सलमान खानचे लग्न कधी होणार, हा प्रश्न त्याच्या फॅन्सना नेहमीच पडलेला असतो. सलमानच्या लग्नाप्रमाणेच पोपटलालचे लग्न कधी होणार, हादेखील सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सुरू होऊन आता जवळजवळ आठ वर्षे झाली आहेत. या मालिकेत पोपटलालची एंट्री झाल्यापासूनच माझे लग्न करून द्या, असे तो त्याच्या गोकुळधाममधील मित्र-मैत्रिणींना सांगत आहे. हा पत्रकार पोपटलाल कोणतीही चांगली मुलगी दिसली की, तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्यासोबत लग्न करण्याची स्वप्ने पाहू लागतो. त्या वेळी आपल्यालादेखील आता पोपटलालचे लग्न होणारच असेच वाटते, पण दरवेळी त्याच्या लग्नात काहीतरी व्यत्यय येतो आणि त्याचे लग्न होत नाही. एकदा तर पोपटलाल लग्नाच्या मंडपापर्यंतदेखील पोहोचला होता, पण त्याही वेळेस त्याचे लग्न करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कारण त्या मुलीचे दुसऱ्या मुलावर प्रेम होते. त्यामुळे पोपटलालनेच स्वखुशीने तिचे लग्न त्या मुलाशी लावून दिले. आतादेखील पुढील काही भागांमध्ये पोपटलालसाठी एक स्थळ आल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्थळ आल्यावर लग्नासाठी उतावीळ असलेला पोपटलाल अतिशय खूश होणार आहे, हे वेगळे सांगण्याची गरजच नाही, पण या वेळेसदेखील पोपटलाल काही बोहल्यावर चढणार नसून, त्याचे स्वप्न अपुरेच राहणार आहे, असे कळतेय. त्यामुळे पोपटलालचे लग्न पाहाण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस अजून वाट पाहावी लागणार आहे, यात काही शंकाच नाही.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.