Marathi Drama News | रसिकराजाची पावले पुन्हा रंगभूमीकडे
रसिकराजाची पावले पुन्हा रंगभूमीकडे

- प्रज्ञा केळकर-सिंग 

पुणे  - मराठी संगीत रंगभूमी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. नटसम्राट बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, स्वरराज छोटा गंधर्व आदी दिग्गज कलाकारांनी संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखवला. संगीत रंगभूमी शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना संगीत नाटकांचे होणारे पुनरुज्जीवन आणि तरुणाईचा वाढता कल असे आशादायी चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, संगीत रंगभूमीला शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेत आणि कालावधीत वाढ व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
५ नोव्हेंबर १८४३ या दिवशी आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या ‘संगीत सीतास्वयंवर’ या नाटकाने मराठी संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. रंगभूमीच्या इतिहासात हा दिवस ‘मराठी रंगभूमी दिवस’ म्हणून नोंदविला. ५ नोव्हेंबर २०१८ या दिवशी रंगभूमी १७५व्या वर्षात अर्थात शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या पावणेदोनशे वर्षांच्या प्रवासात संगीत रंगभूमीने अनेक चढ-उतार पाहिले. मनोरंजाची साधने व पर्याय बदलत असताना मधल्या काळात रसिकराज रंगभूमीपासूच दुरावला होता. मात्र, नाटकांचे पुनरुज्जीवन, संगीत रंगभूमीसाठी काम करणाºया संस्थांचे योगदान, विविध ठिकाणी आयोजित होणारे संगीत महोत्सव व स्पर्धा यामुळे तरुणाई नव्या दृष्टिकोनातून संगीत रंगभूमीकडे पाहू लागली आहे.
गेल्या काही काळात ‘संशयकल्लोळ’, ‘सौभद्र’, ‘कान्होपात्रा’, ‘मत्स्यगंधा’ अशी संगीत नाटके नव्या रूपात, नव्या स्वरुपात रंगभूमीची समृद्धी वाढवत आहेत. समीप आलेली विवाहाची घटिका... सनई चौघड्यांचे व मंगळाष्टकांचे मंगल सूर... पडदा बाजूला सरताच दिसतात वर ‘रसिकराज’ आणि वधू साक्षात ‘रंगभूमी’.
१८४३ पासून आजतागायतचा हा प्रवास ‘चि.सौ.का. रंगभूमी’ या नाटकाच्या माध्यमातून रसिकांसमोर लवकरच साकारला जाणार आहे. संगीत नाटकांचा गाभा कायम ठेवत परंपरेला मिळणारी नावीन्याची जोड, गाण्यांमधील ताजेपणा, नाटकांचा कमी झालेला कालावधी यामुळे संगीत रंगभूमीकडे पाठ फिरवलेले रसिक आणि विशेषत: तरुण पिढी पुन्हा वळू लागल्याचे निरीक्षण जाणकारांनी ‘लोकमत’शी बोलताना नोंदवले.

संगीत नाटकांच्या स्पर्धा, संगीत महोत्सव यातून तरुण संगीत रंगभूमीकडे वळू लागले आहेत. रसिकांचाही संगीत नाटकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे संगीत रंगभूमीचे पुनरुज्जीवन होत असताना शासनाची उदासीनता मात्र संपलेली नाही. संगीत नाटकांसाठी शासनाकडून तीन वर्षांतून एकदा केवळ एक लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. अनुदान दर वर्षी मिळावे, यासाठी लवकरच सर्व संगीत नाटक संस्था मंत्रालयात जाऊन सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेणार आहेत.
- अनुराधा राजहंस

‘मत्स्यगंधा’ या नाटकाचे जवळपास २५-३० प्रयोग पार पडले. रसिकांचा नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संगीत नाटकांसाठी आॅडिशन सुरु असल्याचा मेसेज फेसबुक पेजवर टाकण्यात आला होता. तरुणांना या आॅडिशनला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातूनच तरुण कलाकारांची निवड करण्यात आली. ‘चि. सौ. का. रंगभूमी’ या नाटकातही तरुण कलाकारांनी उमदा अभिनय केला आहे. विविध संगीत नाटकांच्या माध्यमातून संगीत रंगभूमी पुन्हा समृद्ध होते आहे.
- अनंत पणशीकर, नाट्यसंपदा कलामंच


Web Title: Marathi Drama News
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.