'बाई वाड्यावर या' पलीकडचे निळू फुले... एक रिअल लाइफ हिरो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 12:34 PM2018-07-13T12:34:40+5:302018-07-13T12:47:12+5:30

'बाई वाड्यावर या' म्हणत आपल्या रांगड्या आवाजाने प्रेक्षकांच्या मानावर आधिराज्य गाजवणारा पडद्यावरचा रगेल आणि रंगेल खलनायक आणि खऱ्या आयुष्यातील निर्मळ माणूस निळू फुले यांचा आज नववा स्मृतिदिन आहे.

Death Anniversary of Nilu Phule : Intresting facts of this marathi Famous Actor | 'बाई वाड्यावर या' पलीकडचे निळू फुले... एक रिअल लाइफ हिरो

'बाई वाड्यावर या' पलीकडचे निळू फुले... एक रिअल लाइफ हिरो

googlenewsNext

'बाई वाड्यावर या' म्हणत आपल्या रांगड्या आवाजाने प्रेक्षकांच्या मानावर आधिराज्य गाजवणारा पडद्यावरचा रगेल आणि रंगेल खलनायक आणि खऱ्या आयुष्यातील निर्मळ माणूस निळू फुले यांचा आज नववा स्मृतिदिन आहे. 13 जुलै 2009 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायकांचा विचार केला तर सगळ्यात आधी डोळ्यापुढे येतात, ते सरपंच निळू फुले. त्यांच्यासारखा खलनायक मराठी चित्रपटसृष्टीत झाला नाही आणि होणारही नाही, असं म्हटलं तर वावगं वाटायला नको. 

रंगमंच असो किंवा मोठा पडदा, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद निळू फुलेंच्या अभिनयामध्ये होती. 80 -90च्या दशकात त्यांनी मराठीमध्ये रंगवलेला कपटी सरपंच आजही आपल्या डोळ्यासमोर आहे. 'बाई वाड्यावर या' हा निळू फुले यांचा डायलॉग अजरामरच झालाय. तो आज अनेक ठिकाणी ऐकू येतो. पण त्या पलीकडचे निळूभाऊ जाणून घेणं आणि त्यांचा आदर्श ठेवून काम करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे.


'हे' आहे खरे नाव


नाटक आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या निळूभाऊंचे खरे नाव निळकंठ कृष्णाजी फुले. पण निळूभाऊ याच नावाने ते सर्वत्र परिचित होते. पुढे चित्रपटसृष्टीतही ते याच नावाने लोकप्रिय झाले. त्यांचा जन्म पुण्यामध्ये झाला होता. त्यांचे वडिल भाजी आणि लोखंड विकून मिळणाऱ्या पैशावर आपले कुटुंब चालवत असत.

चित्रपटात येण्यापूर्वी केले 'हे' काम...


निळू फुलेंचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. त्यानंतर त्यांनी एका महाविद्यालयात माळीकाम केले. या कामात त्यांना मानसिक समाधान मिळत होतं. त्यातच काहीतरी व्यवसाय करायची त्यांची इच्छा होती. परंतु अनेक आर्थिक अडचणींमुळे त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. 

अभिनयासोबतच समाजसेवकही


निळू फुलेंनी कलाकार म्हणून काम करत असताना समाजासाठीही उल्लेखनीय योगदान दिलं होतं. त्यांनी सेवादलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली. अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही त्यांनी अनेक प्रयत्न केले. 

अभिनय क्षेत्रात पदार्पण


आधीपासूनच अभिनयाची आवड असलेल्या निळू फुलेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यान 'येरा गबाळ्याचे काम नोहे' हा वग लिहिला होता. त्यानंतर पु. ल देशपांडेंच्या नाटकात काम करून त्यांनी सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं होतं. परंतु खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या मनात त्यांनी जागा निर्माण केली ती 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यामुळेच. त्यावेळी त्यांनी माळीकाम सोडून अभिनय क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला होता.

अभिनयाच्या जोरावर परदेशातही पोहोचली किर्ती


1972मध्ये निळू फुलेंनी विजय तेंडुलकरांचे 'सखाराम बाइंडर' हे नाटक केलं होतं. सुरुवातीला निळू फुलेंना सखाराम बाईंडर साकारणं जमेल का, अशी शंका तेंडुलकरांना होती. परंतु निळूभाऊंनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर सखाराम अजरामर केला.

चित्रपटसृष्टीत पदार्पण


निळू फुलेंनी 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर सलग 40वर्षे त्यांनी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमी गाजवली. जवळपास 140पेक्षा अधिक मराठी चित्रपट आणि 12 हिंदी चित्रपटांतून निळू फुले यांनी काम केलंय. यापैकी 'सामना', 'सिंहासन', 'पुढचं पाऊल', 'शापित' यामध्ये साकारलेल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. 'पिंजरा' चित्रपटातील निळू फुलेंची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलीय. 

गाजलेले चित्रपट 


सामना,  सिंहासन, सोंगाड्या, अजब तुझे सरकार, मानसा परीस मेंढरं बरी,  आयत्या बिळावर नागोबा, एक गाव बारा भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदुषक, कडकलक्ष्मी, कळत नकळत, गणानं घुंगरू हरवलं, गल्ली ते दिल्ली, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, चोरीचा मामला, जगावेगळी प्रेमकहाणी, जन्मठेप, जिद्द, जैत रे जैत, दिसतं तसं नसतं, दीड शहाणे, धरतीची लेकरं, नणंद भावजय, नाव मोठं लक्षण खोटं, पटली रे पटली, पदराच्या सावलीत, पायगुण, पिंजरा, पुत्रवती, पैज, पैजेचा विडा, प्रतिकार, फटाकडी, बन्याबापू, बायको असावी अशी, बिन कामाचा नवरा, भन्नाट भानू, भालू, भिंगरी, भुजंग,  मालमसाला, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, राघुमैना, राणीने डाव जिंकला, रानपाखरं, रावसाहेब, रिक्षावाली, लाखात अशी देखणी, लाथ मारीन तिथं पाणी, वरात, शापित, सतीची पुण्याई, सर्वसाक्षी, सवत, सहकारसम्राट, सासुरवाशीण, सोबती, सोयरीक, हर्‍या नार्‍या जिंदाबाद यांसारख्या अजरामर चित्रपटांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

Web Title: Death Anniversary of Nilu Phule : Intresting facts of this marathi Famous Actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :