ठळक मुद्दे* वाढताना मोकळी खिचडी वाढून त्यावर खरपूस तेल ओतलं जातं. नागपूरी स्टाइलची ही खिचडी चवीला अप्रतिमच लागते हे वेगळं सांगायला नकोच.* बिकानेरी खिचडीगव्हापासून करतात. त्यात तांदूळ वापरले जात नाहीत. फक्त मूगदाळ आणि भरडलेले गहू वापरतात.* बिसी बेळी भात म्हणजे दक्षिण भारतातील सिग्नेचर डिश म्हणून लोकप्रिय आहे. डाळ-तांदूळ, मिश्र भाज्या, चिंचेचा कोळ, रस्सम पावडर यापासून ही खिचडी तयार केली जाते.- सारिका पूरकर-गुजराथी


भारत सरकारच्या अन्न प्रक्रि या उद्योग मंत्रालयानं खिचडीला भारताचा ब्रॅण्ड पदार्थ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे एरवी घरात हलका आहार म्हणून तसेच रात्रीचे जेवण म्हणून केली जाणारी तसेच आबालवृद्धांच्या पसंतीची खिचडी एकदम प्रकाशझोतात आली आहे. तसं पाहिलं तर खिचडी या पदार्थाशी भारतातील प्रत्येक वयोगटातील माणसाच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. बाळाचा पहिला आहार म्हणजे खिचडी, बॅचलरांचं जेवण म्हणजे खिचडी, वयोवृद्ध नागरिकांचा पाचक आहार म्हणजे खिचडी.

डाळ, तांदूळ जोडीला मसाले यापासून बनवलेला खिचडी हा अत्यंत पौष्टिक तसेच सर्वसामान्यांच्या घरातील पदार्थ आहे. खिचडी, कढी, पापड, लोणचे, रायता हे जेवण म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारे. वन डिश मिल म्हणून खिचडी भारतात चवीनं खाल्ली जाते. खिचडीच्या विविध चवी, पद्धती भारतभरात पाहायला मिळतात. या खिचडीची मसालेदार दुनिया एकदम चवदार आणि रूचकर आहे, सतत अनुभवावी अशी.


1) नागपूरी खिचडी

तूर किंवा मूगडाळ वापरु न ही खिचडी केली जाते. परंतु डाळ आणि तांदुळ एकत्र करून हळद,मीठ,हिंग घालून मोकळी खिचडी ( तांदळाचा कण न ् कण दिसेल ) शिजवून घेतली जाते. तसेच तेल गरम करु न त्यात लसणाचे तुकडे, लाल तिखट, जिरे-मोहरी घालून फोडणीचं तेल तयार केलं जातं. वाढताना मोकळी खिचडी वाढून त्यावर हे खरपूस तेल ओतलं जातं. ही खिचडी चवीला अप्रतिमच लागते हे वेगळं सांगायला नकोच. या खिचडीसाठी जुना तांदूळ वापरला जातो. यामुळे खिचडी मोकळी होते.

2) फडा ( गव्हाची) खिचडी

डाळ, तांदळाच्या खिचडीचं पौष्टिकमूल्यं वाढवणारी ही खिचडी गुजरातमध्ये केली जाते. गव्हाचा दलिया बाजारात मिळतो. तो भिजत घालून मूुगदाळ, तांदूळ मिक्स करु न ही खिचडी तयार केली जाते. आलं-लसूण पेस्ट, कांदा-टोमॅटो, गरम मसाल्याच्या फोडणीत तयार केलेली ही खिचडी थोडी जास्त पाणी घालून सैलसर केली जाते. वाढताना खिचडीवर साजूक तूप घातलं जातं. जोडीला गोड कढी असते.

 


 

3) बिकानेरी खिचडी

ही खिचडी देखील गव्हापासून करतात. परंतु, त्यात तांदूळ वापरले जात नाहीत. तर फक्त मूगडाळ आणि भरडलेले गहू ( पाण्याचा हात लावून गहू कांडून घेतले जातात ) भरपूर पाणी घालून मऊ शिजवले जातात. नंतर तेलात किंवा तूपात हिंग, मोहरी, जिरे, साबूत मिरची, तिखट घालून तयार केलेली फोडणी या खिचडीवर ओतली जाते. बिकानेरी खिचडी ही गट्ट्याच्या भाजीसोबत खाल्ली जाते. ही डिश म्हणजे राजस्थानची खासियत आहे. 

 

4) भोजपुरी खिचडी

ही खिचडी सैलसर म्हणजे भरपूर पाणी घालून बनवली जाते. आलं-लसूण-मिरचीपेस्ट फोडणीत परतून डाळ-तांदूळ घालून खिचडी शिजवली जाते. नंतर लिंबाचा रस, कोथिंबीर पेरु न ही खिचडी वाढली जाते. त्यामुळे ती चवीला आंबट लागते, म्हणूनच तिला खटुआ खिचडी ( खटुआ म्हणजे आंबट ) म्हणतात. बुराणी रायत्याबरोबर ही खिचडी खातात.

 

5) पंजाबी तडका खिचडी

यालाच दाल खिचडा म्हणूनही ओळखले जाते. तूरडाळ, तांदूळ वापरु न विविध भाज्या, कांदा-टोमॅटो, गरम मसाला, आलं-लसूण यांची पेस्ट फोडणीत वापरु न केलेली ही खिचडी देखील सैलसर बनवली जाते. खाताना त्यावर बटर घातलं जातं. सोबत पंजाबी पद्धतीचे उडदाचे पापड, रायता असतो.

 

 

6) बंगाली खिचडी

या खिचडीत मूग डाळ वापरली जाते. तसेच बटाटा, मटार, टोमॅटोही घातले जातात. सोबतच फोडणीत साबूत गरम मसाला घालून खिचडी बनवली जाते. दूर्गा पूजेसाठी नैवेद्य म्हणून ही खिचडी हमखास करतात. दही, वांगे काप याबरोबर ही खिचडी वाढली जाते.

 

7) बिसी बेळी भात

दक्षिण भारतातील सिग्नेचर डिश म्हणून ही खिचडी लोकप्रिय आहे. डाळ-तांदूळ, मिश्र भाज्या, चिंचेचा कोळ, रस्सम पावडर यापासून ही खिचडी तयार केली जाते. सैलसर अशी ही खिचडी चांगली घोटून एकजीव केली जाते. आणि कढी किंवा रस्सम बरोबर सर्व्ह केली जाते.