तरुण हे देशासाठी लोढणे ठरू नयेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 04:55 AM2019-07-20T04:55:05+5:302019-07-20T04:55:12+5:30

- पवन के. वर्मा, हल्ली एक ठाशीव विधान करण्यात येत असते की, जगातील तरुणांचे आधिक्य असलेल्या राष्ट्रात भारताचा समावेश ...

Young people should not be strained for the country | तरुण हे देशासाठी लोढणे ठरू नयेत

तरुण हे देशासाठी लोढणे ठरू नयेत

Next

- पवन के. वर्मा,
हल्ली एक ठाशीव विधान करण्यात येत असते की, जगातील तरुणांचे आधिक्य असलेल्या राष्ट्रात भारताचा समावेश होतो. आकडेवारीसुद्धा या विधानाला पुष्टी देत असते. आपल्या देशातील ६५ टक्के लोकसंख्या ही तरुणांची आहे. चीन व जपान या महत्त्वाच्या दोन राष्टÑांत वृद्धांचे प्रमाण जास्त आहे. त्या तुलनेत आपल्याकडे तरुण जास्त असणे ही आपली जमेची बाजू आहे, पण तरुण राष्ट्र या नात्याने काही जबाबदाऱ्या आपोआप पार पाडाव्या लागतात. तरुणांचे राष्ट्र म्हणून आपले राष्ट्र ओळखले जात असले, तरी त्या लेबलची पुनर्रचना करण्याची गरज वाटू लागली आहे. त्या अगोदर आपल्या राष्ट्रातील तरुण नेमके काय आहेत, हे समजून घ्यायला हवे.
या देशाच्या तरुणांच्या काही आकांक्षा आहेत. मुख्य म्हणजे, त्यांचे पाय जमिनीशी घट्ट जुळलेले आहेत आणि झेप घेण्याची त्यांची इच्छा आहे. ते पुढे जाण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांना नोकरी हवी आहे, असलेली नोकरी सोडून ते चांगली नोकरी मिळविण्यास उत्सुक असतात. चांगले जीवन जगण्यासाठी चांगल्या गोष्टींचा त्यांना हव्यास आहे. अधिक पैसे कमवावे आणि अधिक खर्च करावे, असे त्यांना वाटते. समृद्धीकडे जाण्यास आणि नवीन संधी प्राप्त करण्यास ते उत्सुक आहेत, पण त्यासाठी लागणारी गुणवत्ता आणि ऊर्जा त्यांच्याकडे आहे का?


आजचे तरुण ध्येयवादाने झपाटलेले आहेत का? पूर्वीच्या पिढीच्या तुलनेत ते नीतिमत्ता किती पाळतात? नैतिकतेला त्यांच्या जीवनात किती स्थान आहे? या प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच मिळतील, याची मला भीती वाटते. त्यांच्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी स्वत:पाशी प्रामाणिकता असावी, याची त्यांना गरज भासत नाही. ते उपयुक्ततावादी अधिक आहेत. कारण त्यांना यापूर्वी खोटी अभिवचने दिलेली त्यांनी बघितली आहेत. भ्रष्ट लोकांकडून उपदेशाचे डोस कसे पाजले जातात, हेही त्यांनी पाहिले आहे. त्यामुळे उत्तुंग ध्येयवाद हे साध्य असू शकते, असे आजच्या तरुणांना वाटतच नाही.
ध्येयवादी राहू द्यात, पण त्यांचे सांस्कृतिक मूळ तरी घट्ट रुजलेले आहे का, याविषयी शंकाच वाटते. आपल्या शिक्षण पद्धतीमुळे चांगल्या-चांगल्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीचे ज्ञान बाळगण्याची गरज वाटत नाही. आजचे तरुण हे खेड्यातून शहराकडे परागंदा झालेले असतात. त्यामुळे नैसर्गिकरीत्या प्राप्त होणाºया संस्कृतीच्या संस्कारापासून ते दूर गेलेले असतात. संयुक्त कुटुंबापासून तुटून निघाल्यामुळे स्वत:च्या संस्कृतीपासूनही ते दूर गेलेले असतात. आपल्या परंपरा, आपल्या भाषेतील म्हणींशी त्यांचा काडीचाही संबंध नसतो. आपला इतिहास, परंपरेने चालत आलेल्या गोष्टी आणि तत्त्वज्ञान हेही त्यांना ठाऊक नसते. आपले सण ते निर्जीवपणे साजरे करतात, पण त्या सणांमागील प्रतीकात्मकतेशी त्यांचे काही देणे-घेणे नसते.
आजचे तरुण निधार्मिक तरी आहेत का? अंशत: आहेत, अंशत: नाहीत. जीवन जगण्यासाठी जेवढी निधार्मिकता आवश्यक आहे, तितकी ते ग्रहण करतात. त्यांच्या आकांक्षांच्या मार्गात येणाºया गोष्टींमुळे ते मार्गभ्रष्ट होत नाहीत. त्यांची निधार्मिकता ही त्यांची निष्ठा नसते, तर त्यांना सोईपुरती ती हवी असते. आजच्या बहुतेक तरुणांना मुल्ला मौलवी आणि महंतांच्या कचाट्यापासून दूर राहावे वाटते आणि निधार्मिकतेपासून मिळणारे लाभ हवेसे वाटत असतात. असे असले, तरी अनेक तरुण हे उजव्या कट्टरवाद्यांसाठी इंधन म्हणून उपयोगी पडतात! आपल्या सांस्कृतिक वारशाची पुरेशी जाणीव नसल्यामुळे ते हा मार्ग स्वीकारतात. उपनिषदे काय सांगतात, हे जर तुम्हाला ठाऊक नसेल, सत्य एकच असते, पण विद्वान लोक ते अनेक नावांनी ओळखतात (एक सत्य विप्र: बहुदा वदन्ती) हे एकच तत्त्व उदाहरण म्हणून देता येईल. तेव्हा असे तरुण त्यांच्याच धर्माच्या आधारे केल्या जाणाºया फसवणुकीला बळी पडण्याची शक्यता जास्त असते. असे अनेक तरुण ज्यांना हिंदुत्वाचे ओ चे ठो माहीत नसते, मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे काय हे ठाऊक नसते, ते बिनधास्तपणे ‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊ लागतात!

आजचे तरुण नि:स्वार्थी तरी आहेत का? त्यातील काही जण नक्कीच नि:स्वार्थी आहेत, पण स्पर्धात्मक जीवनामुळे त्यांचा स्वार्थ बळावला आहे. कारण त्यामुळेच या स्पर्धात्मक जगात यश मिळणे शक्य होते. आपण इतरांसाठी काही करू शकतो, याचा विचार करायलासुद्धा या स्पर्धेमुळे त्यांना वेळ मिळत नाही. स्वत:चे जगणेच इतके आव्हानात्मक झाले आहे की, वंचितांकडे लक्ष द्यायलाही कुणाला वेळ मिळत नाही. मोगल साम्राज्याच्या पडत्या काळात इक अनार, सौ बिमार हा वाक्प्रचार प्रसिद्ध होता. शंभर आजारी लोकांना एक डाळिंब कितपत पुरेसं पडणार? यशाचे फळ पदरात पाडून घेण्यासाठी हजारो हात पुढे सरसावतात. त्यामुळेच समाजाला असंवेदनशीलतेने ग्रासले आहे. समाजाचे आपण देणे लागतो, ही भावनाच समाजातून नष्ट होत चालली आहे.
आपल्या तरुणांमध्ये गुणवत्ता आहे. तंत्रज्ञानाची आवड आहे. ते उत्साही आहे, नव्या कल्पनांनी पछाडलेले आहेत. आकाशाला गवसणी घालण्याची त्यांच्यात क्षमता आहे, पण अनेकांना योग्य संधी मिळत नाही, हे दुर्दैव आहे. आपल्यासमोर फार मोठी आव्हाने आहेत. त्यामुळेच देशात तरुणांची संख्या जास्त असणे हे ओझे ठरू नये, याची आपण दक्षता बाळगण्याची गरज आहे.
(राजकीय विश्लेषक)

Web Title: Young people should not be strained for the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.