ठळक मुद्दे* खांद्याला केवळ एखाद्या कॅपप्रमाणे झाकणा-या कप बाह्या अत्यंत स्मार्ट दिसतात.* फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे दिसणा-या पेटल बाह्या आकर्षक पद्धतीनं शिवलेल्या असतात.

- मोहिनी घारपुरे-देशमुख


फॅशनच्या जगात ड्रेसच्या बाह्यांनाही खूप महत्त्वं असतं. दरवेळेला जो ट्रेण्ड असतो त्यानुरूप आपण आपल्या ड्रेसच्या बाहया शिवून घेतो. कधी क्रिसक्रॉस , तर कधी फुगा बाह्या, कधी बेल स्लीव्हज तर कधी थ्री फोर्थ स्लीव्हज.

फॅशन जगतात एकेका ड्रेसच्या बनावटीकरिता इतकी प्रचंड मेहेनत आणि इतकी प्रचंड कल्पकता वापरली जाते की विचारू नका. आणि त्याचाच परिणाम म्हणजे शेकडो प्रकारचे आपण वापरत असलेले कपडे. एका स्टाइलचा कंटाळा आला तर ही घ्या दुसरी स्टाइल ट्राय करा, एका टाइपचा कंटाळा आला तर हे घ्या नवं काहीतरी वापरून पहा असं सतत आपल्यासमोर शेकडो पर्याय ठेवत फॅशन जगत सज्ज असतं.

साध्या बाह्यांचच उदाहरण घ्या ना, जसं कॉलरमध्ये प्रचंड व्हरायटी आहे तशीच बाह्यांमध्येही तब्बल चाळीसच्या आसपास प्रकार आहेत. शिवाय क्रिएटीव्हीटीला अंत नसतो या न्यायानं या बाह्यांमध्ये अनेक नवनवे क्रिएटिव्ह प्रकारही खुद्द शिवणारा स्वत:च्या मनानं आणि स्वत:च्या कल्पकतेनं करू शकतो.

1. रेग्लान बाह्या - काखेपासून छातीपर्यंत तिरक्या आकारातून या बाह्या पुढे हाताच्या कोपरापर्यंत शिवलेल्या असतात.

2. कॅप बाह्या - खांद्याला केवळ एखाद्या कॅपप्रमाणे झाकणा-या या बाह्या अत्यंत स्मार्ट दिसतात. या बाह्यांना आतून कॅनव्हास लावून कडकपणा दिला जातो. यामुळे टोपीला ज्याप्रमाणे पुढल्या बाजूनं कपाळाच्यासमोरचा भाग असतो त्याप्रमाणे या बाह्या दिसतात.

3. ब्रेसलेट बाह्या - मनगटं आणि कोपर या दरम्यानपर्यंत लांब अशा या बाह्या असतात, थोडक्यात याच बाह्यांना थ्री फोर्थ असंही प्रचलित नाव आहे.

 

4. लँटर्न बाह्या - दोन भाग असलेल्या या लांब बाह्या असतात. लांब आणि छोट्या अशा दोन्हीही प्रकारात या बाह्या शिवता येतात. या प्रकारात एकावर एक असे दोन फ्लेअर्स शिवून साधारणत: कंदीलाचा आकार बाह्यांना दिला जातो.
 

5. मटन स्लीव्हज- मेंढ्याच्या पायाच्या आकाराच्या बाह्या.  मटन स्लीव्हज. अगदी शब्दश: मेंढ्याच्या पायाचाच आकार या बाह्यांना दिलेला असतो.
 

6. ज्युलिएट बाह्या - मटन स्लीव्ह्जलाच पुढे वाढवत नेले जाते आणि हाताच्या खालच्या भागाला, कोपराकडे येताना अगदी हाताच्या मापात फिटींगची बाही शिवली जाते.

 

 

7. बेल बाह्या - काही वर्षांपूर्वी या प्रकारच्या बाह्यांची खूप फॅशन आली होती. यामध्ये लांब आणि छोट्या अशा दोन्हीही प्रकारात या बाह्या शिवल्या जातात. एखाद्या घंटेच्या आकारप्रमाणे बाह्यांचा आकार असतो. आवडीप्रमाणे तो मोठा वा छोटा शिवता येतो.

8. फ्रीलच्या बाह्या - कोपरापर्यंत लांब आणि कोपरापासून पुढे वेगवेगळ्या आकारात फ्रील जोडली जाते. विशेषत: जीन्सवर किंवा स्कर्टवर घालावयाच्या टॉप्सना अशा प्रकारच्या स्लीव्हज शोभून दिसतात.

9. पॅगोडा बाह्या - खांद्यापासून कोपराच्या खालपर्यंत फिटींगची बाही आणि हाताच्या पंजावर एक- दोन किंवा त्याहून अधिक लेयर्सच्या फ्रिल्स अशापद्धतीने साधारणत: या बाह्या शिवल्या जातात.

 

10. बिशॉप बाह्या - वरच्या बाजूनं फिटींगच्या आणि मनगटापाशी फ्लेअर करून शिवाय कफद्वारे मनगटाभोवती गोलाकार फिटींगमध्ये जोडलेल्या अशा काहीशा या बाह्या असतात.

11. चौकोनी बाह्या - या बाह्या काखेपाशी चौकोनी आकारातून जोडलेल्या असतात आणि पुढे कोपराच्या काहीशा वरपर्यंत चौकोनी आकारात शिवलेल्या असतात.

12. पेटल बाह्या - फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे या बाह्या अत्यंत आकर्षक पद्धतीनं शिवलेल्या असतात. विशेषत: नेट किंवा ट्यूल वगैरेच्या तलम कपड्याच्या या बाह्या शिवल्या तर अधिक सुंदर आणि नाजूक दिसतात.

 

13. मार्माल्यूक किंवा व्हर्गो बाह्या - या बाह्या कोपरापर्यंत लांब असतात आणि प्रत्येक बाहीला पाच भाग केलेले असतात.

14. बटरफ्लाय बाह्या - या बाह्यांना वरच्या बाजुनं पफ असतो आणि नंतर कोपराच्या काहीशा वरपर्यंत त्या बेल आकारात असतात. फुलपाखरांच्या पंखाचीच कन्सेप्ट येथे लागू होते.

 

 

15. कोल्ड शोल्डर बाह्या - या बाह्यांची तर सध्या प्रचंड लाट आहे. या बाह्या अत्यंत आकर्षक लूक देतात.