Aapla Manus Movie Review : नाना पाटेकरने तारलेला आपला मानूस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 12:42 PM2018-02-10T12:42:35+5:302018-02-10T12:43:22+5:30

आपल्या मुलांना पालक तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. त्यांचे प्रत्येक लाड पुरवतात. त्यांना चांगल्यातले चांगले शिक्षण देऊन आपल्या पायावर उभे करतात.

Nana Patekar's Aapla Manus Movie Review | Aapla Manus Movie Review : नाना पाटेकरने तारलेला आपला मानूस

Aapla Manus Movie Review : नाना पाटेकरने तारलेला आपला मानूस

googlenewsNext

- प्राजक्ता चिटणीस
आपल्या मुलांना पालक तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. त्यांचे प्रत्येक लाड पुरवतात. त्यांना चांगल्यातले चांगले शिक्षण देऊन आपल्या पायावर उभे करतात. उतारवयात आपल्या मुलांनी आपल्याला काही नाही दिले तरी चालेल. पण आपल्याशी त्यांनी दोन शब्द तरी प्रेमाचे बोलावे केवळ येवढीच पालकांची अपेक्षा असते. पण लग्न झाल्यानंतर मुलं आपल्या आईवडिलांचा सांभाळ करत नाहीत, त्यांना वाऱ्यावर सोडून देतात. अशा वेळी वृद्धाश्रमात राहाण्याशिवाय, अथवा रस्त्यावर दिवस काढण्याशिवाय कोणताही पर्याय त्यांच्याकडे उरत नाही अशा आशयाचे अनेक मराठी, हिंदी चित्रपट आपण आजवर पाहिले आहेत. नाना पाटेकर यांच्या आपला मानूस या चित्रपटात देखील प्रेक्षकांना काहीशी अशीच कथा पाहायला मिळते. पालकांना वृद्धापकाळात पैसा, सुखसोयी यापेक्षा संवादाची अधिक गरज असते हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे. पण यासोबतच एका मर्डर मिस्ट्रीची जोड या कथानकाला देण्यात आली आहे.  

विवेक बेळे लिखित काटकोन त्रिकोण या नाटकावर आधारित आपला मानूस हा चित्रपट आहे. या चित्रपटाची सुरुवातच एका अपघाताने होते. हा अपघात आबा (नाना पाटेकर) यांचा झाला असल्याचे आपल्याला काही वेळाने कळते. या अपघाताची चौकशी करण्याची जबाबदारी क्राईम ऑफिसर मारुती नागरगोजे (नाना पाटेकर) यांच्यावर टाकली जाते. ते आपल्या पद्धतीने आबांचा मुलगा राहुल (सुमित राघवन) आणि सून भक्ती (इरावती हर्षे) यांच्याशी बोलून अपघाताच्या रात्री काय घडले होते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्या दोघांची चौकशी केल्यानंतर आबांनी आत्महत्या केली आहे किंवा राहुल, भक्तीने त्यांचा खून केला आहे, अशा तीन निकषांवर ते पोहोचतात. पण आबा यांच्यासोबत त्या रात्री खरे काय घडले होते, याचे उत्तर आपल्याला अगदी शेवटी मिळते.

आपला मानूस या चित्रपटात नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असल्याने या चित्रपटाबद्दल सगळ्यांच्या मनात चांगलीच उत्सुकता आहे. पण चित्रपट पाहाताना आपली निराशा होते. मध्यांतरापर्यंत दिग्दर्शक सतिश राजवाडे यांनी प्रेक्षकांची चांगलीच उत्सुकता ताणून ठेवली आहे. पुढे काय होणार, आबांना मारण्याचा प्रयत्न कोणी केला असेल असे अनेक प्रश्न मध्यांतरापर्यंत तुम्हाला पडतात. पण खरे काय घडले आहे हे कळल्यानंतर तुमची निराशा झाल्याशिवाय राहाणार नाही. तसेच शेवटपर्यंत काही गोष्टींचा उलगडाच दिग्दर्शकाने केलेला नाहीये. मध्यांतरानंतरचा चित्रपट अतिशय संथ आहे. चित्रपट जास्त लांबवला गेला असल्याचे जाणवते. तसेच त्या रात्री काय घडलेले असू शकते हे मारूती नागरगोजे तीन वेगवेगळ्या पद्धतीने सांगतो. त्यामुळे त्या तिन्ही वेळा आपल्याला तेच तेच दृश्य पुन्हा पुन्हा पाहायला मिळते. काही वेळानंतर तर हे दृश्य आपल्या देखील तोंडपाठ होते. यामुळे चित्रपटात तोचतोचपणा येतो.

आजच्या पिढीने आपल्या आई-वडिलांचा व्यवस्थित सांभाळ करायला शिकले पाहिजे असे या चित्रपटाद्वारे सांगण्यात आले आहे. पण या सगळ्यात त्या मुलांची देखील एक बाजू असते हेच चित्रपटात मांडलेले नाहीये. आजच्या युगात स्त्री करियर आणि कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या खूप चांगल्या रितीने पेलत आहे याचा विसर दिग्दर्शकाला पडला आहे असेच चित्रपट पाहाताना जाणवते. कारण आपल्या मुलाने घरातील काम केल्याचे आबांना आवडत नाही. तसेच सूनेच्या उशिरा येण्याचा त्यांचा विरोध आहे. या सगळ्या गोष्टी काळानुसार गरजेच्या आहेत हे दिग्दर्शकाने कुठेच सांगण्याचा प्रयत्न केलेला नाहीये.

आपला मानूस या चित्रपटाची कथा सशक्त नसली तरी कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने चित्रपटाला तारले आहे. नाना पाटेकर यांनी आबा आणि क्राइम ऑफिसर मारुती नागरगोजे या दोन्ही भूमिका तितक्याच ताकदीने साकारल्या आहेत. दोन्ही व्यक्तिरेखांची देहबोली, बोलण्याची ढब यामध्ये जमीन आस्मानचा फरक त्यांच्या अभिनयातून दाखवला आहे. नानांनी या चित्रपटात अफलातून अभिनय केला आहे. तसेच सुमित राघवन आणि इरावती हर्षे यांनी देखील त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. आशिष कुलकर्णीची भूमिका छोटीशी असली तरी तो लक्षात राहातो. विक्रम गायकवाड यांनी आबांच्या व्यक्तिरेखेसाठी नानांचा मेकअप खूपच छान केला आहे. तसेच संवादलेखक विवेक बेळे यांचे कौतुक करावे तितके कमी. चित्रपटातील प्रत्येक संवाद हा प्रेक्षकांच्या टाळ्या घेणार यात काही शंका नाही. नाना पाटेकर यांचे फॅन्स असल्यास त्यांच्यासाठी चित्रपट पाहायला काहीच हरकत नाही. 

Web Title: Nana Patekar's Aapla Manus Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.