- Aboli Kulkarni

‘बॉलिवूडचा दबंग स्टार’ सलमान खान हा अभिनेत्री मौनी रॉय हिचा खूप मोठा फॅन आहे. त्याला तिचा अभिनय, व्यक्तिमत्त्व बेहद आवडते. सलमानने अलीकडेच एका कार्यक्रमात ‘मौनी रॉयला मी माझ्या होम प्रॉडक्शनमधून लाँच करणार आहे’, असे सांगितले. एका टीव्ही अभिनेत्रीला सलमान खानच्या प्रॉडक्शनअंतर्गत बे्रक मिळणे ही खूप मोठी संधी आणि अभिमानाची बाब आहे. टीव्ही जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अगोदर टीव्हीवर छोटा-मोठा रोल करायच्या; पण आता त्या बॉलिवूडच्या सर्वांत महत्त्वाच्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. कोण आहेत या अभिनेत्री पाहूया मग...

प्राची देसाई
क्यूट आणि गॉर्जिअस लूक असलेली अभिनेत्री प्राची देसाई हिने एकता कपूरच्या एका प्रसिद्ध टीव्ही मालिकेतून डेब्यू केला होता. या मालिकेमुळे तिची सर्वत्र प्रसिद्धी झाली. ‘रॉक आॅन’ या २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘लाइफ पार्टनर’, ‘तेरी मेरी कहानी’, ‘बोलबच्चन’,‘पुलिसगिरी’,‘अजहर’ या चित्रपटांमध्ये तिने उत्तम अभिनय साकारला आहे.

यामी गौतम
लखनऊ येथे राहणाऱ्या एका मुलीची कथा साकारणाऱ्या मालिकेतून यामी गौतम हिने टीव्ही जगतात पाऊल ठेवले. या मालिकेने प्रेक्षकांचे मन काही जिंकले नाही; पण बॉलिवूडला मात्र एक गुणी आणि क्यूट अभिनेत्री तिच्या रूपाने मिळाली. ‘विकी डोनर’मधून बॉलिवूड डेब्यू केल्यानंतर तिच्याकडे चित्रपटांचा ओघ वाढला. ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’, ‘बदलापूर’,‘सनम रे’, ‘काबिल’ या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

हंसिका मोटवानी
बालकलाकार म्हणून हंसिका मोटवानी हिने टीव्ही पडद्यावर एन्ट्री घेतली होती. तिची बालभूमिका सर्वांना खूप आवडली. त्यानंतर तिला अनेक मालिका मिळत गेल्या. ‘आप का सुरूर’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे.

करिश्मा तन्ना
सासू-सुनेच्या नात्यावरील एक मालिका २००१ मध्ये छोट्या पडद्यावर आली होती. या मालिकेने टीव्ही जगतात बरेच गॉसिप निर्माण केले. करिश्माने ‘दोस्ती : फ्रेंड्स फॉरेव्हर’ या चित्रपटातून डेब्यू केला. ‘ग्रँड मस्ती’ आणि ‘टीना अ‍ॅण्ड लोलो’ या दोन्ही चित्रपटांत सहकलाकार म्हणून काम केले.

सुरवीन चावला
शिमला येथे राहणाऱ्या पाच मुली आणि त्यांचे प्राध्यापक असणारे वडील यांच्यावर आधारित मालिकेतून सुरवीन चावला हिने टीव्ही डेब्यू केला. त्यानंतर तिने ‘हेट स्टोरी २’ मध्ये उत्कृष्ट भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. ‘उंगली’,‘क्रिएचर थ्रीडी’,‘वेलकम बॅक’ या बॉलिवूड चित्रपटांमधून भूमिका साकारल्या.

विद्या बालन
पाच मुली आणि त्यांचे मध्यमवर्गीय वडील यावर आधारित कथानक असलेल्या मालिकेतून विद्याने टीव्ही जगतात पाय रोवले. कमर्शियल जाहिराती, म्युझिक व्हिडिओमध्ये काम केल्यानंतर तिने ‘परिणीता’ चित्रपटाच्या माध्यमातून डेब्यू केला. ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘किस्मत कनेक्शन’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहानी’, ‘कहानी २’, ‘बेगमजान’ या चित्रपटांमध्ये तिने उत्कृष्ट भूमिका साकारल्या.