There is easy solution on the smell of sweat and sweat! | अती घाम आणि घामाचा वास यावर उपाय आहे !
अती घाम आणि घामाचा वास यावर उपाय आहे !

ठळक मुद्दे* शरीराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास घामाची समस्या जाणवतेच. घाम खूप येत असेल , सतत येत असेल तर आंघोळीचा साबण वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. * घामाला वास येण्याची समस्या असेल तर त्या संबंध आहाराशीही असू शकतो. त्यामुळे आपण काय खातो याकडेही लक्ष द्यायला हवं.* लिंबामुळे जीवाणूंची वाढ नियंत्रणात राहाते. घाम आणि घामाचा वास दोन्ही नियंत्रणात राहातं.
- माधुरी पेठकर


घामाच्या वासानं माणसं दुरावतात, लांब लांब राहातात, हे सत्य आहे. बूट काढल्यानंतर पायांना येणाºया आंबट वासामुळे स्वत:लाच संकोचल्यासारखं होतं. खरंतर घाम येणं ही वैयक्तिक बाब. पण या घामाच्या वासानं आजू बाजूचे जेव्हा रिअ‍ॅक्ट होवू लागतात आणि त्या प्रतिक्रियांचा जेव्हा आपल्यावर नकारात्मक परिणाम होवू लागतो तेव्हा घामाची ही समस्या वैयक्तिक बाब राहात नाही. केवळ घामामुळे आपली हेटाळणी होते आहे हेही अनेकांना सहन होत नाही.
अती घाम येणं, घामाला वास येणं याची अनेक कारणं आहेत. वयात येताना ही समस्या जाणवते. तर कधी मधुमेहासारखे आजार याला कारणीभूत असतात. शरीरातून निघणा-या घामरूपी पाण्याचा संबंध जीवाणूंशी येतो आणि त्यातून घामाशी निगडित इतर समस्यांचा जन्म होतो.
खरंतर तुझ्या अंगाला घामाचा वास येतो असं दुसरं कोणी सांगण्यापेक्षा आपली समस्या आपणच ओळखायला हवी. आपल्याला जास्त घाम येत असेल , घामाला वास येत असेल तर त्यावरचे उपाय लगेच करायला हवेत. यामुळे इतरांना बरं वाटणं ही दूरची गोष्ट पण आधी स्वत:लाच छान वाटू लागतं.
घामाच्या दुर्गंधीपासून मुक्तता मिळवता येते त्यासाठी अतिशय सोपे उपाय आहेत. हे उपाय केल्यास केवळ घामाच्या वासाची समस्या म्हणून आपण चार चौघात जायला संकोच करत नाही आणि इतर चार चौघे आपल्याला केवळ घामाच्या वासामुळे टाळत नाही.

 
स्वच्छ राहा

कोणी म्हणेल हा काही उपाय आहे का? पण खरंतर हाच पहिला आणि मूलभूत उपाय आहे. शरीराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास घामाची समस्या जाणवतेच. घाम खूप येत असेल , सतत येत असेल तर आंघोळीचा साबण वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. नुसता सुगंधी साबण वापरून भागत नाही तर यासाठी अ‍ॅण्टिबॅक्टेरिअल साबण वापरायला हवा. या प्रकारच्या साबणानं त्वचेवरील जीवाणू घटतात. हा साबण शरीरावर लावताना जिथे जास्त घाम येतो तिथे जास्त लावावा. आणि घाम खूप येत असेल तर दिवसातून दोनदा आंघोळ करावी. किंवा खूप श्रमाचं काम केल्यानंतरही घाम येतो. अशा वेळेस कामानंतर आंघोळ केल्यास घामाची दुर्गंधी येत नाही.

अंग नीट कोरडे करा.

घाईघाईत अंघोळ करणं, आंघोळीनंतर घाईघाईनं तयार होणं अशा या घाईमुळेही घामाची आणि घामाच्या दुर्गंधीची समस्या निर्माण होते. आंघोळीनंतर अंग नीट कोरडे करण्याची काळजी घ्यायलाच हवी. अंगाचा जो भाग ओला राहातो तिथे मग जीवाणू वाढतात आणि दुर्गंधीची समस्या निर्माण होते. पाय ओलसर असताना सॉक्स बूट घालणे यामुळेही घाम आणि दुर्गंधीची समस्या निर्माण होते.

डीओडरण्टस आणि अ‍ॅण्टिपर्सपिरण्ट

आपल्या घामाचा वास येवू नये म्हणून डीओडरण्टस किंवा अ‍ॅण्टिपर्सपिरण्ट वापरण्याचा पर्याय आपल्याकडे आहे. पण आपल्यासाठी म्हणून दोघांपैकी एकाची निवड करायची असल्यास या दोघांमधला फरक आधी समजून घ्यायला हवा. डीओडरण्टस हे घामावर सुगंधी वासाचं वेष्टण चढवतात तर अ‍ॅण्टिपर्सपिरण्ट हे घाम नियंत्रित करतात. आपल्याला अगदी कमी घाम येत असेल तर नुसत्या सुगंधासाठी म्हणून डीओडरण्टस वापरलं तरी चालतं पण जर घामच खूप येत असेल तर मग सुगंधापेक्षाही समस्या नियंत्रित करण्यावर भर द्यायला हवा. अति घाम येणा-यानी डीओडरण्टस ऐवजी अ‍ॅण्टिपर्सपिरण्ट वापरायला महत्त्व द्यायला हवं.

काय खातो हे बघा!

घामाला वास येण्याची समस्या असेल तर त्या संबंध आहाराशीही असू शकतो. त्यामुळे आपण काय खातो याकडेही लक्ष द्यायला हवं. अतिमसालेदार, तिखट, कांदा, लसूण यांचं अतिप्रमाण, चहा, कॉफी, अल्कोहोल यांचं अतिसेवन यामुळेही घामाला वास येतो. या पदार्थांवर नियंत्रण आणलं तरी समस्या सुटू शकते.

  

लिंबाचा रस

लिंबामुळे जीवाणूंची वाढ नियंत्रणात राहाते. लिंबू सहज उपलब्धही असतं. लिंबाचा रस काढून तो थोड्या पाण्यात मिसळून हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं. आणि हा स्प्रे शरीरात ज्या भागात जास्त घाम येतो तिथे आंघोळीआधी मारावा. स्प्रेचं पाणी कोरडं होवू द्यावं आणि मग आंघोळ करावी. यामुळे घाम आणि घामाचा वास दोन्ही नियंत्रणात राहातं.

अ‍ॅपल सायडर

अ‍ॅपल सायडर हे अ‍ॅण्टिसेप्टिक म्हणूनही काम करतं. जीवाणूंच्या वाढीवर अ‍ॅपल सायडर नियंत्रण आणतं. आंघोळीआधी कापसाचा बोळा अ‍ॅपल सायडरमध्ये बुडवून तो घाम येण्याच्या ठिकाणी लावावा. आणि नंतर आंघोळ करावी. अ‍ॅपल सायडर सगळ्यांनाच चालतं असं नाही तर काहींना त्याची अ‍ॅलर्जीही येवू शकते. त्यामुळे आधी टेस्ट घेवूनचे नंतर त्याचा उपयोग करायला हवा.

पायांची काळजी घ्या

पायाला येणा-या घामाचा खूप वास येतो. पायात घातल्या जाणा-या सॉक्समुळे तर यासमस्येत जास्त भरच पडते. घाम शोषून घेणा-या सॉक्सपेक्षा कॉटन सॉक्स वापरावेत. पायांच्या तळव्यांना भेगा असतील तर त्यात घाण साठते आणि तिथे जीवाणूंची वाढ होते. हे जीवाणू घाम आणि घामाच्या दुर्गंधीचे कारण ठरतात. तेव्हा पायांना भेगा असतील तर त्यावर आधी उपाय करावा. पाय हे दगडानं घासून स्वच्छ करावेत. सतत पायात सॉक्स आणि बूट नसावेत.अनवाणी पायांनी थोडं रोज चालायला हवं. यामुळे पायांना मोकळा श्वास घ्यायला मिळतो.

भरपूर पाणी प्या

आपण पुरेसं पाणी पित आहोत ना याकडेही लक्ष द्यावं. कारण पाणी पुरेसं प्यायलं तरच त्वचा छान ओलसर आणि सुदृढ राहाते. शरीरातील टॉक्सिन्स पाण्यामुळेच बाहेर पडतात. आणि टॉक्सिन्स बाहेर पडले तर मग अती घामाचा आणि घामाच्या दुर्गंधीचा प्रश्नच येत नाही.


Web Title: There is easy solution on the smell of sweat and sweat!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.