प्रत्येक कलाकाराला त्याला चित्रपटात अथवा मालिकेत प्रमुख भूमिका साकारायला मिळावी, असे वाटत असते, पण प्रमुख भूमिका मिळणे हे तितकेसे सोपे नसते. काही कलाकारांना तर आयुष्यभर दुय्यम भूमिकेवरच समाधान मानावे लागते, पण सध्या मराठी मालिकांमध्ये नवा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळत आहे. छोट्या भूमिकेत झळकलेल्या कलाकारांनाही सध्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे. छोट्याशा भूमिकेत अभिनयक्षमता सिद्ध केल्यामुळेच या कलाकारांना प्रमुख भूमिकेत झळकायला मिळत आहे.
ओमप्रकाश शिंदे
ओमप्रकाश शिंदे सध्या ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत डॉ. विक्रांत दळवी ही प्रमुख भूमिका साकारतो आहे. ओमप्रकाशने या आधी ‘का रे दुरावा’ मालिकेत काम केले होते. या मालिकेत ओमप्रकाशची एंट्री मालिका संपायच्या काही भागांपूर्वीच झाली होती. या मालिकेत ओमप्रकाशची भूमिका ही प्रमुख नसली, तरी त्याने त्याच्या छोट्याशा भूमिकेतही आपल्या अभिनयाची छाप सोडली. या अभिनयक्षमतेमुळेच त्याला आता मालिकेत प्रमुख भूमिका साकारायला मिळालीय.
>तितिक्षा तावडे
तितिक्षा तावडेला ‘सरस्वती’ या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तितिक्षाची सरस्वती ही पहिलीच मालिका आहे. या आधी तिने ‘सिंघम’ या चित्रपटात ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केले होते.
>ऋतुजा बागवे
‘तू माझा सांगाती’ या मालिकेत ऋतुजाने रखमाची भूमिका साकारली होती. या मालिकेतील ऋतुजाची भूमिका ही काही भागांपुरतीच मर्यादित होती. या मालिकेनंतर तिला ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेत स्वानंदी ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तिच्या या पहिल्याच प्रमुख भूमिकेने तिला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली.
>जुई गडकरी
‘पुढचं पाऊल’ या मालिकेत कल्याणीची भूमिका साकारणारी जुई गडकरी प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. जुई सध्या पुढचं पाऊल या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असली, तरी तिने या आधी ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना, तुजवीण सख्या रे, बाजीराव मस्तानी’ यासारख्या मालिकेत छोट्या भूमिका साकारल्या आहेत.
>अनिता दाते
‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेल्या स्पृहा जोशीच्या मैत्रिणीची भूमिका अनिता दातेने साकारली होती. अनिताच्या या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले असले, तरी त्या भूमिकेने तिला तितकी प्रसिद्धी मिळवून दिली नव्हती. सध्या अनिता ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत काम करीत आहे. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले, तरी तिच्या अभिनयाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.