भरत जाधव यांना व्ही.शांताराम तर परेश रावल यांना राज कपूर पुरस्कार राज्य शासनाकडून जाहीर  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 08:56 PM2019-05-25T20:56:29+5:302019-05-25T20:57:24+5:30

पुरस्कार वितरण सोहळयाप्रसंगी ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

State government V Shantaram and Raj Kapoor Award declared to Bharat Jadhav & Paresh Rawal | भरत जाधव यांना व्ही.शांताराम तर परेश रावल यांना राज कपूर पुरस्कार राज्य शासनाकडून जाहीर  

भरत जाधव यांना व्ही.शांताराम तर परेश रावल यांना राज कपूर पुरस्कार राज्य शासनाकडून जाहीर  

googlenewsNext

मुंबई - राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती तसेच दिग्दर्शिका श्रीमती सुषमा शिरोमणी आणि सुप्रसिध्द अभिनेता भरत जाधव यांना घोषित करण्यात आला आहे, तसेच राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले आणि सुप्रसिध्द अभिनेता परेश रावल यांना घोषित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे या पुरस्काराची घोषणा केली. मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले आहे तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राज कपूर जीवनगौरव व राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जीवनगौरव पुरस्कार  ५ लक्ष रुपयाचा तर विशेष योगदान पुरस्कार रु.३. लक्ष रुपयाचा आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या मान्यवरांची सन २०१९ च्या पुरस्कारांसाठी निवड केली.      

सुषमा शिरोमणी यांनी सन १९८५ साली बालकलाकार म्हणून “सोने की चिडीया”, “लाजवंती” या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं.  सन १९६९ साली “सतीचे वाण” या चित्रपटात सहनायिका म्हणून तसेच “दाम करी काम” या चित्रपटात मुख्य नायिका साकारली. अभिनयाच्या जोडीने चित्रपट, पटकथाकार, निर्मिती, दिग्दर्शन आणि वितरण अशा विविध भागात आपल्या कर्तृत्वाचा विलक्षण ठसा त्यांनी उमटवला आहे.  १९७७ मध्ये “भिंगरी” या चित्रपटाची निर्मिती केली.

भरत जाधव यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सन १९८५ मध्ये शाहीर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहीर साबळे यांच्या “महाराष्ट्राची लोकधारा” मधून केली. भरत जाधव यांनी “सही रे सही”, “श्रीमंत दामोदर पंत”, “ऑल द बेस्ट” आणि “आमच्यासारखे आम्हीच” या नाटकांतून तसेच “गलगले निघाले”, “साडे माडे तीन”, “मुंबईचा डबेवाला”, “पछाडलेला”, “जत्रा”, “खबरदार” या सारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.  याचबरोबर सन १९९९ मध्ये “वास्तव -द रियालिटी” या हिंदी चित्रपटात भूमिका केली आहे.  भरत जाधव यांचे “सही रे सही” या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले  होते व त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुक मध्ये झाली होती. याचप्रमाणे “सही रे सही”  या नाटकाचे “अमे लई गया, तमे रही गया” या नावाने गुजराथीत भाषांतर झाले या गुजराथी नाटकांत शर्मन जोशी यांनी  काम केले होते व त्या गुजराथी नाटकाचे २० महिन्यात ३५० प्रयोग झाले होते. याच नाटकाचे हिंदीत ही भाषांतर झाले आणि त्यात जावेद जाफरी यानी काम केले.

वामन भोसले़ यांचे बालपण गोव्यातील पामबुरपा या छोटया गावात गेले व तेथे शिक्षण घेऊन सन १९५२ मध्ये ते  मुंबईमध्ये आले. बॉम्बे टॉकीज या त्या काळातील एका प्रतिष्ठित चित्रपट निर्मिती संस्थेत संकलक डी.एन.पै यांच्याकडे आपण उमेदवारी सुरु केली.  नवीन गोष्टी शिकण्याच्या स्वभावानुसार त्यांची ओळख गुरुदास शिराली यांच्याशी झाली.  १९६९ मध्ये दिग्दर्शक राज खोसला यांनी राजेश खन्ना व मुमताज यांची भूमिका असलेल्या “दो रास्ते” या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सोपवली व त्यांनी  या चित्रपटाला उत्तम न्याय दिला. वामन भोसले यांना सन १९७८ साली “इन्कार” या चित्रपटासाठी आपणास राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच “बिमल रॉय ट्रॉफी”, मामी चित्रपट महोत्सवामध्ये सन २००३ साली सन्मानित करण्यात आले. 

परेश रावल यांचे बालपण विलेपार्ले येथील आहे.  ते दहा -अकरा वर्षाचे असताना कुतूहल म्हणून नवीनभाई ठक्कर ओपन थिएटर मध्ये जाऊ लागले, तेथूनच त्यांना गुजराती नाटकाची आवड लागली. श्री रावल यांनी चित्रपट, रंगभूमी व दूरदर्शन या तीनही माध्यमातून भूमिका साकारली आहे.  हिंदी चित्रपटातून भूमिका साकारताना ते कधीच स्टारडमच्या आहारी गेले नाहीत. “हेरा फेरी”, “हंगामा”, “अंदाज अपना अपना”, “चाची ४२०”, “फिर हेरा फेरी” या चित्रपटातून त्यांनी विनोदी व्यक्तिरेखा साकारली आहे. २०१४ साली त्यांना भारत सरकारच्या वतीने पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्य शासनाच्या वतीने यंदा ५६ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया येथे  दि. २६ मे २०१९ रोजी सायं.६.३० वाजता आयोजित करण्यात आला असून या सोहळयाप्रसंगी ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Web Title: State government V Shantaram and Raj Kapoor Award declared to Bharat Jadhav & Paresh Rawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.