ठळक मुद्दे* लग्न ठरलं की रोज लिंबू पाणी भरपूर प्यायला हवं. लिंबामध्ये क जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतं. या जीवनसत्त्वाचा उपयोग चेहे-यावर नैसर्गिक तेज आणण्यासाठी होतो.* पोटॅशिअमयुक्त फळं हे या काळात खूपच उपयुक्त असतात. या फळांनी लग्नामुळे मनातली भीती, ताण कमी होतो. उत्साही वाटतं.* चिया सीडस त्वचेसाठी खूपच उपयुक्त असतात. चिया सीडसमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असतं. जे पेशींची क्षमता वाढवतं. यामुळे त्वचा चमकदार होते.


- माधुरी पेठकर.


लग्न ठरलं की घरातील वडीलधारी मंडळी विशेषत: आज्या मुलींना खाण्यापिण्याची काळजी घ्यायला लावतात. कारण लग्नात जर सुंदर दिसायचं असेल तर मुख्य उपाय आपल्या रोजच्या आहारातूनच करायला हवा. लग्नातले कपडे, दागदागिने, ब्युटी पार्लरमधून केलेल्या महागड्या ब्युटी थेरपीज या लग्नाच्या दिवशी फक्त नवरीला नटवू शकतात पण तिच्या चेहे-यावर त्या दिवशी जे तेज हवं असतं ते मिळतं फक्त योग्य आहारातूनच.
त्यामुळे लग्न ठरल्यानंतर मुलींनी आपण काय खातो पितो याकडे जरा डोळसपणे पाहायला हवं. लग्नाच्या दिवशी चेहे-यावर सोनेरी तेज हवं असेल तर गोल्डन फेशिअलची गरज नसून नैसर्गिक सौंदर्य वाढवणा-या पोषक घटकांची आणि सौंदर्यास हानिकारक असे शरीरातील विषारी घटक काढून टाकणा-या अन्नघटकांची जास्त गरज असते. त्यामुळे लग्नात सुंदर, तेजस्वी दिसायचं असेल तर मुलींनी आपल्या जेवणाच्या ताटाकडे डोळसपणे पाहायला हवं.

 काय खाल? 
1. ओटस
ओटसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. हे फायबर हळूहळू पचतं. ओटस खाल्ल्यानं भरपूर ऊर्जा मिळते. ही ऊर्जा लग्नाची कामं आटोपताना खूप उपयोगी पडते. ओटस आहारात असतील तर रक्तातील साखर दीर्घकाळपर्यंत स्थिर राहाते. ती कमी जास्त होत नाही. ओटसच्या इडली, पॅनकेक या पर्यायांचा वापर करून आहारात आनंदानं ओटसचा समावेश करता येतो.

2. लिंबू पाणी

लग्न ठरलं की रोज लिंबू पाणी भरपूर प्यायला हवं. लिंबामध्ये क जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतं. या जीवनसत्त्वाचा उपयोग चेहे-यावर नैसर्गिक तेज आणण्यासाठी होतो. तसेच लिंबू पाण्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. शरीराला जर पाणी कमी पडलं तर पाय सूजतात, डोळ्याखाली सूज येते , सूस्तपणा येतो. हे सर्व टाळण्यासाठी लिंबू पाणी भरपूर प्यावं. आणि सकाळी उठल्यानंतर आधी लिंबू-मध पाणी घ्यावं. शिवाय संत्र्याचा रस घरच्याघरी तयार करून तो नियमित घेतला तरी चेहेरा तजेलदार होतो.
 

3. पोटॅशिअम

पोटॅशिअमयुक्त फळं हे या काळात खूपच उपयुक्त असतात. त्यामुळे केळ, पपई, डाळिंब ही फळं, जर्दाळू सारखा सुका मेवा नियमित खावा. यामुळे शरीरातील पाणी आणि खनिजाची पातळीत समतोल राहातो. या फळांनी लग्नामुळे मनातली भीती, ताण कमी होतो. उत्साही वाटतं.

 

4. चिया सीडस
चिया सीडस त्वचेसाठी खूपच उपयुक्त असतात. चिया सीडसमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असतं. जे पेशींची क्षमता वाढवतं. यामुळे त्वचा चमकदार होते. ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडमुळे पेशींची पोषक घटक सेवन करण्याची आणि विषारी घटक बाहेर टाकण्याची क्षमता वाढते. ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडमुळे ताण वाढवणारी संप्रेरकं क्षीण होतात.

5. लीन प्रोटीन हा घटक असलेले काजू, शेंगदाणे यांचा समावेश आहारात असावा. यामुळे तृप्तता वाढते आणि तेलकट, तुपकट पदार्थ खाण्याची लालसा कमी होते.

6. पालक, ब्रोकोली, हंगामी बेरी फळं यामध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅण्टिआॅक्सिडंट असतात. यांचं सेवन केल्यास आजारी पडण्याचा धोका कमी होतो. शिवाय आतड्यांची कार्यक्षमता वाढून पचनाचे विकार होत नाही.

7. लग्न ठरल्यानंतर आहाराचा विचार करताना दिवसभरातलं कोणतंच जेवण चुकवायचं नाही हा नियम करावा. दिवसभरातून तीन ते चार वेळेस योग्य आहार घ्यायला हवा. यामुळे शरीरास आवश्यक असणारी ऊर्जा वेळेवर मिळते. आणि आपोआपच त्याचे सकारात्मक परिणाम चेहे-यावर दिसतात.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.