नवी दिल्ली -   बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेत्री राणी मुखर्जी हिचे वडील आणि सिने दिग्दर्शक राम मुखर्जी यांचे रविवारी निधन झाले. ते गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यांनी गतकाळात अनेक चित्रपटात दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते. 
 आजारी असलेल्या राम मुखर्जी यांच्यावर दिल्लीमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. राम मुखर्जी यांनी हिंदी आणि बंगाली चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. तसेच मुंबईतील फिल्मालय या स्टुडिओच्या उभारणीमध्येही त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. लीडर (1964) आणि हम हिंदुस्थानी (1960) हे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट गाजले होते. लीडर चित्रपटामध्ये दिलीप कुमार आणि वैजयंती माला हे प्रमुख भूमिकेत होते. दरम्यान, राणी मुखर्जीचा पहिला चित्रपट बायर फूल (1996) या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनीच केले होते. तसेच राजा की आएगी बारात या राणी मुखर्जीच्या बॉलिवूडमधील पहिल्या चित्रपटाची निर्मितीदेखील राम मुखर्जी यांनीच केली होती.