डान्स करायला कोणाला आवडत नाही. हो, कानावर डीजेची गाणी पडली की, आपोआपच पाय थिरकायला लागतात अन् नाचायची झिंग मग हळूहळू चढू लागते. वेड्यासारखे सैराट होऊन डान्स करणारे अनेक जण आपण पाहतो. काही जणांना डीजेच्या तालावर नाचायला आवडते, तर काही जणांना मस्त रोमँटिक कपल डान्स करायला आवडतो. मग अशी डान्स करण्याची झिंग आपल्या कलाकारांना चढली नाही तर नवलच. आता पाहा ना मराठी इंडस्ट्रीतील रोमँटिक कपल आदिनाथ अन् ऊर्मिला कोठारे या दोघांनाही डान्स करायला आवडतोच. ऊर्मिलाच्या डान्सिंग अदा तर आपण अनेक चित्रपटांतील गाण्यांमध्ये पाहिल्याच आहेत. आता हे दोघे कपल डान्स करीत आहेत. तुम्ही म्हणाल कपल डान्स तर करतायत ना मग यात काय नवीन आहे. तर त्याचे झाले असे की, हा कपल डान्स जरा हटकेच आहे. वेस्टर्न आऊटफिटमध्ये नाही तर चक्क मराठमोळ्या अंदाजात या दोघांनी कपल डान्स केला आहे. ऊर्मिलाने कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, हातात हिरवा चुडा, कानात झुमके तर आदिनाथने शेरवानी अन डोक्याला फेटा, अशा अस्सल गावरान लूकमध्ये हा वेस्टर्न तडक्याचा मराठमोळा कपल डान्स केलाय.

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.