saleem khan will be felicitated in iffi tomorrow | उद्या इफ्फीत सलीम खान यांचा गौरव
उद्या इफ्फीत सलीम खान यांचा गौरव

पणजी : 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) उद्या 28 रोजी समारोप होत आहे. गेली काही दशके आपल्या अप्रतिम पटकथेने हिंदी सिनेसृष्टीत अमीट ठसा उमटविलेले सलिम खान यांना विशेष पुरस्कार प्रदान करून इफ्फीच्या समारोप सोहळ्यावेळी गौरवण्यात येणार आहे.

सिनेमाच्या क्षेत्रीत खान यांनी आयुष्यभर दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यात येईल. खान यांना इफ्फीत पुरस्काराने गौरविले जाईल, याचे सर्वप्रथम वृत्त लोकमतनेच इफ्फी सुरू होण्यापूर्वी दिले होते. सलीम खान बॉलिवूडमधील तीन अभिनेत्यांचे वडील आहेत. वडिलांना पुरस्कार प्रदान केला जात असल्याने इफ्फीच्या समारोपाला सलमान खान, सोहेल खान व अरबाज खान हे त्यांचे तिन्ही पुत्र व कुटुंबाचे अन्य सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. सलीम खान यांना पुरस्कार दिला जाणार असल्याची अधिकृत घोषणा सोमवारी केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी केली. 

1970 च्या दशकात सलीम-जावेद भारतीय सिनेसृष्टीत क्रांती केली. सलीम खान हे सिनेमाची कथा व व्यक्तीरेखा विकसित करायचे तर जावेद हे संवाद विकसित करायचे. शोले, सीता और गीता, जंजीर, दिवार, क्रांती असे हिट सिनेमी सलीम-जावेद जोडीने दिले. या जोडीला भारतीय सिनेसृष्टीत स्टार दर्जा मिळाला. बीग बी अमिताभ बच्चन यांची 70-80 च्या दशकातील अँग्री यंग मॅन अशी प्रतिमा तयार करण्यात सलीम खान यांचे योगदान मोठे आहे. सलीम खान यांची कथा लाभलेले अनेक सिनेमे सुपरहिट ठरले. 
 


Web Title: saleem khan will be felicitated in iffi tomorrow
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.