कुठल्या नायिकांनी चित्रपटाला नकार दिला आणि पुढे तोच चित्रपट कसा सुपर हिट झाला, यांची रंजक कथा आपण नुकतीच वाचली, परंतु असा प्रकार केवळ नायिकांसोबतच घडला असे नव्हे, तर काही नायकांनीही ही घोडचूक केली आणि पायावर धोंडा मारून घेतला. राजश्रीचा चित्रपट प्रेम रतन धन पायोमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसलेल्या अरमान कोहलीला या चित्रपटापासून किती यश मिळाले किंवा मिळेल, हे येणारा काळच सांगेल. मात्र, तो आपल्या त्या काळाला विसरू शकत नाही, ज्यावेळी त्याने एका अशा चित्रपटाची आॅफर नाकारली होती, ज्याच्या यशाने बॉलीवूडला किंग खान सुपर स्टार दिला. शाहरूख खानच्या पहिल्या प्रदर्शित दिवाना चित्रपटाची आॅफर सर्वप्रथम अरमानला दिली गेली होती. मात्र, अरमानचे नशीब पहा, त्याला चित्रपटाची कथा कमकुवत वाटली आणि त्याने काम करण्यास नकार दिला. नंतर याच चित्रपटामुळे शाहरूखची धमाकेदार सुरुवात झाली. राजकुमार हिरानींचा मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये मुन्नाच्या भूमिकेसाठी शाहरूख प्रथम पसंती होती. जिमी शेरगिलच्या भूमिकेसाठी संजय दत्त पाहुणा कलाकार होता.मात्र, शाहरूखला काय सुचले देव जाणे, त्याने चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच काम करण्यास नकार दिला आणि संजय दत्तला मुख्य भूमिकेत घेतले. मुन्नाभाईने संजयच्या करिअरची दिशाच बदलून टाकली. शाहरूखने अशी चूक एकदाच केलेली नाही. आमीर खानच्या लगानची पहिली आॅफर त्याला मिळाली होती. मात्र, त्याला कथा आवडली नाही. आमीरनेसुद्धा अशा चुका तीन वेळा केल्या आहेत. साजन आणि डर त्याने नकार दिला. कारण त्याला याचा शेवट आवडलेला नव्हता. स्वदेस चित्रपटाची पहिली आॅफर त्याला मिळाली होती. त्याच्या नकारानंतर हृतिक आणि अखेर शाहरूखला मिळाली. फरहान अख्तरने हृतिकला दिल चाहता हैमध्ये आकाशच्या भूमिकेसाठी सर्वप्रथम निवडले होते. मात्र, हृतिकजवळ तारखा नव्हत्या. अक्षय कुमारनेही भाग मिल्खा भागमध्ये मिल्खाची भूमिका नाकारली.

- anuj.alankar@lokmat.com


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.