‘बाहुबली-२’ मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शेट्टीने बॉलिवूड निर्मात्यांवरही अक्षरश: मोहिनी घातली आहे. त्यामुळे आज बॉलिवूडमधील प्रत्येक निर्माता तिला लॉन्च करण्यासाठी उत्सुक आहे. अनेक बडे निर्माते या रांगेत उभे असून, त्यात आघाडीवर निर्माता बोनी कपूर यांचे नाव घेतले जात आहे. वास्तविक बोनी कपूर हे जर पुढे दिसत असले तरी, पडद्यामागून त्यांची पत्नी श्रीदेवी भूमिका पार पाडताना दिसत आहे. श्रीदेवीने अनुष्काला लॉन्च करण्यासाठी जणू काही प्रतिष्ठेचा विषय बनविला असून, ती सातत्याने तिच्या संपर्कात असल्याचे समजते. तिने ‘बाहुबली-२’ मध्ये देवसेना ही भूमिका साकारली आहे. बाहुबलीच्या पहिल्या भागात अभिनयाला फारशी संधी मिळाली नसलेल्या अनुष्काने त्याची संपूर्ण कसर दुसऱ्या भागात काढली आहे. तिची दमदार भूमिका प्रेक्षकांना अक्षरश: घायाळ ठरणारी असल्याने ती बॉलिवूडमध्ये दमदार आगमन करेल, अशी अपेक्षा निर्मात्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बोनी कपूर सध्या अनुष्काला लॉन्च करण्यासाठी धडपड करीत आहेत.