मराठी इंडस्ट्रीमध्ये वेब सीरिजची धूम पाहायला मिळतेय. चित्रपट, लघुपट आणि मालिकांनंतर आता मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेब सीरिजची चलती असल्याचे पाहायाला मिळतंय. चित्रपटाप्रमाणेच या वेब शोची चर्चाही सध्या रंगताना दिसते आहे. ‘कास्टिंग काऊच विथ अमेय आणि निपुण’, ‘स्ट्रगलर साला’ अशा एकापेक्षा एक वेब मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या मालिकांना चांगला प्रतिसाददेखील मिळतोय. यानंतर आता आपल्या ‘बापाचा रस्ता’ ही वेब सीरिजदेखील प्रेक्षकांच्या भेटीला
येणार आहे. मराठी वेब सीरिजच्या दुनियेवर एक नजर...
‘कास्टिंग काऊच विथ अमेय आणि निपुण’, ‘स्ट्रगलर साला’ यांसारख्या वेब सिरीजला मिळालेल्या यशानंतर ‘आपल्या बापाचा रस्ता’ ही नवी वेब सिरीज आपल्या भेटीला येणार आहे. ही वेब सिरीज प्रेक्षकांचा लाडका आशू म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर आणि नचिकेत पूर्णपात्रे घेऊन येत आहेत. चित्रपटानंतर लघुपटाला लोकांनी पसंती दिली तशीच आता टीव्ही मालिकांनतर इंटरनेटच्या जमान्यात प्रेक्षक वेब सिरीजला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळेच वेब सिरीजच्या वाढत्या पसंतीमुळे वेब सिरीजकडे अनेक दिग्दर्शकही वळतातेयत.
>‘कास्टिंग काऊच विथ अमेय, निपुण’
निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ यांच्या ‘कास्टिंग काउच’ या वेब सिरीजने प्रेक्षकांमध्ये चांगली धूम उडवली आहे. तसेच या वेब सिरीजला मिळणारा प्रतिसाद पाहता या वेब सिरीजमध्ये मराठी कलाकार आवर्जून हजेरी लावताना दिसता आहेत. या वेब सिरीजमध्ये रिमा, महेश मांजरेकर या दिग्गज कलाकारही सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच सई ताम्हणकर, प्रिया बापट, रिंकू राजगुरू, श्रेया पिळगावकर या कलाकारांनी येऊनदेखील धमाल केली आहे.
>स्ट्रगलर साला
विजू माने दिग्दर्शित ‘स्ट्रगलर साला’ ही वेब सिरीज आहे. या वेब सिरीजमध्ये अभिनेता संतोष जुवेकर आणि कुशल बद्रिके आहेत. या वेब सिरीजच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत स्ट्रगल करून आपली जागा निर्माण करणाऱ्या कलाकारांचे विश्व दाखविण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ही वेब मालिकाला आपल्या जवळची वाटते आहे.
> बॅक बेंचर्स
शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. शेवटचा बाक हा तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. ‘बॅक बेंचर्स’ या वेब सिरीजमध्ये शेवटच्या बाकावर बसणारे मराठी कलाकार आपल्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. शाळेत असताना मागच्या बाकावर बसून केलेली धमाल मस्ती किस्से हे कलाकार सांगत आहे. आतापर्यंत किशोरी अंबिये, तेजश्री प्रधान यांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.