Mumbai-Pune journey for acting | अभिनयासाठी मुंबई-पुणे प्रवास
अभिनयासाठी मुंबई-पुणे प्रवास

कट्टागप्पा या सदरातून आपण युवा कलाकारांना भेटत असतो. कॉलेजमधल्या आठवणी, त्यांचे स्ट्रगल, त्यांचा भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याविषयी अधिक माहिती देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. प्रत्येक युवकाला यातून प्रेरणा मिळावी हा यामागचा उद्देश आहे. आजच्या सदरातून आपण ‘देवयानी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्याशी संवाद साधूया.
कॉलेजपेक्षा अ‍ॅक्टिंग क्लासचे वेध
शाळेत असताना लाजाळू स्वभाव असल्याने स्वत:हून कोणाशी बोलण्याचे धाडस केले नाही. दहावी झाल्यानंतर मला कॉलेजऐवजी अ‍ॅक्टिंग क्लासचे वेध लागले. दहावी झाली आणि अ‍ॅक्टिंग क्लास सुरू केले. त्याचबरोबरीने पुण्यातील बाबूरावजी घोलप कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन कॉमर्स शाखेतून अकरावी व बारावी शिक्षण घेतले. अ‍ॅक्टिंगच्या वेडापायी मायानगरीत दाखल झाले आणि पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालाड येथील पी.डी. दालमिया कॉलेजमधून मास मीडियाचे शिक्षण घेतले.
अ‍ॅक्टिंगकडे कशी वळलीस?
शाळेत असताना डान्स, नाटक केले. मात्र लाजाळू स्वभाव असल्याने डान्समध्ये मागच्या रांगेत उभी राहून डान्स केला आहे. कॉलेजपेक्षा अ‍ॅक्टिंग क्लासकडे जास्त लक्ष दिले. अकरावीत असताना ‘विश्वगर्जना’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. या नाटकातून ‘भारतमाता’ ही भूमिका केली. अ‍ॅक्टिंगसाठी मुंबईत आले तेव्हा अनेक आॅडिशन दिल्या. यातून मला ‘जोधा अकबर’ या मालिकेतून काम करण्याची संधी मिळाली. राहायला पुण्यात आणि मुंबईत कॉलेज आणि मालिकेचे शूटिंग असल्याने मुंबई-पुणे प्रवास करावा लागला.
अशा वेळी शूटिंग आणि अभ्यास कसा सांभाळला?
कॉलेजचे शिक्षण सुरू असताना ‘जोधा अकबर’ मालिकेचे शूट करत होते. त्यामुळे माझे कॉलेजचे दिवस शूटिंगमध्येच गेले. बीएमएमचे शिक्षण चालू होते. अभ्यास आणि शूटिंग सांभाळताना खूप कसरत व्हायची. असाइनमेंट आणि प्रेझेंटेशनच्या वेळेस जाणे गरजेचे असते. त्या वेळी शूटिंग अ‍ॅडजस्ट करावे लागायचे. ज्या वेळी शूटिंगला सुट्टी असायची त्या वेळेस लेक्चरला मात्र हमखास जायचे. मला वाचनाची सवय असल्याने शूटिंगच्या वेळी वाचन करायचे. परीक्षेच्या वेळी अभ्यास करताना बिनधास्त पेपर लिहून चांगले मार्क मिळविले आहेत.
कॉलेज कट्ट्यावर काय धमाल केली?
आमच्या कॉलेजवरील कट्ट्यावर मुले जास्त असायची. त्यामुळे कधी कट्ट्यावर बसण्याचा योग आला नाही. मला सिनेमा बघायला खूप आवडायचे. त्यामुळे लेक्चर बंक करून अनेक वेळा सिनेमा बघितला आहे. वर्षा जाधव, पूजा महाडिक, अश्विनी हसे, प्रतीक्षा भालेकर या माझ्या मैत्रिणींसोबत कॉलेजमध्ये खूप कल्ला केला आहे. एक आठवण आठवते की माझ्या एका मैत्रिणीला एका मुलाने प्रपोज केले, तेव्हा माझी मैत्रीण घाबरून रडायला लागली. तो मुलगा तेथून जातच नव्हता. त्या वेळी मी माझ्या लाजाळू स्वभावाला विसरून त्याला तेथून हाकलून दिले. त्यानंतर माझ्या इतर मैत्रिणींनी माझे कौतुक केले. माझ्यात पण वेगळेच धाडस निर्माण झाले.
‘देवयानी’मुळे घराघरात पोहोचली
आतापर्यंत खूप मालिका, फोटो शूट, जाहिराती, अनेक ब्रँडचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर केले आहे. मात्र देवयानी या मराठी मालिकेमुळे माझी कला घराघरात पोहोचली. त्याचबरोबर जोधा अकबर, देवो के देव महादेव, सिया के राम या हिंदी मालिकांतून काम केले आहे. शोधू कुठे, का रे रास्कला या आणि आगामी चित्रपटातून अनेक भूमिका केल्या आहेत. अशा कला सादर करत असताना एका दिग्दर्शकाने मला म्हटले की, तुझी अभिनयातील परिपक्वता इतकी आहे की तू ७० वर्षांची म्हातारी आणि २० वर्षांची तरुणी दोन्ही उत्तमरीत्या साकारू शकतेस. माझ्यासाठी आतापर्यंतची ही खूप मोठी कौतुकाची थाप आहे.
मुलाखत : कुलदीप घायवट


Web Title: Mumbai-Pune journey for acting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.