नवरात्रोत्सवातले गुजरात स्पेशल पदार्थ.. हे पदार्थ एकदा खाल्ले की सारखे खावेशे वाटणारच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 06:24 PM2017-09-26T18:24:17+5:302017-09-26T18:33:09+5:30

रंगील्या गुजरातमध्ये नवरात्रौैत्सवात उपवासाचे तसेच बिनउपवासाच्या पदार्थांची शब्दश: चंगळ असते. चटकमटक, गोड पदार्थांनी खवय्ये खूष होवून जातात.

In Navratra what is special Naivaidya in Gujraat ? | नवरात्रोत्सवातले गुजरात स्पेशल पदार्थ.. हे पदार्थ एकदा खाल्ले की सारखे खावेशे वाटणारच!

नवरात्रोत्सवातले गुजरात स्पेशल पदार्थ.. हे पदार्थ एकदा खाल्ले की सारखे खावेशे वाटणारच!

Next
ठळक मुद्दे* चिकू हलवा हा नवरात्रात बनवला जाणारा गुजरातचा पारंपरिक पदार्थ आहे. उपवासामुळे अशक्तपणा येऊ नये म्हणून आहारात फळांचा समावेश व्हावा, या हेतूनं तो बनवला जातो.* गुजरातची स्पेशल आणि सिग्नेचर डिश म्हणून मोहनथाळचा उल्लेख करता येईल. प्रत्येक सणाला गुजरातमध्ये मोहनथाळ बनवली जाते. मोहनथाळ म्हणजे बेसनाची बर्फी.* जे गुजराती बांधव एकभुक्त नवरात्र उपवास करतात, ते सायंकाळी उपवास सोडण्यासाठी हमखास खट्टा मूग बनवतात. छोळी किंवा भाताबरोबर अख्ख्या मूगाची गुजराती पद्धतीची ही उसळ भन्नाट लागते.

 

- सारिका पूरकर-गुजराथी

अत्यंत उत्सवप्रिय, खवय्यांचे राज्य म्हणून ओळख करून देता येईल असं राज्य म्हणजे गुजरात. नवरात्रौत्सवाची धूम बघायची असेल, हा उत्सव खºया अर्थानं एन्जॉय करायचा असेल तर गुजरातमध्ये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पंखिडा ओ पंखिडा..म्हारो गरबो रमतो जाय.. या गुजराती गीतांवर अवघ्या जगाला ठेका धरायला लावणारा गुजरातचा रास गरबा म्हणजे आपल्या भारताची एक वेगळी ओळख आहे. गुजरातमध्ये नवरात्रौत्सव प्रचंड उत्साहात, भक्तीभावानं साजरा होतो. घेरदार, नक्षीदार घागरे, केडिया ड्रेस, काठियावाड ड्रेस, त्यावर साजेशी ज्वेलरी घालून आबालवृद्ध भल्यामोठ्या मैदानावर गरबा खेळतात. वैविध्यपूर्ण तरीही पारंपरिक असा हा गरबा रंगात येतो तेव्हा जी धमाल असते ती केवळ अवर्णनीय असते..तर अशा या रंगील्या गुजरातमध्ये नवरात्रौैत्सवात उपवासाचे तसेच बिनउपवासाच्या पदार्थांची शब्दश: चंगळ असते. चटकमटक, गोड पदार्थांनी खवय्ये खूष होवून जातात.


1) चिकू हलवा
नवरात्रात बनवला जाणारा हा गुजरातचा पारंपरिक पदार्थ आहे. उपवासामुळे अशक्तपणा येऊ नये म्हणून आहारात फळांचा समावेश व्हावा, या हेतूनं तो बनवला जातो. झटपट पण तरीही पौष्टिक असा हलवा आहे. चीकूचा गर, दूध एकत्र करून आटवून त्यात खवा, साखर, तूप, सुकामेवा घालून हा हलवा तयार केला जातो. ज्याला चिकू खायला आवडत नसेल् त्यांच्यासाठी देखील हा हलवा बेस्ट आॅप्शन आहे.

 




2) मोहनथाळ
गुजरातची स्पेशल आणि सिग्नेचर डिश म्हणून मोहनथाळचा उल्लेख करता येईल. प्रत्येक सणाला गुजरातमध्ये मोहनथाळ बनवली जाते. मोहनथाळ म्हणजे बेसनाची बर्फी. मात्र ही बर्फी अत्यंत शाही आणि गुजराती पद्धतीची आहे. बेसनामध्ये तूप अन किंचित दूध घालून भाजून घेतल्यावर रवाळ मळून चाळणीनं चाळलं जातं. नंतर साखरेचा एकतारी पाक करून त्यात बेसन आणि खवा घालून बर्फी सेट केली जाते. खव्यामुळे या बर्फीची चव एकदम शाही लागते. मगज म्हणूनही ही बर्फी ओळखली जाते. नवरात्रात देवीला नैवेद्य म्हणून मोहनथाळ बनवली जाते.
 

 

3) मखाने खीर
गुजराती बांधव गोडधोड पदार्थांचे भलतेच शौकीन आहेत. साहजिकच नवरात्रीसारख्या सणाला गोड पदार्थ बनणार नाहीत असे होणार नाही. मखाने खीर देखील अशाच गोड पदार्थांच्या यादीतील एक आहे, जी गुजराती बांधव नवरात्रात बनवतात. मखाने म्हणजेच कमळाचं बी. प्रोटीन्स आणि कॅल्शियमनं समृध्द अत्यंत पौष्टिक अशा मखान्यांना साजूक तूपात परतून घेऊन त्याची पूड बनवली जाते. नंतर दूध, साखरआणि मखान्याची पूड एकत्र आटवले जाते. यात वेलची आणि जायफळ पूड घातली की तयार होते मखान्याची खीर.

 


 

4) खट्टा मूग
जे गुजराती बांधव एकभुक्त नवरात्र उपवास करतात, ते सायंकाळी उपवास सोडण्यासाठी हमखास खट्टा मूग बनवतात. छोळी किंवा भाताबरोबर अख्ख्या मूगाची गुजराती पद्धतीची ही उसळ भन्नाट लागते. आपण त्यास मूगाची कढी देखील म्हणू शकतो. हिरवे मूग भिजवून शिजवून घेतले जातात. नंतर ताकात बेसन, मीठ, चवीला साखर, चालत असल्यास किसलेलं आलं घालून साजूक तूपात जिरे, लवंग, दालचिनी, हिरवी मिरचीची फोडणी करून त्यात ताक-पीठाचं मिश्रण, उकडलेले मूग घालून उकळी काढली जाते. खट्टे मूग ही गुजराती चवीची खास ओळख आहे.

 

 

5) डाकोर गोटा
भज्यांचा हा गुजराती अवतार एकदम हटके आहे. नवरात्र, दिवाळी, होळी या सणांना डाकोर गोटा भजी गुजरातमध्ये हमखास केली जातात. बडोद्याजवळील डाकोर या गावातील हा लोकप्रिय पदार्थ त्याच नावानं ओळखला जातो. गव्हाची कणिक, बेसन, हळद, भरडलेले धणे, कोथिंबीर, मीठ, लसूण-मिरचीची पेस्ट, बेकिंग सोडा, दही, किंचित दूध, चवीला साखर, काळीमिरी पावडर हे एकत्र करून हे मिश्रण 3-4 तास भिजवून ठेवलं जातं. नंतर गरम तेलाचं मोहन घालून या मिश्रणाची भजी काढली जातात. डाकोर गोटा भजी हा गुजरातमधील ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचं महत्वाचं प्रतीक मानलं जातं. महाराष्ट्रात पिठलं-भाकरीला जशी ओळख आहे तशी गुजरातमध्ये डाकोर गोटा भजीची आहे.

 

Web Title: In Navratra what is special Naivaidya in Gujraat ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.