आपल्याला हवं ते जेवण मिळेल की नाही याची चिंता असते.किंवा उपवासात बाहेर जायचं म्हणजे उपवासाचे पदार्थ कुठे मिळतील हे आधीच पाहावं लागतील.

पुणे : उपवासाचा मार्गशीर्ष महिना नुकताच सुरू झालाय. या महिन्यात मांसाहार टाळला जातो. फक्त शाकाहारी जेवणाचा आनंद घ्यायचा असतो. पण रोज रोज घरचं खाऊनही कंटाळा येतो. अशावेळेस एखादं छानसं हॉटेल आपण शोधतो. आता बाहेर जायचं म्हणजे नॉनव्हेज इज बेस्ट. कारण शाकाहारी जेवण प्रत्येक हॉटेलमध्ये चांगलच मिळतं असं नाही. पण मार्गशीर्ष सुरू असल्याने शाकाहारीचा मेन्यू कोणत्या हॉटेलमध्ये चांगला आहे हे तुम्ही पाहत असाल. आज आम्ही तुम्हाला पुण्यातल्या अशाच काही हॉटेल्सविषयी सांगणार आहोत, जिथे तुम्हाला अस्सल शाकाहारी पदार्थांचा आनंद घेता येईल. एवढंच नव्हे तर जर तुम्ही पुण्यात काही दिवसांसाठी राहायला गेला असाल आणि खाण्याची गैरसोय होत असेल तर या हॉटेल्समध्ये तुम्ही खानावळीही लावू शकता. 

सुकांता

पुण्यातल्या  डेक्कन जिमखान्यातील पुलाची वाडी इथं असलेलं सुकांता हे हॉटेलही शाकांहाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. २००४ साली सुरू झालेलं हे हॉटेल आता शाकाहारांच्या आवडीचं हॉटेल बनलंय. यामागचं कारणही तसंच आहे. तुम्हाला हवं असलेलं सगळेच शाकाहारी पदार्थ इथं मिळू शकतील. फक्त महाराष्ट्रीयन शाकाहारी थाळीच इथं मिळेल असंही नाही.

तुम्हाला थोडंसं गुजराती, साऊथ इंडियन फ्लेव्हर चाखायचा असेल तर हे हॉटेल बेस्ट आहे. इथं तुम्हाला सिझनल पदार्थही मिळू शकतील. आमरस, सिताफळ रबडी, स्ट्रॉबेरी रबडी अशा सिझनल फळांचे विविध प्रकारही चाखता येतील. इथं कोणत्याही प्रकारचं आगाऊ बुकींग होत नसल्याने तुम्हाला तिथं जाऊनच टेबल बुक करावं लागतं. त्यासाठी थोडासा वेळ लागतो. पण एकदा का समोर ताट आलं की आपला सगळा थकवाच निघून जातो. 

आणखी वाचा - शाकाहारी भारतीयांची  फेव्हरिट फॉरीन डेस्टिनेशन्स , या देशात होत नाही खाण्याची आबाळ!

राजधानी

तुम्हाला जर गुजराती किंवा राजस्थानी प्रकारच्या शाकाहार जेवणाची तल्लफ आली असेल तर विमान नगर येथील फिओनिक्स मार्केट सिटीतल्या दुसऱ्या मजल्यावरचं राजधानी हॉटेलमध्ये नक्की जायला हवं. शाकाहारी थाळीसोबतच तुम्हाला इथं व्रत थाळी, आंब्याचे विविध पदार्थ, दिवाळीतील फराळ असं सारं काही मिळू शकेल.

छास, ढोकळा, लोणची, पापड, भाजी, चपाती, डाळ, फरसाण, सलाड, चटणी, भात, खिचडी असं सारं काही तुम्हाला इथं चाखता येईल. डाळभात चुर्मा आणि मटर करंजी म्हणजे लाजवाब. राजस्थान, महाराष्ट्र, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन अशा वेगवेगळ्या प्रांतातील शाकाहारी जेवणाचा तुम्ही इथं दुपारी १२ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ७ ते रात्री १०.३० पर्यंत आस्वाद घेऊ शकता. 

आणखी वाचा - शाकाहारामुळे दरवर्षी ७० लाख लोक कमी मरतील

आशा डायनिंग हॉल

डेक्कन जिमखान्याजवळील हे दुसरं प्रसिद्ध शाकाहारी हॉटेल. आपटे रोडवर हे हॉटेल तुम्हाला सापडेल. पुण्यातलं जुन्या हॉटेलांपैकी हे एक हॉटेल. १९४९ साली या हॉटेलची स्थापना झाली. घरगुती पद्धतीचं जेवण चाखायचं असेल तर या हॉटेलला एकदा नक्की भेट द्या. इतर शाकाहारी हॉटेल प्रमाणेच इथंही घरगुती थाळी फार प्रसिद्ध आहे.

भाजी, चपाती, डाळ, दही, सोलकढी आणि भात असे पदार्थ एका थाळीत असतात. तुम्ही एखादं मिष्ठान्न किंवा शीतपेयही इथं मागवू शकता. अगदी कमी किंमतीत तुम्ही इथं पोटभरून जेऊ शकाल. सकाळी ११ ते दुपारी २.३० आणि सायंकाळी ७.३० ते रात्री १० वाजेपर्यंत तुम्ही या हॉटेलमध्ये जाऊ शकता. 

आणखी वाचा - म्हणून सनी लिओनीने सोडला मांसाहार

हॉटेल श्रेयस

आपटे रोडवरील डेक्कन जिमखान्याजवळील हे एक प्रसिद्ध हॉटेल. पुण्यात गेल्यावर जर तुम्ही छान प्रशस्त शाकाहारी हॉटेलच्या शोधात असाल तर इथं नक्की भेट द्या. थालीपीठ, मसाले, आमटी, वेगवेगळ्या भाज्या इथं अगदी घरच्या चवीप्रमाणे मिळतात. पण इकडे गेल्यावर पुरण  पोळी, उकडीचे मोदक, दुधी हलवा, मुंग हलवा हे पदार्थ खाण्यास अजिबात विसरू नका. या पदार्थांना इथं मोठी मागणी आहे. केवळ महाराष्ट्रीयनच नव्हे तर जैन पदार्थ आणि उपवासाचेही विविध पदार्थ तुम्ही इथं चाखू शकता. यांच्याकडे खानावळीचीही सोय आहे.  सकाळी ११.३० ते दुपारी ३ आणि सायंकाळी ७ ते रात्री १०.३० या काळात या हॉटेलला भेट द्या.

दुर्वांकुर डायनिंग हॉल

पुण्यातल्या सदाशिव पेठेत असलेलं हे सुप्रसिद्ध दुर्वांकुर डायनिंग हॉल म्हणजे शाकाहाऱ्यांचं माहेरघरच म्हणा. महाराष्ट्रातील अप्रतिम पदार्थ तुम्हाला या एका हॉटेलमध्ये चाखायला मिळतील. नियमित थाळी आणि रविवार स्पेशल थाळी असे दोन प्रकार आहेत इथे. रविवार स्पेशल थाळीमध्ये तुम्हाला भाजी, चपाती किंवा भाकरी, पुरी, डाळ, चटणी, पापट, दहीवडा, मसाले भात, फरसाण, थालीपीठ आणि याचसोबत एखादा गोड पदार्थ असं सारंकाही मिळेल.

सुटलं की नाही तोंडाला पाणी? आसनव्यवस्था अत्यंत साधी आहे. एखाद्या लग्नाच्या मांडवात ज्याप्रमाणे जेवणाची आरास केली जाते, अगदी त्याचप्रमाणे इथं तुम्हाला जेवणाचा आस्वाद घेता येईल. पण इथं जाताना थोडासा वेळ काढूनच जा. कारण इथं खवय्ये मंडळींची खूप रांग असते. दुपारी १२ ते ३ आणि सायंकाळी ७ ते रात्री १०.३० या काळात तुम्ही इथं जाऊ शकता.