जीवनात जर आव्हानं नसतील तर त्या आयुष्याला तरी काय अर्थ आहे? ‘बी टाऊन’ चे सेलिब्रिटी देखील या आव्हानांपासून वाचू शकलेले नाहीत. मग ती आव्हानं कसलीही असोत... बॉलिवूडचे अनेक नायक-नायिका अशाही आहेत की, ज्यांना त्यांच्या स्वभावाविरोधात जाऊन काही भूमिका साकाराव्या लागल्या. आजपर्यंत ज्या भूमिका कलाकारांनी त्यांच्या स्वभावाविरूद्ध जाऊन साकारल्या त्या अजरामर झाल्या. ‘बी टाऊन’चे असे कोणकोणते कलाकार आहेत ज्यांनी अशाप्रकारे त्यांच्या स्वभावाविरूद्ध भूमिका केल्या आणि त्यांना अनेक हिट्स मिळाले. पाहुयात, त्यांच्या स्वभावाविरोधातील या खडतर प्रवासाचा हा आढावा...


रितेश देशमुख :
कै.विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला तो ‘तुझे मेरी कसम’ मधून. आर्किटेक्चर क्षेत्रात करिअर करण्याचा विचार असणाऱ्या रितेशला बॉलिवूडचा ब्रेक मिळाला अन् त्याने सिनेसृष्टीचा प्रवास सुरू केला. गंभीर, समंजस भूमिकांच्या शोधात असणाऱ्या रितेशला बॉलिवूडमध्ये मिळाल्या रोमँटिक आणि कॉमेडी भूमिका. पण, समोर आलेल्या आव्हानाला घाबरून न जाता त्याने कॉमेडी भूमिका करायचे ठरवले. ‘हाऊसफुल्ल’ सीरिज, ‘तेरे नाल लव्ह हो गया’ ,‘धम्माल’,‘क्या कूल हैं हम’ अशा अनेक रॉमकॉम चित्रपटांत त्याने काम केलं. रितेशला आज ‘कॉमिक हिरो’ म्हणूनच जास्त पसंत केलं जातं.

प्रियांका चोप्रा :
‘क्वांटिको’ आणि ‘बेवॉच’ या हॉलिवूडच्या दोन प्रोजेक्टसमुळे प्रियांका चोप्रा जगाच्या पाठीवर एक प्रसिद्ध व्यक्तीरेखा बनली आहे. इंजिनियर होऊ इच्छिणाऱ्या आणि स्वभावाने शांत, सुस्वभावी, लाजाळू असणाऱ्या प्रियांकाला ‘द हिरो’ च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली. प्रत्येक संधीला आव्हान म्हणून स्वीकारणाऱ्या पीसीला एकामागोमाग एक सिनेमे मिळू लागले. ‘डॉन’ चित्रपटापासून तिने तिच्या व्यक्तीमत्त्वात बदल केला. आज ‘बेवॉच’ सारख्या हॉलिवूडपटात ती आघाडीचा अभिनेता ड्वेन जॉन्सनसोबत काम करते आहे. पाहता पाहता एक बोल्ड, गंभीर आणि आव्हानात्मक भूमिका स्वीकारणारी नायिका म्हणून तिची आज ओळख निर्माण झालीय. राष्ट्रीय पुरस्कार विजेती, आॅस्कर नामांकन मिळालेली अभिनेत्री म्हणून तिचा गौरव केला जातो.

जॉन अब्राहम :
एमबीए करून प्रामाणिकपणे नोकरीधंदा करण्याचा विचार जॉन अब्राहमचा होता. नायक होण्याचा कुठलाही विचार त्याच्या डोक्यात नव्हता. मात्र, मीडिया फर्ममध्ये काम करताना मॉडेलिंगचा हव्यास लागला आणि तो बॉलिवूडकडे केव्हा वळला तेच कळाले नाही. मुख्य भूमिका, रोमँटिक सीन्स यांसाठी धडपड करणाऱ्या जॉनला यश मिळाले ते खलनायकाच्या भूमिकांसाठीच. ‘धूम’ चित्रपटावेळी त्याला अभिषेक बच्चनने केलेली पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करावयाची होती. मात्र, दिग्दर्शकाने खलनायकाची भूमिका दिल्याने त्याचा स्वभाव, इच्छा डावलून ती भूमिका केली आणि त्या चित्रपटासाठी त्याला ‘बेस्ट निगेटिव्ह भूमिकांच्या कॅटेगरीसाठी फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मिळाला. ‘जिंदा’ ते ‘रॉकी हँडसम’ अशा प्रवासात अ‍ॅक्शन, थ्रिलर अशा भूमिकाच त्याच्या वाट्याला आल्या.

रणदीप हुडा :
‘सरबजीत’ या बायोपिकमधील उत्कृष्ट भूमिकेमुळे रणदीप हुडाचे नाव ‘बी टाऊन’ मध्ये चांगलंच गाजलं. त्याच्या अभिनयाचे कौतुक ज्येष्ठ कलाकार, समीक्षकांनी देखील केलं. पण, फार कमी जणांना हे ठाऊक आहे की, रणदीप हा अत्यंत शांत, सुस्वभावी आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाचा व्यक्ती आहे. त्याला बॉलिवूडमध्ये आल्यानंतर भूमिका मिळाल्या त्या सर्व हॉरर, थ्रिलर, रोमँटिक अशा स्वरूपाच्या. डॉक्टर होऊन समाजात नाव उज्ज्वल करण्याची रणदीपची इच्छा होती. मात्र, नशिबानं तो बॉलिवूडकडे वळला आणि बॉलिवूडलाही एक अष्टपैलू कलाकार प्राप्त झाला. ‘डरना जरूरी हैं’ ते ‘सरबजीत’ या अशा प्रवासात त्यानं समोर आलेल्या प्रत्येक भूमिकांना एक आव्हान म्हणून स्वीकारले.

अमिताभ बच्चन :
बॉलिवूडचे मेगास्टार, शहेनशाह, बिग बी अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्यांना सुरूवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये उत्कृष्ट अभिनेता म्हणून नाव कमवायचे होते. मात्र, बॉलिवूडमध्ये त्यांना अभिनेता म्हणून स्वीकारायलाच दिग्दर्शक तयार नसत. त्यांना मुख्य भूमिका मिळत नाहीत या विचारानेच ते बैचेन झाले. मात्र न डगमगता त्यांनी धीर सोडला नाही. स्वभावाने ‘अँग्री यंग मॅन’ असलेल्या अमितजींना भूमिका मिळवण्यासाठी सहनशक्ती ठेवून शांत रहावे लागले. गंभीर आणि शांत स्वभावाच्या अनेक भूमिका त्यांना कराव्या लागल्या.

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.