आकर्षणाला प्रेम समजण्याचे वय म्हणजे आजच्या भाषेत टीनएजर्स. या वयातले प्रश्न, शंका नवे जाणून घेण्याची इच्छा असलेला हा वयोगट खूप महत्त्वाचा. अलीकडच्या मराठी सिनेमामध्ये याच वयोगटाचे भावविश्व पाहायला मिळत आहे. रेड बेरी एंटरन्टेमेंट प्रस्तुत श्री सदिच्छा फिल्म्स निर्मित ‘कौल मनाचा’ या चित्रपटाची कथासुद्धा लहान मुलांच्या कल्पना आविष्काराभोवती गुंफण्यात आली आहे. २१ आॅक्टोबरला ‘कौल मनाचा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनेकदा चित्रपटातल्या गोष्टींचे अनुकरण करणाऱ्यांमध्ये मोठी संख्या याच वयोगटातील असते.
कौल मनाचामध्ये सिनेमाच्या प्रेमात पडलेल्या राज कुंडल या मुलाची कथा मांडली आहे. कौल मनाचा चित्रपटाची कथा मुलांच्या भावना, विचारप्रणाली, कल्पनाशक्ती या विषयांवर आधारित आहे. या वयातल्या मुलांसोबत सगळ्याच समस्यांबाबत मोकळेपणाने बोलले पाहिजे, याची जाणीव करून देणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन भीमराव मुडेंचे आहे.
राजेश पाटील, विठ्ठल रूपनवर आणि नरशी वासानी निर्मित कौल मनाचा या सिनेमात राजेश शृंगारपुरे, समीर धर्माधिकारी, अमृता पत्की, मिलिंद गुणाजी, विजय चव्हाण, जयवंत वाडकर, विजय गोखले, वर्षा दांदळे, कमलेश सावंत, श्वेता पेंडसे, आशुतोष गायकवाड, गिरीजा प्रभू, निनाद तांबडे, गणेश सोनावणे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.