ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - एक वेळ होती जेव्हा मला बॉलिवूड स्टार संजय दत्तचं खूप आकर्षण वाटत होतं असं अभिनेत्री रवीना टंडनने सांगितलं आहे. रवीना टंडनने आपला आगामी चित्रपट "शब"च्या प्रमोशनादरम्यान हा खुलासा केला आहे. 
 
चित्रपट "शब"च्या प्रमोशनादरम्यान रवीना टंडनला तिच्या आवडत्या अभिनेत्यांबाबत विचारण्यात आलं तेव्हा तिने सांगितलं की, "वेळेप्रमाणे माझी आवड बदलते". याशिवाय तिने सांगितलं की, "मी लहान होते तेव्हा मला ऋषी कपूर खूप आवडायचे. जेव्हा मी मोठी झाले तेव्हा मला संजय दत्तचं खूप आकर्षण वाटायचं. मी त्याच्यासोबत सात चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मी जेव्हा जेव्हा त्याच्यासोबत काम करायची तेव्हा खूप घाबरलेली असायची. आपल्या घराच्या भिंतीवर ज्या अभिनेत्याचे पोस्टर लावले आहेत, त्या अभिनेत्यासोबत आपण एकाच चित्रपटात काम करत आहोत यावर माझा विश्वासच नाही बसायचा". 
 
रवीना आणि संजय दत्तने  "क्षत्रिय", "विजेता" आणि "एल.ओ.सी कारगिल" सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.  "शब" चित्रपटाबद्दल सांगताना रवीनाने सांगितलं की, हा नात्यांवर आधारित अत्यंत भावनिक चित्रपट आहे. 
 
रवीनाने सांगितलं की, "मला वेगवेगळ्या गोष्टी करणं, तसंच वेगळ्या धाटणीच्या भूमिका करणं आवडतं. यामुळे मला आनंद आणि उत्साह मिळतो". "मी अनेकदा वेगवेगळ्या भूमिका करण्याचा प्रयत्न करते. ज्या भूमिका मला आव्हानात्मक वाटतात, ज्या मी याआधी कधीच केल्या नाहीत त्याचं करणं मी पसंद करते", असंही रवीनाने सांगितलं. "मातृ" चित्रपटानंतर तुम्ही मला ग्लॅमरस आणि नकारात्मक भूमिकेत पाहाल असंही रवीना बोलली आहे.