ट्रेण्डी दिसायचय मग साडी नेसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 05:52 PM2017-07-26T17:52:19+5:302017-07-26T18:14:26+5:30

साडी नेसणं हे आता फॅशन स्टेटमेण्ट झालं आहे. फॅशन म्हणून साडी कधीही आउट डेटेड झाली नाही उलट ती अपडेटच होतेय.

Looking trendy with saree fashion | ट्रेण्डी दिसायचय मग साडी नेसा!

ट्रेण्डी दिसायचय मग साडी नेसा!

googlenewsNext
ठळक मुद्दे* साडी ही भारतीय स्त्रियांना एकत्र बांधणारा समान धागा आहे .* पारंपरिक साड्याच नव्हे तर आधुनिक पद्धतीच्या कृत्रिम धाग्यापासून बनलेल्या, परदेशी पध्दतीच्या कलाकुसरीचा प्रभाव असलेल्या डिझायनर साड्या अलीकडे लोकप्रिय आहेत.* सांड्यांच्या विश्वामध्ये अलीकडे ‘बॉलीवूड साडी’ हा नवा ट्रेण्ड साड्यांच्या फॅशन विश्वात रुढ झाला आहे.


सुनिता विग

साडी ही भारतीय स्त्रियांची ओळखच नसून जगभरातील सर्वच देशातील स्त्रियांनी साडीमधील सौंदर्य ओळखलं आहे. आज जगभरात फॅशनच्या दुनियेमध्ये ही साडी लोकप्रिय आहे. कधी पारंपरिक पद्धतीनं तर कधी इंडोवेस्टर्न पद्धतीनं फॅशनच्या जगात ‘साडी’ची छाप पडलेली आहे. स्त्रिया मग त्या हाय क्लासवाल्या असो किंवा मध्यम (मिडल) क्लासमधल्या. साडीचा मोह कुणालाच आवरता येत नाही.
भारतात गेल्या शेकडो वर्षापासून स्त्रिया साडी नेसतात. पण तिचं वैशिष्ट्य हे की तिनं दैनंदिन जीवनातून फॅशनच्या जगात झेप घेतली. आणि फॅशन म्हणून साडी कधीही आउट डेटेड झाली नाही उलट ती अपडेटच होतेय.
भले रोजच्या कामात सुटसुटीत, सोयीचं वाटतं म्हणून अलीकडच्या काळात बर्याच स्त्रिया, तरुण मुली सलवार-कमीज, पाश्चात्य कपडे वापरत असले तरी त्यामुळे साडीचं महत्व किंवा स्त्रियांच्या मनातलं साडीचं स्थान आणि आवड यामध्ये किंचितही फरक पडलेला नाही. सणवार किंवा लग्नसमारंभामध्ये भारतीय स्त्रियांची पहिली पसंती साडीलाच असते आणि दुसरं म्हणजे सदासर्वकाळ फक्त साडीच नेसणार्या  स्त्रियांची संख्याही भारतात पुष्कळ आहे. इतकच नाही तर तरुण स्त्रियांमध्ये साडी विथ स्लिव्हलेस ब्लाऊज, हॉलटर ब्लॉऊज बरोबर साडी खूपच फेमस आहे आणि म्हणूनच सोशल नेटवर्किंग साईटसवर हंड्रेड साडी फॅक्ट’ सारखे उपक्रम किंवा साडीची आवड असणार्या  स्त्रियांचे विविध ग्रुप्स तयार होऊ लागले आहेत. अशा ग्रुप्सना विविध वयोगटातील निरनिराळी आर्थिक-सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या स्त्रियांचा मिळणारा प्रतिसाद पाहता साडी ही भारतीय स्त्रियांना एकत्र बांधणारा समान धागा आहे याची प्रचिती येते.


 

नेसण्यातली विविधता

भारतात साडी वेगवेगळ्या पद्धतीनं नेसली जाते उत्तर भारतात सर्व साधारणपणे आपण ज्याला गुजराती पद्धतीची म्हणतो तशी उलट्या पदराची साडी, , महाराष्ट्रामध्ये काष्टा घालून नऊवारी, किंवा गोल नेसली जाणारी सहावारी, आसममध्ये मेखला चादोर ही टू-पीस साडी तर किल्ल्यांचा जुडगा बांधलेला पदर ऐटीत खांद्यावर टाकणारी निराळी पद्धतीची बंंगाली साडी! असे अनेक प्रकार आहेत साडी नेसण्याचे. त्यामुळे साडी हा एक प्रकार असला तरी तिची रूपं मात्र अनेक आहेत.
आताच्या  ट्रेण्डनुसार वैशिष्टयपूर्ण साडी नेसण्याच्या पद्धती बर्याच कमी झालेल्या आहेत. आता बहुतेक सगळीकडे एकाच पद्धतीनं साडी नसेली जात असली तरी त्यामध्येही कमालीचं वैविध्य दिसून येतं.

प्रांतोप्रंतीची साडी

भारतात बहुतेक प्रत्येक प्रांताच्या खासियत असलेल्या साड्या आहेत. या पारंपारिक साड्या मुख्यत: सुती किंवा रेशमी धाग्यापासून विणल्या जात असल्या तरी प्रत्येक प्रांतागणिक त्या विणण्याची, त्यावर कलाकुसरीची नक्षीकामाची पद्धत वेगवेगळी आहे. हातमागावर साड्या विणण्याच्या कलेला तर हजारो वर्षांच्या इतिहास आहे. जुन्या काळात अशा विणकरांना काही तत्कालीन राज्यकर्त्यांनी आश्रय दिला त्यामुळे विणकरांच्या अनेक पिढ्यांनी ही कला नुसती टिकवली नाही तर त्यामध्ये नवे बदलही केलेत. त्यात नवनविन डिझाइन्सही आणल्या. उदाहरणार्थ महाराष्ट्राची पैठणी, तामिळनाडूची कांजीवरम्, माळवा प्रांतातली माहेश्वरी किंवा चंदेरी, उत्तरप्रदेशची बनारसी, ओडिशाची संबळपुरी, बंगालची जामदनी किंवा नुसत्या धावदोर्यासारख्या साध्या टाक्याची सुरेख कलाकुसर असलेली कांथावर्कची साडी असे भारतीय साड्यांचे प्रकार सांगावेत तेवढे थोडेच आहे. अशी प्रत्येक राज्यातील खासियत असलेली किमान एक तरी साडी आपल्या वॉर्डरोबमध्ये असली तर रोज साडी नेसावी लागली तरी कोणाला कंटाळा येणार नाही.
पारंपरिक साड्याच नव्हे तर आधुनिक पद्धतीच्या कृत्रिम धाग्यापासून बनलेल्या, परदेशी पध्दतीच्या कलाकुसरीचा प्रभाव असलेल्या डिझायनर साड्या अलीकडे लोकप्रिय आहेत. याचं श्रेय हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलीवूडला द्यावं लागेल. सिनेतारकांच्या साड्या विषयी महिलावर्गात कमालीचं औत्सुक्य असतं. त्यातून साडीच्या अन त्यावरच्या फॅशनेबल ब्लाऊजच्या अनेक फॅशन येतात याचं श्रेय सिनेतारकांबरोबरच त्यांच्या ड्रेस डिझायनर्सनाही जात.


 

बॉलीवूडची साडी

केवळ देशातच नव्हे तर परदेशातही  चित्रपट महोत्सवांमध्ये खास डिझाईन केलेल्या साड्या नेसून परदेशी लोकही जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. परदेशातही साडीला पसंतीची पावती मिळू लागली आहे त्याचं श्रेय हे बॉलिवूड कलाकार आणि त्यांचे साडी डिझाइनर्स यांना जातं. त्यामुळे सांड्यांच्या विश्वामध्ये अलीकडे ‘बॉलीवूड साडी’ हा नवा ट्रेण्ड साड्यांच्या फॅशन विश्वात रूढ झाला आहे.

अनेक प्रकारच्या फॅब्रिक आणि फॅशनमध्ये साडी उपलब्ध आहे. बॉलीवूडची साडी ही रोजच्या वापरातली असू देत किंवा लग्न समारंभासाठीची ठेवणीतली असू देत बॉलीवूड साडी ही प्रत्येक प्रकारात देखणीय आहे. बॉलीवूड साडी ही काही छापा पध्दतीची त्याच त्याच प्रकारची नसते तर प्रत्येक प्रकारात तिचा थाटमाट वेगळाच असतो. पूर्वी बॉलीवूड साडी ही फॅशनच्या जगात रेड कार्पेटवर, लग्नसमारंभात मिरवण्यासाठीची साडी होती. खास, देखणी डिझायनर आणि महाग. पण आता सर्वांना परवडेल अशा रेंजमध्ये आणि साध्या पण देखण्या स्वरूपातही बॉलीवूडची साडी उपलब्ध आहे. बॉलीवूडची साडी म्हणजे डिझायनर साडी. पूर्वी या साड्या फक्त पाहण्यापुरत्याच होत्या. पण हल्लीच्या मुली स्वत:च्या लग्नात बॉलीवूडमधल्या साड्या खास डिझाइन करून घेत आहेत. डिझायनर साड्या या शिफॉन, जॉर्जेट, व्हिसकोस, जॅक्वार्ड, क्रेप, स्किल्क आणि व्हेल्वेट, म्हैसूर सिल्क, कसावू, चंदेरी या प्रकारात उपलब्ध आहेत.

लग्नातल्या फॅशनपासून रोजच्या वापरायच्या साड्यांपर्यंत प्रत्येक प्रकार सध्या बॉलीवूड साडीमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे बॉलीवूड साडीची फॅशन आता फक्त बघण्यासाठीच नसून करण्यासाठीही उपलब्ध आहे.
साडी नेसणं हे आता फॅशन स्टेटमेण्ट झालं आहे. त्यामुळे  ट्रेण्डी राहायचं असेल तर साडी नेसली तरी चालेल.


( लेखिका फॅशन डिझायनर आहेत. )

Web Title: Looking trendy with saree fashion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.