अनेक मालिका, चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी आवाज या सीरिजमधील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या मालिकेत अहिल्याबाई होळकर ही भूमिका साकारतेय. या मालिकेच्या निमित्ताने ऊर्मिलाने ‘लोकमत सीएनएक्स’सोबत मारलेल्या या खास गप्पा...
- 'अहिल्याबाई होळकर' ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तू कशा प्रकारे तयारी केलीस?
-महेश कोठारे यांनी मला या मालिकेविषयी विचारल्यावर क्षणाचाही विचार न करता ही मालिका करण्यास मी होकार दिला. अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारण्यासाठी अहिल्याबाई यांच्या आयुष्यावर आधारित विनया खडपेकर यांनी लिहिलेले पुस्तक वाचले. तसेच अहिल्याबाई यांनी स्वत: लिहिलेली काही खलिते उपलब्ध आहेत. त्यावरून मला अहिल्याबाई कशा होत्या हे जाणून घेण्यास अधिक मदत झाली. अहिल्याबाई यांचा कोणताही फोटो उपलब्ध नसल्याने त्यांच्या चित्रांवरूनच आम्ही त्यांची रंगभूषा आणि वेशभूषा कशी असणार याचा विचार केला. ही वेशभूषा नीलिमा कोठारे आणि नीता खांडके यांनी अतिशय सुंदररीत्या केली आहे.
- अहिल्याबाई या मालिकेची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुला आणि महेश कोठारे यांना भेटायला बोलावले होते. त्यांच्या भेटीबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
- अहिल्याबाई यांची तिथीनुसार 31 आॅगस्टला पुण्यतिथी असते. त्या वेळी इंदूरमध्ये अहिल्या उत्सव साजरा केला जातो. यंदा या कार्यक्रमासाठी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी मला आणि महेश कोठारे यांना खास आमंत्रण दिले होते. त्यांनी आमच्याशी जवळजवळ अर्धा-पाऊण तास गप्पा मारल्या. त्यांचा अहिल्याबाईंविषयींचा अभ्यास अचाट आहे. सुमित्रा महाजन इतक्या मोठ्या पदावर असल्या तरी त्या अतिशय साध्या आहेत. अहिल्या उत्सवातील रथयात्रेमध्ये अहिल्याबाईंची प्रतिमा ठेवण्याचा मान यंदा सुमित्रा महाजन यांनी मला आणि महेशजींना दिला.
- अहिल्याबाई ही भूमिका साकारताना तुला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले?
- या मालिकेसाठी मला तलवारबाजीचे चित्रीकरण करायचे होते आणि त्यात तलवारीचे वजन खूप जास्त असल्याने ती फिरवायला त्रास होत होता. तसेच ढाल सतत हातात पकडून माझ्या हाताला जखमादेखील झाल्या होत्या. या भूमिकेसाठी मला घोडेस्वारीदेखील शिकायला लागली. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी मला भाषेवर खूप मेहनत घ्यावी लागली. अहिल्याबाई यांची भाषा ही थोडीशी गावरान होती, असे मला सांगण्यात आले होते. पण त्या राजघराण्यातील असल्याने त्यांची भाषा अशी कशी असू शकते, याबद्दल माझ्या मनात शंका होती. त्यामुळे या मालिकेच्या संवादावर मी थोडा अभ्यास केला.
- तू चित्रपटात व्यग्र असूनही 'नृत्य आशा'ला वेळ कशा प्रकारे देतेस?
- 'नृत्य आशा' या नावाने माझी नृत्याची इन्स्टिट्यूट आहे. आशा जोगळेकर या माझ्या गुरूंच्या नावाने मी ही इन्स्टिट्यूट सुरू केलीय. मी २०-२५ वर्षे त्यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवलेत. माझ्या आयुष्यात त्यांचे खूप महत्त्व आहे. कला तुम्ही जोपासली तर ती तुमच्याकडे राहते, असे त्या नेहमी म्हणत असत. त्यामुळे माझी ही कला जोपासण्यासाठी आणि ती अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे इन्स्टिट्यूट सुरू केले. मी मुंबईच्या बाहेर असल्यास मला वेळ देणे शक्य नसते. मात्र मी मुंबईत असल्यास स्वत: क्लासमध्ये हजर राहून विद्यार्थ्यांना कथ्थकचे धडे देते.

महेश कोठारे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
मी महेश कोठारे यांच्यासोबत याआधीही काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा मला खूप चांगला अनुभव आहे. त्यांनी कित्येक वर्षांनंतर या मालिकेचे दिग्दर्शन केले. एक दिग्दर्शक म्हणून ते ग्रेटच आहेत. या मालिकेचे भाग ठरावीक असल्याने त्यांना मालिकेसाठी वेळ देणे शक्य झाले. आमची सेटवर, घरी नेहमीच चर्चा होत असे. इतर वेळीही आम्ही सगळे घरी एकत्र असताना अनेक वेळा आमची चित्रपट, मालिकांविषयी चर्चा होते. तसेच एकमेकांच्या नवीन प्रोजेक्टविषयी आम्ही बोलतो. मुंबईत असल्यास रात्रीचे जेवण एकत्र जेवायचा प्रयत्न करतो.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.