ठळक मुद्दे* हिवाळ्यात आपली त्वचा फाटत असेल आणि कडक होत असेल तर दरवर्षी हिवाळा सुरू होण्यापूर्वीच केळाचा लेप लावण्यास सुरूवात करावी.* थंडीत खडबडीत होणा-या त्वचेसाठी बदामाचा लेप उपयुक्त ठरतो.* थंडीमध्ये त्वचा जिवंत आणि चैतन्यमय होण्यासाठी केशराचा लेप खूपच फायदेशीर ठरतो.




माधुरी पेठकर



थंडीचा कडाका पडला की पहिला फटका बसतो तो आपल्या त्वचेला. आपली त्वचा कशी दिसते? कशी वागते? याचं नीट निरिक्षण केल्यास थंडी आणि त्वचा यांचा अतिशय घनिष्ठ संबंध असल्याचं आढळून येईल. बाहेरच्या थंडीचा परिणाम हा त्वचेवर होणारच. पण म्हणून आपण काहीच करायचं नाही असं नाही. उलट आपण पहिल्यापासून जर काही उपाय केलेत तर बाहेर कितीही थंडी पडू देत आपली त्वचा ही कायम मऊ, मुलायम आणि ओलसर दिसेल. हे असं फक्त जाहिरातीतच दिसतं असं नाही. प्रत्यक्षातही हे शक्य आहे. त्यासाठी स्वत:ला थोडेसे कष्ट घ्यावे लागतात इतकेच. पण काही मीनिटांच्या या कष्टाचे फळ म्हणजे कडाक्याच्य थंडीचा जराही ओरखडा आपल्या त्वचेवर पडत नाही.
सहज तयार करता येणारे तीन प्रकारचे लेप त्वचेचं थंडीपासून रक्षण करण्यास पुरेसे आहेत. थंडीत आपल्या त्वचेला नेमक्या कोणत्या प्रकारच्या समस्येला तोंड द्यावं लागतं याचा थोडा विचार आणि अभ्यास करून या तीनपैकी एक लेप स्वत:साठी निवडता येतो.

 

कडक आणि फाटणा-या त्वचेसाठी

हिवाळ्यात आपली त्वचा फाटत असेल आणि कडक होत असेल तर दरवर्षी हिवाळा सुरू होण्यापूर्वीच केळाचा लेप लावण्यास सुरूवात करावी.
हा लेप तयार करण्यासाठी एका खोलगट भांड्यात थोडं जास्त पिकलेलं केळ घ्यावं. ते हातानं कुस्करावं. कुस्करलेल्या केळात दोन चमचे ग्लिसरीन, एक चमचा मध घालावं. या तिन्ही गोष्टी छान एकजीव करून घ्याव्यात. त्या नीट एकजीव झाल्या की मऊ पेस्ट तयार होते. ही पेस्ट चेहेरा आणि मानेला लावावी. हा लेप अर्धा तास वाळू द्यावा. लेप वाळला की कोमट पाण्यानं चेहेरा धुवावा. ग्लिसरीन आणि केळामध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता असते. चेहेरा ओलसर ठेवण्यास हे दोन्ही घटक खूप उपयोगी पडतात. मधही त्वचेतला ओलसरपणा टिकवून ठेवण्यास मदत करतं हा लेप नियमित लावल्यास कडाक्याच्या थंडीतही त्वचा मात्र ओलसर आणि सुदृढ राहाते.
 


 

खडबडीत त्वचेसाठी

थंडीत त्वचेवरून हात फिरवताना त्वचा खडबडीत झालेली सहज लक्षात येते. हा खडबडीतपणा कोरडेपणामुळे निर्माण होतो. तो घालवण्यासाठी बदामाचा लेप उपयुक्त ठरतो. हा लेप तयार करण्यासाठी 4 ते 5 बदाम सालीसकट मिक्सरध्ये वाटावेत. बदामाची बारीक पूड व्हायला हवी. या पूडमध्ये तीन चमचे गरम दूध आणि एक चमचा खडबडीत दळलेली साखर घालावी. ही पूड चांगली एकत्र करून घ्यावी. हळूवार मसाज करत हा लेप चेहेरा आणि मानेला लावावा. मसाजनंतर अर्धा तास हा लेप चेहेºयावर वाळू द्यावा. नंतर गरम पाण्यानं लेप धुवावा. दुधामध्ये असलेल्या लॅक्टिक अ‍ॅसिडचा आणि खडबडीत साखरेचा उपयोग त्वच स्वच्छ होण्यासाठी होतो. यामुळे           चेहे-यावरच्या मृत पेशी निघून जातात. चेहेरा स्वच्छ होतो.

मलूल आणि निर्जिव त्वचेसाठी

थंडीमध्ये त्वचा मलूल दिसते. चेहे-यावरचं तेजच हरवतं. त्वचा जिवंत आणि चैतन्यमय होण्यासाठी केशराचा लेप खूपच फायदेशीर ठरतो. हा लेप तयार करताना एका खोलगट भांड्यात 2-3 केशराच्या काड्या घ्याव्यात. दोन चमचे दुधाची साय आणि दोन चमचे दूध एकत्र करून या केशराच्या काड्या त्यात भिजत घालाव्यात. रात्रभर काड्या भिजू द्याव्यात. सकाळी हातानंच हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. हा लेप चेहेरा आणि मानेवर लावावा. 40 मीनिटं हा लेप सुकू द्यावा. नंतर गरम पाण्यानं लेप धुवून टाकावा. केशरामुळे त्वचा चमकदार होते. आणि हे केशर जेव्हा दूध आणि साय या दोन्हींबरोबर वापरलं जातं तेव्हा त्वचेचा कोरडेपणा गायब होतो. त्वचेच्या कोरडेपणाची समस्या सुटली की आपोआपच त्वचा सुंदर दिसू लागते.