मुंबई, दि. 19 - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'टॉयलेट : एक प्रेम कथा' सिनेमा गेल्या शुक्रवारी (11 ऑगस्ट) बॉक्सऑफिसवर झळकला असून प्रेक्षकांकडून या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  'टॉयलेट : एक प्रेम कथा' हा सिनेमा अक्षय कुमारचा या वर्षातील तिसरा सिनेमा असून त्याची बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई सुरू आहे. मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर लगेचच अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नानं 'टॉयलेट : एक प्रेम कथा'चा पार्ट 2ची झलकदेखील सोशल मीडियावर आणली आहे. 

शनिवारी ( 19 ऑगस्ट ) सकाळी ट्विंकलनं एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती मुंबईतील समुद्रकिनारी उघड्यावर शौचास बसलेला दिसत आहे.   'गुड मॉर्निंग मला वाटतं हा 'टॉयलेट एक प्रेमकथा पार्ट-2'चा पहिला सीन आहे', असे मिश्किल कॅप्शन तिनं फोटोला दिले आहे.  

ट्विंकलनं जरी हा फोटो मिश्किल स्वरुपात शेअर केला असला तरी उघड्यावर शौचालयास बसणा-यांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण होऊन आजारांमध्ये वाढ होत आहे.  

 'टॉयलेट : एक प्रेम कथा'ची कोट्यवधींची कमाई
11 ऑगस्टला बॉक्सऑफिसवर रिलीज झालेल्या  'टॉयलेट : एक प्रेम कथा' मध्ये अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या या सिनेमानं 96 कोटी रुपयांची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटी रुपयांचा आकडाही पार करेल. हा सिनेमा ग्रामीण तसंच शहरी भागांमधील शौचालयांची असलेली कमी संख्या व यामुळे महिलांना होणा-या त्रासावर आधारित आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानावर आधारित असलेल्या या सिनेमानं सुरुवातीच्या 5 दिवसांमध्ये  83.45कोटी रुपयांची कमाई केली आहे.