नव्या ‘थेअरी’ने तरी प्रद्युम्नला न्याय मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 02:45 AM2017-11-10T02:45:15+5:302017-11-10T02:45:33+5:30

निष्पाप बालमन एवढे विकृत होतेच कसे? ही सूड भावना त्यांच्यात कुठून येते, हा गंभीर प्रश्न आहे आणि शासनासोबतच कुटुंब आणि समाजानेही यावर सखोल चिंतन करण्याची गरज आहे.

Will the new 'Theory' get justice for Pradyumna? | नव्या ‘थेअरी’ने तरी प्रद्युम्नला न्याय मिळणार का?

नव्या ‘थेअरी’ने तरी प्रद्युम्नला न्याय मिळणार का?

Next

निष्पाप बालमन एवढे विकृत होतेच कसे? ही सूड भावना त्यांच्यात कुठून येते, हा गंभीर प्रश्न आहे आणि शासनासोबतच कुटुंब आणि समाजानेही यावर सखोल चिंतन करण्याची गरज आहे. मुले गुन्हेगारीकडे वळण्याची अनेक कारणे आहेत. घरातील आर्थिक, भावनिक परिस्थिती, मित्रांची साथसंगत ही सुद्धा वाढत्या बालगुन्हेगारीस कारणीभूत आहे.

गुडगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न ठाकूर या सहा वर्षीय मुलाच्या निर्घृण हत्या प्रकरणाला मिळालेले नवे वळण अत्यंत धक्कादायक, डोके चक्रावून टाकणारे आणि तेवढेच अविश्वसनीय आहे. याच शाळेत अकरावीत शिकणाºया एका विद्यार्थ्याने शाळेची परीक्षा आणि पालक सभा पुढे ढकलली जावी, या अतिशय क्षुल्लक कारणावरून प्रद्युम्नची हत्या केल्याचा सीबीआयचा दावा आहे. तपास संस्थेने या विद्यार्थ्याला अटक केली असून, त्याने आपला गुन्हा कबूल केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे संशयित मुलाच्या पालकांनी मात्र आपल्या पाल्यास विनाकारण या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी गुडगाव पोलिसांनी स्कूल बसच्या कंडक्टरला अटक केली होती आणि हत्येपूर्वी मृत बालकावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला असल्याचा संशयही व्यक्त केला होता. सीबीआयच्या या नव्या थेअरीमुळे दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडाच्या चौकशीत गुडगाव पोलीस आणि सीबीआय आमनेसामने उभे ठाकले आहेत. या प्रकरणात अकरावीच्या विद्यार्थ्याचे आलेले नाव आश्चर्यचकित करणारे आणि बालमनाची बदलत चाललेली मानसिकता दर्शविणारे आहे. अमेरिकेसारख्या देशात जेथे बंदुकीसारखे शस्त्र अगदी सहजपणे उपलब्ध असते; शाळकरी विद्यार्थ्यांनी शाळेत अंदाधुंद गोळीबार केल्याच्या घटना घडत असतात. भारतात मात्र अशाप्रकारच्या विकृतीपासून मुले सुरक्षित असल्याचे आजवर मानले जात होते. परंतु प्रद्युम्न हत्याकांडातील या नव्या खुलाशाने या विश्वासाला तडा गेला आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम, इंटरनेटसारख्या सुविधा यामुळे मुलांना बालवयातच नको त्या गोष्टी कळू लागल्या आहेत. काय चांगले आणि काय वाईट हे समजण्याची परिपक्वता नसल्याने बरेचदा मग ते वाईट मार्गाकडे वळत असल्याचे अलीकडच्या काळात प्रकर्षाने जाणवत आहे. त्यांच्यातील गुन्हेगारीची मानसिकता वाढते आहे. देशातील बालगुन्हेगारीच्या वाढत्या आलेखावरून त्याची प्रचिती यावी. देशात दरवर्षी बालगुन्हेगारीची सरासरी ३५ हजार प्रकरणे उघडकीस येत असतात. एरवी बालगुन्हेगारी म्हटले की आपल्यासमोर अनाथ, बेकार, रस्त्यावर वाढणारी अथवा घरातून पळून जाणारी मुलेच नजरेसमोर येतात. परंतु बालगुन्हेगारीचे हे विश्व आता केवळ गरिबांपुरतेच सीमित राहिलेले नाही. चोरी, पाकीटमारी, हाणामारी हे किरकोळ गुन्हे झाले. आता तर खून, दरोडे, बलात्कार, विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांमधेही त्यांचा समावेश वाढला आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. या वास्तवाने मुलांवरील संस्कार, त्यांची जडणघडण, शिक्षणातील त्रुटी तसेच व्यवस्थेतील अकार्यक्षमतेसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रद्युम्न प्रकरणात सीबीआयची थेअरी चुकीची निघावी, असे मनोमन सर्वांनाच वाटत असेल. पण हेच सत्य असल्यास ते स्वीकारून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासन आणि समाजाने एकजुटीने प्रयत्न करावे लागतील.

Web Title: Will the new 'Theory' get justice for Pradyumna?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.