आठ वाजले, की बाहेर गेलेल्या महिलावर्गाची तारांबळ उडते ती घरी जाण्याची! ‘रोज रोज कसरत तारेवरची... ही धून ऐकल्याशिवाय महिलांचा दिवस पूर्ण होत नाही, असे सध्याचे चित्र आहे. ‘होणार सून मी त्या घरची...’ या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेडे केले आहे. मात्र, मालिकेमध्ये श्री-जान्हवीचे पुढे काय होणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता असलेल्या महिलावर्गासाठी मात्र एक ‘बॅड न्यूज’ आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांना ‘गुडबाय’ करणार असल्याचे समजते... जान्हवीला अपत्यप्राप्ती झाल्यानंतर ही मालिका गुंडाळणार असल्याचे ऐकिवात आहे. या वृत्ताने आपले माणूस दूर गेल्यानंतर जे फिलिंग येते तशीच काहीशी अवस्था महिलांची होणार हे नक्की! मध्यमवर्गीय कुटुंबातील कथा... कलाकारांचा सहजसुंदर अभिनय या गोष्टींमुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. ‘काहीही हं श्री’ हा जान्हवीचा डायलॉग सोशल मीडियावर खूपच गाजला. त्यावरून आलेले विनोद, उखाणे यांनी मालिकेइतकेच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. श्री आणि जान्हवी यांची व्यक्तिरेखा साकारणारे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान मालिका सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले काय आणि त्यानंतर दोघं विभक्त होणार असल्याचे वृत्त येऊन थडकल्याने प्रेक्षकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. इतके या मालिकेने प्रेक्षकांना आपलेसे केले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.