हुग्गी आणि चित्रान्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 10:47 AM2018-05-08T10:47:55+5:302018-05-08T10:47:55+5:30

लापशी गव्हापासून केलेली खीर आणि आंबट-गोड चवीचा भात ! कर्नाटकात प्रत्येक सणाला हे दोन पदार्थ नैवेद्याला लागतातच.

Hungghi and chitrranna | हुग्गी आणि चित्रान्न

हुग्गी आणि चित्रान्न

googlenewsNext

- प्रज्ञा कुलकर्णी
डोंबिवली (पूर्व)
कर्नाटक राज्य हे निसर्गसौंदर्यानं आणि नैसर्गिक साधनसंपत्तीनं समृद्ध असं राज्य आहे. या राज्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इथे सणवार, कुलधर्म-कुळाचार अतिशय श्रद्धेनं आणि उत्साहानं साजरे केले जातात. इथले काही खास असे कानडी भाषिकांचे पदार्थही खूप रुचकर आणि पौष्टिक आहेत. त्यामध्ये लापशी गव्हापासून बनवलेली हुग्गी म्हणजेच खीर आणि चित्रान्न हा भाताचा प्रकार हे खूप प्रसिद्ध आहेत. प्रत्येक सणाला नैवेद्यासाठी हे पदार्थ इथे अगदी आवर्जून केले जातात.

हुग्गी
साहित्य : एक वाटी लापशी गहू, चार चमचे तूप, दोन लवंगा, दोन वाट्या चिरलेला गूळ, एक वाटी खोवलेला नारळ, एक चमचा भाजून कुटलेली खसखस, एक चमचा जायफळ वेलची पूड, प्रत्येकी एक चमचा काजू, चारोळी, मनुका आणि अर्धा लिटर दूध.
कृती : कढईत चार चमचे तूप तापवून घ्यावं. त्या तुपात दोन लवंगा टाकाव्यात आणि त्यावर लापशी गहू घालून खमंग भाजून घ्यावे. नंतर हा भाजलेला गहू एक वाटी पाणी घालून कुकरमधून शिजवून घ्यावा. शिजलेला गहू कढईत काढून त्यात भाजून कुटून घेतलेली खसखस, जायफळ वेलची पूड, गूळ, खोवलेला नारळ, काजू, चारोळी, मनुका आणि दूध घालून ते मंद आचेवर मिसळून घ्यावं. हुग्गी तळाला करपणार नाही याची काळजी घ्यावी. हुग्गी खाण्याच्या वेळी वरून तूप घालावं.

चित्रान्न
साहित्य : दोन वाट्या बासमती तांदूळ, दोन मोठे चमचे चणा डाळ, दोन मोठे चमचे उडीद डाळ, अर्धी वाटी शेंगदाणे, चार-पाच लाल सुक्या मिरच्या, दहा-बारा कढीपत्त्याची पानं, एका मोठ्या लिंबाचा रस, मीठ, साखर, फोडणीसाठी पाव वाटी तेल, मोहरी, जिरे, हिंग आणि हळद.
कृती : दोन वाट्या तांदूळ धुवून, निथळून घ्यावा. त्यात दोन वाट्या पाणी घालून मोकळा शिजवून घ्यावा. शिजलेला भात मोठ्या थाळ्यात किंवा परातीत पसरून ठेवावा. चणा डाळ, उडीद डाळ कोरडीच भाजून घ्यावी. कढईत पाव वाटी तेल तापवून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्त्याची पानं, सुक्या लाल मिरच्या आणि शेंगदाणे घालावे. शेंगदाणे खरपूस तळून घ्यावेत. भाजलेली चणा आणि उडीद डाळ घालावी. ही फोडणी थंड झाल्यावर पसरलेल्या भातावर ओतावी. त्यावर चवीप्रमाणे मीठ, साखर, लिंबाचा रस घालावा. भाताचे शीत मोडणार नाही अशा हलक्या हातानं सगळं कालवावं. हा पदार्थ गारच खावा.

 

Web Title: Hungghi and chitrranna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.