ठळक मुद्दे* डेकोलाइट नेकलाइन अत्यंत डीप अशी ही नेकलाइन अत्यंत आकर्षक दिसते.* पार्टीवेअर गाऊन्स किंवा पार्टीवेअर वेस्टर्न आऊटफीट्सला वन शोल्डर नेकलाइन्स हमखास पहायला मिळतात.* सध्या तर आॅफशोल्डर नेकलाइनचा ट्रेण्डच आहे.

-मोहिनी घारपुरे-देशमुख

एखाद्या पोषाखाचं सौंदर्य त्या पोषाखाच्या नेकलाइनवरही अवलंबून असतं. फॅशन जगतात नेकलाइन्सच्या चिक्कार, म्हणजे अगदी 60 पेक्षाही अधिक स्टाइल्स पहायला मिळतात. कल्पकतेचा वापर करून तर वेगवेगळ्या प्रकारच्या नेकलाइन्सही निरनिराळ्या पोषाखांसाठी शिवलेल्या दिसतात.

एरवी, गोल, चौकोनी, व्ही नेक, यू नेक, बोट नेक वगैरे प्रकारच्या नेकलाइन्स फार प्रचलित आहेत. मात्र,  ड्रेस आकर्षक करायचा असेल तर काही विशेष प्रकारच्या नेकलाइन्सही शिवता येतात.

1. की होल नेकलाइन - स्लीव्हलेस ड्रेसला किंवा ब्लाऊजलाही अशी नेकलाइन फार शोभून दिसते. स्टॅण्ड कॉलर किंवा मागचा गोल गळा आणि पुढच्या बाजूने केवळ की होल एवढाच भाग, मग तो गोल किंवा अंडाकृती किंवा, टीअर शेप, बदामी वगैरे आकारात ओपन असेल अशा पद्धतीनं हा गळा दिसतो.

2. स्ट्रॅपलेस नेकलाइन - बाह्या नाहीत आणि खांदेही उघडे, अर्थात थेट तुमच्या छातीपासून सुरू होणारा पोषाख, मग तो एखादा पार्टीवेअर गाऊन असो, किंवा एखादा टॉप, अशा पोषाखांना स्ट्रॅपलेस नेकलाइन शिवली जाते. या नेकलाइन्सला कोणताही आकार देता येऊ शकतो.

3. हॉल्टर नेकलाइन - यामध्ये हॉल्टर नेकलाइन विथ स्ट्रॅप्स आणि विदाऊट स्ट्रॅप्स असे दोन प्रकार आहेत. विथ स्ट्रॅप्स असलेल्या हॉल्टर नेकची स्टाइल फार बूम मध्ये असते. समोरच्या बाजूनं तिरक्या आकारातून मानेभोवती मागे बांधता येतील असे स्ट्रॅप्स या गळ्याला असतात. यामुळे पाठीचा भाग उघडा पडतो अशी काहीशी या स्टाइलची खासियत आहे. विदाऊट स्ट्रॅपवाल्या हॉल्टर नेकमध्ये पुढच्या बाजूने पोलो नेक किंवा स्टॅण्ड कॉलरस्टाइल गळा केला जातो.

4. डेकोलाइट नेकलाइन - अत्यंत डीप अशी ही नेकलाइन अत्यंत आकर्षक दिसते. खांद्यापासून ते थेट छातीपर्यंत, अगदी तुमच्या क्लीव्हेजपर्यंत खाली जाणारा हा गळा अत्यंत आकर्षक दिसतो. कधीकधी तर खांद्याच्याही बाजूने हा गळा फार जास्त कापून  ड्रेसला अधिकच आकर्षक केलेलं असतं.

5. वन शोल्डर नेकलाइन - पार्टीवेअर गाऊन्स किंवा पार्टीवेअर वेस्टर्न आऊटफीट्सला अशा पद्धतीच्या नेकलाइन्स हमखास पहायला मिळतात. एकाच बाजूने खांदा शिवलेला असतो तर दुस-या बाजूने गळा मोकळाच असतो अशा पद्धतीने या नेकलाइन दिसतात.

6. स्ट्रॅप नेकलाइन - या प्रकारच्या नेकलाइनमध्ये खांद्यांच्या जागी बारीकसे स्ट्रॅप्स असतात अन छातीच्या बाजूला सरळ रेषेत पोषाखाचा गळा शिवलेला असतो.

7. आॅफशोल्डर नेकलाइन - सध्या तर या प्रकारच्या नेकलाइनचा ट्रेण्डच आहे. खांद्यापासून काही इंच खाली उतरता गळा, आणि छातीच्या भागावरून काहीसा कर्व्ह घेत अर्धगोलाकारात वळणारा अशा पद्धतीने ही नेकलाइन शिवली जाते.

8. रफल्ड नेकलाइन - या नेकलाइन्सला रफल्स अर्थात झालर लावलेली असते. बरेचदा, मूळ पोषाखाचा कपडा जाड आणि गळ्यापाशी रफल्ससाठी मात्र तलम कपडा वापरून पोषाखाचं सौंदर्य आणखी खुलवलं जातं. म्हणजे समजा व्ही आकाराचा गळा मुख्य पोषाखाचा आणि त्याच व्ही आकाराच्या गळ्यावर पुन्हा ट्यूल किंवा नेटच्या कापडाच्या सहाय्याने केलेली झालर यामुळे गळा ते छाती एवढाच भाग प्रचंड मादक दिसेल अशा पद्धतीने या नेकलाइन शिवल्या जातात.

9. वाइड स्क्वेअर नेकलाइन - चौकोनीच गळा परंतु काहीसा अधिक खोल आणि रूंद अशा पद्धतीने शिवला जातो.

10. असिमेट्रीक नेकलाइन्स - यामध्ये तर चिक्कार प्रकार शिवणारा आपल्या मनाने, आपल्या कल्पकतेने करतो. एकंदर गळ्याचा इम्पॅक्ट फार सुंदर, आकर्षक दिसला पाहिजे मग आकार कसाही किंवा कोणताही का असेना एवढीच या नेकलाइनची जेमतेम अट.