दोन अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी कधीच असू शकत नाही, असा नेहमी समज असतो. मात्र, भय चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या स्मिता गोंदकर आणि संस्कृती बालगुडेने असा समज चुकीचा असल्याचे दाखवून दिले आहे. स्मिताने संस्कृती बालगुडेच्या नृत्यकलेला दाद देत हा समज खोटा ठरवला आहे. त्यामुळे अभिनेत्रीदेखील चित्रीकरणादरम्यान चांगल्या मैत्रिणी होऊ शकतात, असे या दोघींनी दाखवून दिले आहे. ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत आणि सचिन कटारनवरे निर्मित भय सिनेमा २४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि संकलन राहुल भातणकर यांचे आहे. ‘भय’ या चित्रपटातील काही गाण्यांचे चित्रीकरण परदेशात झाले आहे. चित्रपटातील दोन रोमँटिक गाण्यांचे शूट दुबईत करण्यात आले होते. ४५ अंश सेल्सियस एवढ्या तापमानात सातत्याने नाचणे खरे तर खूप कठीण होते. मात्र, याही तापमानात संस्कृती ज्या सातत्याने नाचत होती, त्यासाठी संस्कृतीचे कौतुक करणे खरेच गरजेचे आहे. यासाठी सगळ्या टीमने तर संस्कृतीची प्रशंसा केली, पण त्याचसोबत तिला ‘हॅट्स आॅफ’ असं सांगत स्मिताने संस्कृतीचं तोंडभरून कौतुक केलं. स्मिताने संस्कृतीला दिलेली ही दाद संस्कृतीलाही प्रोत्साहन देणारी ठरली. या दोन्ही गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन अजय देवरुखकर यांनी केले असून, या गाण्यांद्वारे दुबईतील गगनचुंबी इमारती, आलिशान क्रूझ, हेलिपॅडवरील दृश्ये तसेच प्रसिद्ध बीचेसची अनोखी सफर प्रेक्षकांना घडणार आहे. ‘भय’ या चित्रपटात अभिजित खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, नूपुर दुधवाडकर, धनंजय मांद्रेकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.