डबल रोल करायला मिळणे हे कोणत्याही कलाकारासाठी स्वप्नच असते. डबल रोल करताना कलाकाराचा अभिनयाचा कस लागतो. डबल रोलची परीक्षा जर कलाकार पास झाला तर त्याच्या करिअरला नक्कीच चार चाँद लागतात. हीच परीक्षा अभिनेत्री पर्ण पेठे ‘फोटोकॉपी’ या चित्रपटाद्वारे देणार आहे. पर्णने तिच्या या नव्या चित्रपटाबाबत लोकमत सीएनएक्सशी मारलेल्या खास गप्पा...
तुला नाटकानंतर आता एकापाठोपाठ एक चित्रपटाच्या आॅफर्स येत आहेत. एक अभिनेत्री म्हणून तू याकडे कशी पाहतेस?
- रंगभूमी ही प्रत्येक कलाकाराच्या कारकिर्दीत प्रचंड महत्त्वाची असते. कलाकारांना अनेक वेळा नाटकांमध्ये चांगल्या भूमिका साकारल्यानंतरच चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळते. माझ्याबाबतही हेच घडले. गेल्या दोन वर्षांपासून मी चित्रपटात काम करत आहे. पण माझ्या आयुष्यात रंगभूमीला प्रचंड महत्त्व आहे. मी रंगभूमीला कधीही विसरू शकत नाही.

तू आतापर्यंत ऐतिहासिक, ग्लॅमरस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेस. तू भूमिका चोखंदळपणे निवडतेस का?
- मला पहिल्यापेक्षा काही तरी वेगळे करायचे आहे हेच ठरवून मी भूमिका निवडते. नाटकांमध्ये मी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचप्रमाणे भूमिका मला चित्रपटात साकारायच्या आहेत. त्यामुळेच माझ्या आतापर्यंतच्या सगळ्याच भूमिका या एकमेकांपेक्षा खूपच वेगळ्या आहेत. एक कलाकार म्हणून एकाच प्रकारच्या भूमिका करायला मला अजिबात आवडत नाही.

डबल रोल करायला मिळावा असे अनेक कलाकारांचे स्वप्न असते. ‘फोटोकॉपी’मुळे तुझे हे स्वप्न पूर्ण झाले आहे का?
- खरंच, या चित्रपटामुळे माझे डबल रोल साकारण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. डबल रोल साकारणे हे आव्हानात्मक मानले जाते. मला ही भूमिका साकारायला मिळत आहे याचा मला खूप आनंद झाला आहे. या भूमिकेमुळे मी एक चांगली अभिनेत्री असल्याचे नक्कीच सिद्ध करू शकेन. अशी आव्हानात्मक भूमिका कारकिर्दीच्या सुरुवातीलाच माझ्या वाट्याला आली हे मी माझे भाग्य समजते.
या आव्हानात्मक भूमिकेसाठी तू काही वेगळी तयारी केली होती का?
- दिग्दर्शक विजय सर यांनी अनेक वर्षे रंगभूमीवर काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा आम्हाला चित्रपटासाठी खूप फायदा झाला. तसेच मी कोणतेही दृश्य करण्याआधी कमीत कमी दहा वेळा तरी तालीम केली. त्यामुळे चित्रीकरण करताना मला तितकेसे टेन्शन जाणवले नाही. माझ्या ओळखीच्या जुळ्या बहिणी आहेत. त्यांच्याकडून मी त्यांचे एकमेकांसोबत वागणे, त्यांची बॉन्डिंग या सर्व गोष्टी जाणून घेतल्या.

सध्या अभिनेत्यांसोबत अभिनेत्रींनादेखील अ‍ॅक्शन दृश्ये चित्रित करावी लागतात, याबाबत तुला काय वाटते?
- मराठी आणि बॉलीवूडमध्येही अभिनेत्रींवर अ‍ॅक्शन दृश्ये चित्रित केली जात आहेत ही खूपच चांगली गोष्ट आहे. अ‍ॅक्शन दृश्ये चित्रित करणे ही अतिशय कठीण गोष्ट असते. अनेक वेळा यामुळे दुखापतदेखील होते. मलादेखील या चित्रपटाचे अ‍ॅक्शन दृश्य चित्रित करताना दुखापत झाली होती. पण तरीही अ‍ॅक्शन दृश्याचे चित्रीकरण करताना खूपच मजा येते असेच मी म्हणेन.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.