ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - "कटप्पाने बाहुबलीला का मारलं?", दोन वर्षांपूर्वीचं हे कोडं अखेर पुढील आठवड्यातील शुक्रवारी उलगडणार आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा "बाहुबली-2" द्वारे यामागील रहस्य सर्वांसमोर येणार आहे. मात्र रिलीज होण्यासाठी अगदी काहीच दिवस उरलेले असताना सिनेमा वादाच्या भोव-यात अडकला आहे. सिनेमामध्ये कटप्पाची भूमिका साकारणारे सत्यराज यांनी केलेल्या विधानामुळे सिनेमाच्या रिलीजला कर्नाटक कठोर विरोध दर्शवला जात आहे. 
 
काही वर्षांपूर्वी सत्यराज यांनी कन्नडिगांविरोधात वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर "बाहुबली 2" सिनेमाला विरोध दर्शवण्यात येत आहे. याप्रकरणी सिनेमाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी सत्यराज यांचा वाद आणि सिनेमाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यासाठी त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट करुन कर्नाटकवासियांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. "ज्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्याचा सिनेमाशी काहीही संबंध नाही. 2008 मध्ये सत्यराज यांनी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक वक्तव्य होते", असा आशय असलेला व्हिडीओ राजामौली सोशल मीडियावर शेअर केलाआहे.
 
राजामौली पुढे असंही म्हणाले आहेत की, "सत्यराज हे सिनेमाचे दिग्दर्शक किंवा निर्माते नाहीत, त्यामुळे सिनेमाच्या रिलीजमध्ये अडचणी निर्माण केल्यानं त्यांना काहीही नुकसान होणार नाही. यामुळे सिनेमावर बंदी आणणं  अयोग्य आहे".

 
नेमके काय आहे प्रकरण
2008 मध्ये तामिळनाडू-कर्नाटकमधील कावेरी नदी पाणी वाटप संघर्षादरम्यान कर्नाटकातील आंदोलनकर्त्याविरोधात सत्यराज यांनी विधान केल्याचे आरोप आहे. या आंदोलनादरम्यान सत्यराज यांनी कन्नडिगांचा "कुत्रे" असा उल्लेख केला होता. शिवाय, संघर्षादरम्यान सत्यराज यांनी तामिळनाडूतील शेतक-यांना पाठिंबा दर्शवला.  
 
याप्रकरणी "जोपर्यंत सत्यराज माफी मागत नाहीत, तोपर्यंत बाहुबली 2 सिनेमा कर्नाटकमध्ये रिलीज होऊ देणार नाही", अशी आक्रमक भूमिका कर्नाटकवासियांनी घेतली होती. यासाठी सत्यराज यांनी 8 दिवसांची मुदतही देण्यात आली होती.  दरम्यान, "मी कर्नाटक विरोधात नाही. नऊ वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो", असे स्पष्टीकरण देत सत्यराज यांनी माफी मागितली आहे.