ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - बॉलिवूडचा खिलाडी स्टार अक्षय कुमार आणि ग्रीक गॉड हृतिक रोशन सध्या करीयरच्या यशस्वी टप्प्यावर आहेत. वर्षाला ४-४ चित्रपट करणारा अक्षय सर्वाधिक कमाई करतो, तर काबिलच्या यशामुळे हृतिकही सुखावला आहे. असे असतानाच हे दोघे लवकरच एका चित्रपटात एकत्र झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्या दोघांनाही एक चांगली कथा मिळाली असून दोघांच्याही त्यात प्रमुख भूमिका असल्याचे समजते. हृतिक आणि अक्षय दोघांचेही चांगले, मित्रत्वाचे संबंध असून नुकताच त्यांनी आपल्या कुटुंबियांसबत एकत्र वेळही घालवला होता. 
दोन हिरो असलेल्या चित्रपटात काम करण्याबद्दल अक्षयला विचारणा करण्यात आली असता, आपल्याला असे काम करायला नक्कीच आवडेल, खरंतर मला अशी एक ऑफर मिळाली असून मी त्याचा विचार करत आहे, असे अक्षयने नमूदही केले. मात्र दोन मोठे हिरो एकत्र आल्यानंतर त्यांच्यात मतभेद किंवा वाद होण्याचीही शक्यता असते, त्याबद्दल काय वाटते असेही अक्षयला विचारण्यात आले. ' मात्र मला अशा कोणत्याही गोष्टींची काळजी नसल्याचे त्याने सांगितले. एखाद्या चित्रपटात अधिक कलाकार असतील, तर मला कमी काम करावे लागेल, जे माझ्यासाठी चांगलच आहे' अशा मिश्कील शब्दांत त्याने मतभेदांची चर्चा उडवून लावली. दरम्यान हृतिकनेही दोन हिरोंच्या चित्रपटात काम करण्यास रस दाखवला आहे. ' मला एखाद्या अभिनेता मित्रासोबत काम करायला नक्कीच आवडेल. याबाबतीत माझे काही जणांसी बोलणेही झाले आहे' असे हृतिकने नमूद केले.