ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांची मुख्य भूमिका असलेला "राबता" हा सिनेमा सध्या वेगळ्या तिस-याच व्यक्तीमुळे चर्चेत आहे. या चर्चेमागील कारण आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमार राव. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये राजकुमार रावचीही एक झलक पाहायला मिळत आहे. काय म्हणता, संपूर्ण ट्रेलरमध्ये राजकुमार राव दिसलाच नाही. 
 
तुम्हाला दिसला नाही कारण तुम्ही त्याला ओळखलाच नाही.  राजकुमारचा या सिनेमातील लुक वेगळा आणि अनोखा असल्यानं कितीही प्रयत्न केले तरी कोणीही त्याला ट्रेलरमध्ये ओळखू शकलेले नाही.  
 
"राबता" सिनेमामध्ये राजकुमार राव 324 वर्षांच्या वयोवृद्धाची व्यक्तीरेखा साकारत आहे. रिलीज करण्यात ट्रेलरमध्ये अगदी काही सेकंदांसाठी राजकुमारची छवी दाखवण्यात आली आहे. त्याच्या लुकसाठी सिनेमाच्या निर्मात्यांनी खास करुन हॉलिवूडमधील मेकअप आर्टिस्टना बोलावलं होते.  
 
324 वर्षांच्या वयोवृद्धाच्या व्यक्तीचा पेहराव परिधान करताना त्याला मेकअपसाठी संपूर्ण 6 तास लागायचे. 
राजकुमारनं केवळ दिसण्यावरच नाही तर शरीराची ठेवण व आवाजावरही प्रचंड मेहनत घेतली आहे. 
 
या अनोख्या भूमिकेबाबत राजकुमार सांगतो की, "जेव्हा शुटिंगसाठी मेकअप करण्याची वेळ यायची तेव्हा मी पूर्ण घामाने भिजायचो. त्यामुळे मेकअप करताना संयमाने बसावं लागायचे. मात्र ही भूमिका वेगळी असल्याने ती पार पाडताना खूप मज्जा आली. सिनेमामध्ये माझी भूमिका फार छोटी आहे पण वजनदार आहे. ही भूमिका निभावताना निर्माता आणि दिग्दर्शकांनी मला पूर्णतः स्वातंत्र्य दिले होते".  
 
 
आपल्या अभिनयावर सिनेरसिकांवर छाप पाडणा-या राजकुमार रावचा "ट्रॅप्ड" सिनेमा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या सिनेमा बॉक्सऑफिसवर विशेष छाप पाडू शकला नाही. मात्र राजकुमारच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झाले. आता राजकुमार आगामी "राबता" सिनेमातील आगळ्यावेगळ्या लुकमुळे सध्या चर्चेत आहे. अनोख्या लुकमधील स्वतःचा फोटो त्यानं ट्विटरवरदेखील शेअर केला आहे. हा सिनेमा येत्या 9 जून रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.