गोविंद नामदेव यांनी सरफरोश, विरासत यांसारख्या अनेक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आगामी काळात अण्णा-किसान बाबूराव हजारे, रईस, जेडे हे हिंदी चित्रपट तर सोलार एक्लिप्स हा हॉलिवुडचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटांबाबत आणि त्यांच्या आजवरच्या एकंदर प्रवासाबाबत त्यांनी सीएनएक्ससोबत मारलेल्या गप्पा...

तुम्ही आज बॉलिवुडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. तुमच्या अभिनयाचा प्रवास कशाप्रकारे सुरू झाला?
माझा जन्म, शिक्षण हे मध्यप्रदेशमध्ये झाले आहे. माझे पालक हे अतिशय साधे असल्याने मी जेव्हा राष्ट्रीय स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेणार असे त्यांना सांगितले त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया खूपच वेगळी होती. नाटकात काम करण्यासाठी कोणती ट्रेनिंग घ्यावी लागते का असा पहिला प्रश्न त्यांनी मला विचारला होता. खरे तर मी अभ्यासात, खेळात सगळ्यातच खूप हुशार होतो. एनएसडीमध्ये प्रवेश घेण्याऐवजी नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने काहीतरी चांगले शिक्षण घे असे त्यांनी मला सुचवले होते. त्यावर एनएसडीमध्ये शिकल्यानंतर मी चित्रपटात काम करू शकतो असे मी त्यांना सांगितले. त्यावर ते जग हे आपले नाहीये असे त्यांचे म्हणणे होते. पण राष्ट्रीय स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतल्यानंतर माझे संपूर्ण आयुष्यच बदलले. मला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नाटकात काम करायला मिळाले. जवळजवळ 10 वर्षं मी नाटकांमध्ये काम केले आणि त्यानंतर 1990च्या सुमारास मुंबईत येऊन या इंडस्ट्रीत माझे भाग्य आजमावले.

तुम्ही चाफेकर बंधू या चित्रपटात बाळ गंगाधर टिळक यांची भूमिका साकारली होती. आगामी काळातही तुम्ही काही बायोपिकमध्ये झळकणार आहात. बायोपिकमध्ये काम करताना तुम्ही तुमच्या भूमिकेची तयारी कशाप्रकारे करता?
मी राष्ट्रीय स्कूल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी असल्याने कोणतीही भूमिका साकारताना त्या भूमिकेचा अभ्यास करण्याची मला सवय आहे. त्यामुळे कोणत्याही महान व्यक्तीवर चित्रपट करताना मला भीती वाटत नाही. मी त्या व्यक्तीविषयी सगळी माहिती गोळा करून त्याचे सखोल वाचन करतो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या बारीकसारीक गोष्टीदेखील मला कळतात. त्याचसोबत इतर भूमिकांसाठी मी लोकांचे नेहमीच निरीक्षण करतो आणि त्याचाच अभिनय करताना वापर करतो. तसेच मी अनेक मासिके जपून ठेवली आहेत. एखादी कथा वाचल्यावर त्या मासिकांमध्ये त्या व्यक्तिरेखेशी सार्धम्य असलेला एखादा फोटो मिळतो का हेही पाहातो. प्रत्येक व्यक्तीची बोलण्याची, चालण्याची एक वेगळी पद्धत असते. या सगळ्या गोष्टी मी माझ्या अभिनयात उतरवण्याचा प्रयत्न करतो.

तुमचा आवाज ही आज तुमच्या अभिनयाची एक ओळख आहे. तुम्ही तुमच्या आवाजावर काही मेहनत घेता का?
माझा आवाज काही वर्षांपूर्वी आतापेक्षा खूपच वेगळा होता. माझा आवाज ऐकून मला माझे मित्र अक्षरशः गप्प बसायला सांगत असत. माझा आवाज अतिशय खराब आहे असे त्यांचे म्हणणे होते. पण काही केल्या मी माझा आवाज चांगला बनवणार असे मी ठरवले आणि लक्षपूर्वक रेडिओच्या बातम्या ऐकू लागलो. मी दिवसातील अनेक तास रेडिओ ऐकून त्यातील निवेदकाप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करत असे. त्यामुळेच माझा आवाज खूप सुधारला. आजही मी ही गोष्ट सोडलेली नाही. मी दिवसातील काही मिनिटे तरी वर्तमानपत्रातील बातम्या जोरात वाचतो.

आशीर्वाद ही तुमची मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेनंतर तुम्ही छोट्या पडद्यावर खूपच कमी मालिकांमध्ये काम केले, याचे काही विशेष कारण आहे का?
मी मालिकेत काम करत असल्याने चित्रपटांना देण्यासाठी माझ्याकडे तारखा नसायच्या. त्यामुळे मी केवळ मालिकांमध्ये काम करण्यास उत्सुक आहोत असे सगळ्यांना वाटत होते. त्यामुळे मालिकांपेक्षा चित्रपटात अधिक काम करायचे असे मी ठरवले. खरे तर प्रेमग्रंथ हा चित्रपट माझ्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाच्या प्रिमियरनंतर केवळ एक-दोन आठवड्यात मी चार चित्रपट साईन केले होते.

तुम्ही हॉलिवुड आणि बॉलिवुडच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोन्ही इंडस्ट्रींमध्ये काम करताना तुम्हाला काय फरक जाणवला?
हॉलिवुड आपल्यापेक्षा तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे. पण त्याचसोबत ते लोक दिलेली वेळ पाळतात हे त्यांचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे. एक-एक मिनिट हा अतिशय महत्त्वाचा असतो असा विचार करून ते काम करतात. चित्रीकरण करताना त्यांचे संपूर्ण दिवसाचे टाइमटेबल ठरलेले असते. त्याचप्रकारे ते काम करतात. सेटवर पोहोचल्यावर दृश्याचे चित्रीकरण करण्यापूर्वी तुम्हाला प्रत्येक गोष्ट ते अतिशय योग्यप्रकारे समजावून सांगतात.

भविष्यकाळातील तुमच्या योजना कोणत्या?
आज अभिनयक्षेत्रात मी चांगली कामगिरी केली आहे. पुढील काळात अभिनय करण्यापेक्षा माझे एक वेगळे स्वप्न आहे. मला पुढच्या पिढीला अभिनय शिकवण्यासाठी एक इन्स्टिट्युट सुरू करायचे आहे. सध्या यावर मी काम करत आहे. काही वर्षांनी अभिनयापेक्षा या इन्स्टिट्यूटकडे जास्त लक्ष देण्याचे मी ठरवले आहे. आपल्याकडे असलेली कला, कौशल्य दुसऱ्यांनादेखील द्यावे असे मला नेहमीच वाटते. 5-6 वर्षांत माझे इन्स्टिट्युट सुरू होईल अशी मला आशा आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.