Plastic Ban : स्वत:साठी, मुंबईसाठी प्लॅस्टिक नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 05:29 AM2018-06-24T05:29:56+5:302018-06-24T05:30:23+5:30

प्लॅस्टिक बंदीसाठी केंद्र, राज्य आणि मुंबई महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र आता प्रयत्न करण्याची खरी गरज आहे ती सर्वसामान्य नागरिकांनी.

For yourself, do not want plastic for Mumbai! | Plastic Ban : स्वत:साठी, मुंबईसाठी प्लॅस्टिक नको!

Plastic Ban : स्वत:साठी, मुंबईसाठी प्लॅस्टिक नको!

Next

प्लॅस्टिक बंदीसाठी केंद्र, राज्य आणि मुंबई महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र आता प्रयत्न करण्याची खरी गरज आहे ती सर्वसामान्य नागरिकांनी. कारण नागरिकांनी प्लॅस्टिक बंदीला हातभार लावला तरच पर्यावरणाचे आणि खऱ्या अर्थाने पुढील पिढीचे नुकसान टाळता येणार आहे. प्लॅस्टिक बंदीसाठी केवळ प्रशासकीय प्रयत्न पुरेसे ठरणार नाहीत तर समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्यासह पर्यावरण जपण्यासाठी सरसावले पाहिजे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी ‘लोकमत’च्या ‘कॉफी टेबल’ मुलाखतीत केले.

प्लॅस्टिक बंदी नक्की कोणाची जबाबदारी?
मुंबई शहर आणि उपनगरात वास्तव्यास असलेल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. पर्यावरणास हानीकारक अशा साहित्याचा वापर करता कामा नये. प्लॅस्टिकचा वापर करून आपण केवळ आपले नाही तर समाजाचे आणि पुढील पिढ्यांचेही नुकसान करत आहोत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जेव्हा प्लॅस्टिक नव्हते तेव्हा आपले व्यवहार होतच होते; आणि आजही होत आहेत. झाले एवढेच आहे की आपण आता प्लॅस्टिकचा वापर प्रमाणाबाहेर सुरु केला आहे. साहजिकच त्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान केले आहे. मुळात पर्यावरण असे नाही, तर आपल्या संबंधित प्रत्येक घटकाचे नुकसान प्लॅस्टिकमुळे होत आहे. परिणामी कोणीतरी सांगते आहे; किंवा महापालिका सांगते आहे, म्हणून आपण प्लॅस्टिकचा वापर कमी करता कामा नये तर आपणहून आणि आपली जबाबदारी म्हणून प्रत्येकाने वापर कमी केला पाहिजे.

केंद्र, राज्य आणि महापालिकेची काय भूमिका आहे?
केंद्र असो, राज्य असो वा मुंबई महापालिका असो. प्रत्येकाचे म्हणणे एकच आहे की दैनंदिन व्यवहारात प्लॅस्टिकचा वापर करता कामा नये. याबाबतचे म्हणणे मांडताना प्रशासनाने साहजिकच पर्यावरणाचा एका अर्थाने आपल्या सर्वांचा विचार केला आहे. आणि तो करणे साहजिकच आहे. आणि ही प्रक्रिया काही आता घडलेली नाही. केंद्राने यापूर्वी प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. यापूर्वी कायदे केले आहेत. राज्यानेही याबाबत वेळोवेळी कायद्याचे पालन केले आहे. आणि महापालिकेनेही आपले कर्तव्य बजावताना वेळोवेळी मुंबईकरांना प्लॅस्टिकचा वापर करू नये, असे आवाहन केले आहे. मुंबईकरांना एवढेच करायचे आहे की, आपल्यासाठी, समाजासाठी प्लॅस्टिकचा वापर कमी करायचा आहे.

प्लॅस्टिकच्या नक्की कोणत्या वस्तू वापरायच्या नाहीत?
एकदा वापरले जाणारे प्लॅस्टिक म्हणजे एकदा वापरून फेकून दिली जाणारी प्लॅस्टिकची पिशवी, चहाचे कप; म्हणजे ज्याने पर्यावरणाची हानी होते. असे घटक आपल्या दैनंदिन व्यवहारातून हद्दपार करा, असे महापालिकेचे म्हणणे आहे. आपले आई-बाबा, आजी-आजोबा यांनी प्लॅस्टिक वापरले नाही. किंवा त्यांच्या दैनंदिन व्यवहारात प्लॅस्टिकचा वापर अधिक नव्हता. आपल्यालाही तेच करायचे आहे. आपण जेव्हा आपली जबाबदारी ओळखून वागू; तेव्हा आपल्या पुढील पिढ्याही आपल्यासारखेच वागतील. पुढील पिढ्याही प्लॅस्टिकचा वापर करणार नाहीत. मात्र यासाठीची सुरुवात आपणास करायची आहे. आणि हीच वेळ आहे. अन्यथा भविष्यात आपणाला अनेक संकटांचा सामना करावा लागेल.

महापालिका कशी, कुठे कारवाई करणार?
पिशवी ५० मायक्रोपेक्षा कमी असो; अन्यथा जास्त असो. प्लॅस्टिकने पर्यावरणाचे म्हणजे आपलेच नुकसान होते याचा विचार व्हायला हवा. पालिका दुकानदार, मॉल, हॉटेल, मार्केट येथे प्लॅस्टिकविरोधी कारवाई करणार आहे. एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे प्लॅस्टिकची पिशवी देणारा जेवढा जबाबदार आहे; तेवढाच पिशवी घेणाराही जबाबदार आहे. परिणामी प्लॅस्टिकबंदीसाठी महापालिकेला नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय प्लॅस्टिक बंदी शक्य नाही.

महापालिकेचे पथक कसे काम करेल?
प्लॅस्टिक बंदीविरोधात कारवाई करण्यासाठी महापालिकेने पथकांची स्थापना केली आहे. प्रत्येक वॉर्डात आमची पथक कार्यान्वित असणार आहे. कारवाईसाठी एकूण २४९ जणांची टीम कार्यरत असेल. भविष्यात यामध्ये आणखी वाढ केली जाईल. प्रत्येक टीममध्ये एक प्रमुख असणार आहे. टीममधील प्रत्येकाला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. टीममधील सदस्याला निळ्या रंगाचा गणवेश दिला गेलेला आहे. त्यांना ओळखपत्रही असेल. हे पथक ‘प्लॅस्टिक निर्मूलन पथक’ म्हणून ओळखले जाईल.

पथकाच्या कारवाईदरम्यान भ्रष्टाचार बोकाळेल?
‘प्लॅस्टिक निर्मूलन पथक’ कारवाई करताना भ्रष्टाचार होईल, असे म्हणणे मांडले जात आहे, मात्र असे होणार नाही. कारण ही पथके केवळ एका जागी कार्यरत नसतील. त्यांच्या कारवाईच्या जागा म्हणजेच वॉर्ड बदलण्यात येईल. असे केल्यास त्यांच्यात ‘सेल्फ इंटरेस्ट’ निर्माण होणार नाहीत. परिणामी भ्रष्टाचारास जागा शिल्लक राहणार नाही.

कारवाईत गोळा झालेल्या प्लॅस्टिकचे काय करणार?
‘प्लॅस्टिक निर्मूलन पथक’च्या कारवाईदरम्यान गोळा झालेले प्लॅस्टिक आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदणीकृत संस्थांकडे जमा करणार आहोत. नोंदणीकृत संस्था त्यांच्या पद्धतीने गोळा झालेल्या प्लॅस्टिकाचा पुनर्वापर करण्यावर भर देणार आहोत. महाराष्ट्र प्रदूषण मंडळासह नोंदणीकृत संस्थांनी पुढे काम करायचे आहे. मात्र ही वेळ येणार नाही याचे भान नागरिकांनी ठेवायचे आहे. कारण प्लॅस्टिकचा वापर केला नाही तर साहजिकच कारवाई होणार नाही. आणि कारवाई झाली नाही तर साहजिकच पुढील प्रक्रिया टाळता येणार आहे.

दंड नेमका किती; पाच हजार की दोनशे रुपये?
प्लास्टिकचा वापर केल्यास पाच हजार रुपयांऐवजी दोनशे रुपये दंड आकारण्यात यावा, असे म्हणणे मांडण्यात येत आहे. आम्हीही यावर विचार केला. कारण सर्वसामान्य व्यक्तीला पाच हजार रुपये दंड ठोठावणे हे अधिकच आहे. परिणामी सर्वसामान्यांसाठी किमान दोनशे रुपये दंड आकारण्याबाबत आम्हीही सकारात्मक होतो. याकरिता आम्ही मुंबई महापालिकेच्या विधी समितीच्या बैठकीत दोनशे रुपये दंड आकारण्याबाबतचा प्रस्तावही दाखल केला. मात्र दंड कमी करण्याबाबतचे अधिकारी महापालिकेला नाहीत. या कारणाने हा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठविला आहे.

आता नागरिकांनी काय करावे?
आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा आपण तिथले नियम पाळतो. कारण येथे नियम पाळले नाहीत तर मोठा दंड आकारला जातो. एका अर्थाने आपल्या मनात भीती असते. जर आपण तेथे नियम पाळू शकतो, तर येथे नियम का पाळू शकत नाही? हाही प्रश्न आहे. आपण नियम पाळले, कायदे पाळले तर आपल्या त्रास होणार नाही. प्लॅस्टिक वापरले तर पाच हजार रुपये दंड आहे; किमान या भीतीपोटी तरी नागरिक प्लॅस्टिकाचा वापर करणार नाहीत हा आमचा उद्देश आहे.

कुठे-कुठे प्लॅस्टिक बंदी आहे?
प्लॅस्टिक बंदीचा आढावा घ्यावयाचा झाल्यास कर्नाटक, केरळ अशा १६ राज्यात प्लास्टिकवर बंदी आहे. जगात ६० देश असे आहेत की तेथे प्लॅस्टिकवर बंदी आहे. काही महापालिकाही याबाबत उल्लेखनीय काम करत आहेत. आता महाराष्ट्रातही प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. आपणच पुढाकार घेत काम केले तर साहजिकच आपला उद्देश सफल होईल.

जनजागृती कशी करत आहात?
प्लास्टिक बंदीबाबत आपण जनजागृती केली आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये ही जनजागृती करण्यात आली आहे. मुंबईमध्ये याबाबतचा चित्ररथ फिरविण्यात आला. एका अर्थाने प्लास्टिक बंदी व्हावी, याकरिता प्रत्येक घटक आम्ही लोकांसमोर मांडला आहे. आणि उद्देश हाच आहे की, पर्यावरणाची हानी होऊ नये. एका अर्थाने समाजाची, पुढील पिढ्यांची हानी होऊ नये.


प्रतिबंधित प्लॅस्टिक म्हणजे काय?
प्लॅस्टिकपासून बनविल्या जाणाºया पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या), थर्माकोल व प्लॅस्टिकपासून बनविण्यात येणाºया व एकदाच वापरल्या जाणाºया डिस्पोजेबल वस्तू. उदा. ताट, कप्स, प्लेट्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे इत्यादी.
हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे भांडे व वाटी, स्ट्रॉ, नॉन वोवन पॉलिप्रॉपिलेन बॅग्स.
द्रव्य पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच, कप
थर्माकोल व प्लॅस्टिकचा वापर सजावटीमध्ये करण्यास मनाई आहे.

प्लॅस्टिक संकलन व्यवस्था
प्लॅस्टिक संकलन केंद्रे - महापालिका मंडई, ३७ सुका कचरा संकलन केंद्र, २५ महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणे.
प्लॅस्टिक संकलनासाठी टोल फ्री क्रमांक १८००२२२३५७ वर फोन करून घरापासून प्लॅस्टिक महापालिकेकडे पाठविण्याची संधी.
प्लॅस्टिक बंदी यशस्वी करण्यासाठी रोटरी, लायन्स, लोकमान्य सेवा संघ या स्वयंसेवी संघाचा सहभाग घेण्यात आला आहे.
सोशल मीडियामार्फत प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

कारवाई कुणावर असेल?
राज्यातील कोणतीही व्यक्ती व व्यक्तीचा समूह
शासकीय व अशासकीय संस्था
शैक्षणिक संस्था
औद्योगिक घटक
क्रीडासंकुल, चित्रपट, नाट्यगृह
वाणिज्यिक संस्था व कार्यालये
धार्मिक स्थळे व धार्मिक संस्था
समारंभाचे हॉल
हॉटेल व ढाबे
दुकानदार
मॉल
कॅटरर्स
घावूक व किरकोळ विक्रेता
फेरीवाले
वितरक
वाहतूकदार
मंडई
स्टॉल

(शब्दांकन : सचिन लुंगसे)

Web Title: For yourself, do not want plastic for Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.