ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्माने आपला सहकलाकार सुनील ग्रोव्हर आणि चंदन प्रभाकरसोबत मारहाण केल्याने चाहत्यांना थोडा धक्काच बसला होता. चंदन आणि सुनील ग्रोव्हरसोबत झालेल्या भांडणाचं वृत्त समोर आल्यानंतर जवळपास तीन दिवसांनी सोमवारी सकाळी कपिल शर्माने फेसबूकवर पोस्ट टाकत आपलं हे भांडण कौटुंबिक असल्याचं म्हणत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा हे प्रकरण हाताबाहेर जात आहे असं लक्षात आलं तेव्हा मात्र माफी मागितल्याशिवाय गत्यंतर नाही ही गोष्ट कपिलच्या लक्षात आली आणि त्याने ट्विटरवर सुनील ग्रोव्हरची जाहीर माफी मागितली. कपिल शर्माच्या या माफीवर सुनील ग्रोव्हरने प्रतिक्रिया देत चांगलंच झापलं आहे. 
 
 
सुनील ग्रोव्हरने केलेल्या पोस्टमध्ये त्याचा राग स्पष्ट दिसत आहे. 'त्या महिलांसमोर ज्यांना तुझ्या स्टारडमशी काही घेणं देणं नाही त्यांच्यासमोर अश्लील भाषेचा प्रयोग करु नकोस. योगायोगाने त्या तुझ्यासोबत प्रवास करत आहेत. हा तुझा शो आहे आणि कोणत्याही वेळी कोणालाही शोमधून बाहेर काढू शकतोस याची जाणीव करुन दिल्याबद्दल तुझे धन्यवाद', असं म्हणत सुनील ग्रोव्हरने नाराजी व्यक्त केली आहे.
 
आपल्या पोस्टच्या शेवटी सुनीलने कपिलला त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देताना लिहिलं आहे की, 'तू हजरजबाबी आहेस आणि तुझ्या फिल्डमधील सर्वोत्तम आहे. पण तू देव होण्याचा प्रयत्न करु नकोस'. सुनील ग्रोव्हरने कडक शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करत कपिलला चांगलंच झापलं आहे. 
 
सुनीलने दिलेल्या या सडेतोड उत्तरानंतर कपिल शर्माने प्रतिक्रिया देत, 'जिंकलस मित्रा, आता मी तुझ्यावर अजून जास्त प्रेम करु लागलो आहे. खूप मजा येणार आहे' असं म्हटलं आहे. याआधी कपिलने सुनील ग्रोव्हरची जाहीर माफी मागत 'सुनील पाजी मी चुकून तुम्हाला दुखावलं असेल तर माफ करा. मी तुमच्यावर किती प्रेम करतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मीदेखील खूप नाराज आहे', असं लिहिलं होतं.
 
कपिल शर्माच्या या माफीनाम्यावरही प्रचंड टिका झाली होती. लोकांनी कपिल शर्माला चांगलंच सुनावलं. काही लोकांनी तर स्टारडम कपिलच्या डोक्यात शिरला असल्याचं म्हटलं आहे. आधी मोदींना ट्विट करता, मराठी अभिनेत्रीशी गैरवर्तवणूक आणि आता दारु पिऊन सुनील ग्रोव्हरला मारहाण करण्यावरुनही कपिल शर्माला टार्गेट करण्यात आलं. 
 
कॉमेडी नाईट विथ कपिल या शोमध्ये डॉ. गुलाटी आणि रिंकू भाभी या व्यक्तीरेखा साकरणाऱ्या सुनिल ग्रोवर आणि शोचा होस्ट प्रसिद्ध हास्य कलाकार कपिल शर्मा यांच्यामध्ये वाद झाला होता. यामध्ये कपिलने दारुच्या नशेत आपला सहकारी असलेल्या सुनिल ग्रोवरला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर सुनिल ग्रोवर कपिलचा शो सोडण्याचा विचार करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
 
ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि मेलबर्नमध्ये शोसाठी कपिल आपल्या सहकाऱ्या सोबत गेला होता. हा शो संपवून दोन दिवसांपूर्वी कपिल आपल्या टीमसोबत ऑस्ट्रेलियाहून दिल्ली वाया मुंबई प्रवास करत असताना हा प्रकार घडला. ऑस्ट्रेलिया ते मुंबई असा इकॉनॉमी क्लासने प्रवास करतेवेळी कपिल शर्माने दारुच्या नशेत सुनिल ग्रोवरला मारहाण केली. या मारहाणीवेळी कपिल शर्मानं सुनिल ग्रोवरसाठी अपमानास्पद भाषेचाही वापर केल्याचे वृत्त आहे.
 
या घटनेवेळी विमानातील इतर प्रवासीही घाबरले होते. त्यांनी वैमानिकाला इमर्जन्सी लॅण्डिंगचीही मागणी केली होती. मात्र यावेळी टीमच्या इतर सदस्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर कपिल शर्मा शांत झाला. याशिवाय टीमचे इतर सदस्यही कपिलच्या वर्तणुकीवर नाराज असल्याचं वृत्त आहे.