प्रेक्षकांचा आवडता खंडेराया अर्थात देवदत्त नागे लवकरच चित्रपटात झळकणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या खंडोबा व्यक्तिरेखेला चाहत्यांचे विशेष प्रेम लाभले होते. प्रेक्षकांच्या मनात देवदत्तने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी जागा निर्माण केली आहे. गेली 3 वर्षे देवदत्तने फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली आहे. शूटिंग कितीला संपले, तरी देवदत्त आपले वर्कआऊट करणे चुकवत नव्हता. मालिका संपल्यानंतर काही दिवसांतच देवदत्त त्याच्या आगामी प्रोजेक्टवर काम करत आहे. त्याच्या आगामी चित्रपटात देवदत्तची वेगळी भूमिका असणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ‘वेलकम टू पट्टाया’ असे त्याच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात देवदत्त नेमकी कोणती भूमिका साकारणार, याबाबतचा खुलासा मात्र अद्याप झालेला नाही. तसेच, यात देवदत्तसह वरद चव्हाण आणि विजय चव्हाण हेदेखील दिसणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विजय चव्हाण हे आजारी होते. त्यामुळे जवळपास १ वर्षानंतर ते या चित्रपटाच्याद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाची कथा प्रशांत नेमण याची आहे, तर संगीत आनंद मेनन यांचे आहे. चित्रपटातील संवाद संजय सावंत यांचे आहे. त्यामुळे प्रेक्षक आपल्या लाडक्या देवाला मोठ्या पडद्यावर बघण्यास नक्कीच उत्सुक असतील.