डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळ हमखास जातील फक्त हे करून पाहा!

By Madhuri.pethkar | Published: September 14, 2017 06:28 PM2017-09-14T18:28:07+5:302017-09-15T16:35:09+5:30

डोळ्यांभोवतीची ही काळी वर्तुळे जाण्यासाठी नियमित उपचार करावे लागतात. अर्थात उपचाराचा परिणाम दिसण्यासाठी खूपच संयम ठेवावा लागतो. हे उपचार करण्यासाठी कोणत्याही क्लिनिकमध्ये किंवा पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. घरच्याघरी हे उपचार करता येतात.

must try this to remove dark circles around eyes | डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळ हमखास जातील फक्त हे करून पाहा!

डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळ हमखास जातील फक्त हे करून पाहा!

ठळक मुद्दे* डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळ घालवायची असतील तर आधी ती का आली असतील याचा विचार केला तर उपचारांना योग्य दिशा मिळते.* डोळ्यांखालची काळी वर्तुळं याची कारणं मुख्यत: शरीराच्या आत असतात. ही यंत्रणा दुरूस्त करण्यासाठी पुरेसं पाणी, योग्य आहार, व्यायाम, योग, प्राणायाम या गोष्टींवर आधी भर द्यावा आणि त्यासोबत मग बाह्य उपचार केलेत तर कमी वेळात योग्य परिणाम दिसून येतात.

- माधुरी पेठकर


डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळ. ती दिसू नये म्हणून किती खटाटोप केला जातो. पण एवढाच खटाटोप ही काळी वर्तुळ झाकण्यापेक्षा ती तयार होणार नाहीत यासाठी केला तर..डोळ्यांभोवतीची ही काळी वर्तुळं तुम्हाला तरूण वयात वयस्कर दाखवतात. या काळ्या वर्तुळांमुळे समोरच्याला तुम्ही थकलेले किंवा आजारी भासतात. मेकअपनं काळी वर्तुळ झाकता येत असली तरी हा त्याच्यावरचा योग्य उपाय नव्हे.
डोळ्यांभोवतीची ही काळी वर्तुळे जाण्यासाठी नियमित उपचार करावे लागतात. अर्थात उपचाराचा परिणाम दिसण्यासाठी खूपच संयम ठेवावा लागतो. कारण रात्री उपचार केले आणि सकाळी परिणाम दिसले असं होत नाही. उपचारामध्ये दीर्घकाळपर्यंत सातत्य असलं तरच डोळ्यांभोवतीची ही काळी वर्तुळ निघून जातात. हे उपचार करण्यासाठी कोणत्याही क्लिनिकमध्ये किंवा पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. घरच्याघरी हे उपचार करता येतात.

 



आधी कारणं समजून घ्या..

डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळ घालवायची असतील तर आधी ती का आली असतील याचा विचार केला तर उपचारांना योग्य दिशा मिळते.
* योग्य प्रमाणात पाणी प्यायलं नाही तर मग शरीरातील विषारी घटक बाहेर पडत नाही. त्याचाच परिणाम म्हणजे डोळ्याखाली काळी वर्तुळं आकार घेतात. रोज दहा ते बारा ग्लास पाणी प्यायला हवं.
* रक्तातील हिमोग्लोबीन कमी झालं असल्यास काळी वर्तुळं येतात. त्यामुळे आधी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेवून हिमोग्लोबीन किती आहे हे बघायला हवं.
* कधी कधी आपल्याडून कोणताच प्रॉब्लेम नसतो पण हे होतं याला कारण म्हणजे अनुवांशिकता. काळी वर्तुळं ही अनुवांशिकतेमुळेही येतात. हे कारण असेल तर उपचारांमध्ये प्रचंड सातत्य ठेवावं लागतं. आणि अशा केसेसमध्ये काळी वर्तुळ निघून जात नाही पण त्यांची तीवता मात्र नक्कीच कमी होते.
* अपुरी झोप झाल्यास, अती विचारामुळे झोप लागत नसल्यास, रात्री वेळी अवेळी जाग येत असल्यास त्याचा परिणाम म्हणून काळी वर्तुळ येतात.
* अती ताण असल्यास झोपेवर परिणाम होतो. आणि ताणाचा परिणाम मग डोळ्याखाली दिसू लागतो.
* फास्ट फूड खाणं, नीट जेवण न करणं, संपूर्ण आणि पोषक आहार न घेणं यामुळे शरीरात जीवनसत्त्वं , क्षार आणि खनिजांची कमतरता निर्माण होवून काळी वर्तुळं येतात.
* एखादा मोठा आजार झाला असल्यास, दीर्घकाळ आजारी असल्यास डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतात. शरीरातील अशक्तपणा जसा कमी होईल तशी ही काळी वर्तुळं कमी होतात. यासाठी अर्थातच योग्य आहार, आराम आणि व्यायामाची गरज असते.
* खूप काळ कम्प्यूटरसमोर बसून राहिल्यास डोळ्यांवर अती ताण येतो. डोळे थकतात आणि त्याचा परिणाम म्हणजे डोळ्याखाली काळी वर्तुळ येतात.

 

उपचार करण्याआधी

डोळ्यांखालची काळी वर्तुळं याची कारणं मुख्यत: शरीराच्या आत असतात. ही यंत्रणा दुरूस्त करण्यासाठी पुरेसं पाणी, योग्य आहार, व्यायाम, योग, प्राणायाम या गोष्टींवर आधी भर द्यावा आणि त्यासोबत मग बाह्य उपचार केलेत तर कमी वेळात योग्य परिणाम दिसून येतात.
 

 

 

 

डार्क सर्कलवरचे सोपे उपाय 

 

1) मसाज

खोब-याचं आणि बदामाच तेल एकत्र करून त्यानं काळ्या वर्तुळावर हलक्या हातानं मसाज करावा. एक तास हे तेल चेहे-यावर राहू द्यावं. तासाभरानं चेहेरा कोमट पाण्यानं पुसावा आणि नंतर धुवावा.
2) लेप

ओलं खोबरं, लिंबाचा रस, दोन चमचे किसलेली काकडी, एक चमचा साय , तीन चमचे चिनी माती घेवून त्याचं मिश्रण तयार करावं. हे मिश्रण थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवावं. कापसाच्या बोळ्यानं ते डोळ्याभोवती लावावं. लेप वाळेपर्यंत छान आराम करावा. आणि वीस मीनिटानंतर पाणी आणि दूध एकत्र करून त्यानं लेप स्वच्छ करावा.

3) टोमॅटो आय टोनर

लिंबाचा रस आणि टोमॅटोचा रस एकत्र करावा. आणि या मिश्रणानं डोळ्याभोवतीच्या काळ्या वर्तुळावर मसाज कराव. वीस मीनिटानंतर थोडं नारळ पाणी घेवून त्यानं हे टोनर पुसून काढावं.

4) बटाटा
बटाटा किसून त्याचा रस काळ्या वर्तुळाभोवती लावावा. किंवा बटाटाच्या चकत्या ठेव्याव्या. त्याचाही फायदा होतो.

5) हर्बल चहा

अनेकजण आरोग्यदायी म्हणून हर्बल टी घेतात. हर्बल चहा बनवल्यानंतर त्या टी बॅग्ज टाकून न देता त्या फ्रीजमध्ये ठेवाव्या. आणि जेव्हा डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळावर मसाज करतो तो झाल्यानंतर त्या टी बॅग्ज डोळ्यांभोवती फिरवाव्या. याचाही सकारात्मक परिणाम होतो. काळी वर्तुळ कमी होतात.

 

 

Web Title: must try this to remove dark circles around eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.