...शख्स परेशान सा क्यों है?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 02:33 AM2018-04-19T02:33:01+5:302018-04-19T02:33:01+5:30

मुंबईत ३१ टक्के रुग्ण मनोविकारांशी, मानसिक ताणांशी झगडत असल्याचा मुंबई महापालिकेने जाहीर केलेला आकडा पाहिला, तर या महानगरीचे मन आतून कसे पोखरले जातेय आणि मुंबापुरीच्या आनंदाचा निर्देशांक किती फसवा आहे, याची प्रचिती येते.

 ... why is the person irritated? | ...शख्स परेशान सा क्यों है?

...शख्स परेशान सा क्यों है?

Next

मुंबईत ३१ टक्के रुग्ण मनोविकारांशी, मानसिक ताणांशी झगडत असल्याचा मुंबई महापालिकेने जाहीर केलेला आकडा पाहिला, तर या महानगरीचे मन आतून कसे पोखरले जातेय आणि मुंबापुरीच्या आनंदाचा निर्देशांक किती फसवा आहे, याची प्रचिती येते. या ताणाच्या जगण्यावर होणाऱ्या परिणामातून समोर आलेले मधुमेहाचे २३.२ टक्के, अतिताणाचे २२.८ टक्के व हृदयविकाराचे साडेसात टक्के रुग्ण जर यासोबत जोडले तर सुमारे ८४ टक्के मुंबईकर हे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तणावाखाली जगत असल्याचे वास्तवही यातून समोर आले. ही स्थिती एकट्या मुंबईची नाही; तर मुंबईच्या कुशीतील उपनगरे, ठाणे-पालघर-रायगड जिल्हा आणि नवी मुंबईचीही आहे. सध्याची आकडेवारी पालिका रुग्णालयांतील आहे. त्यात खासगी रुग्णालयांचा समावेश केला, तर चित्र आणखी विषण्ण करणारे असेल. जीवनशैलीत बदल होत ती दिवसेंदिवस गतिमान, प्रचंड स्पर्धेची व उद्याची फारशी शाश्वती नसलेली होणे हे या तणावाचे मूळ आहे. ज्यांच्या हाती नोकरी आहे त्यांना ती टिकवण्याचा; तर शिक्षण असून किंवा नसूनही बेरोजगार राहावे लागत असल्याचा ताण, वाढत्या महागाईमुळे खर्चाची तोंडमिळवणी करण्यातील ओढग्रस्तता, वेगवेगळ्या कारणांमुळे रोजचा अस्वस्थ करणारा प्रवास, त्यातून येणारे नैराश्य- उदासीनता- चिडचिड, पुरेशी झोप न होणे व आनंदाचे-समाधानाचे क्षण कमी होत गेल्याचा हा परिपाक असल्याचा निष्कर्ष यातून समोर येतो. सोशल मीडियातून माणसे सतत संपर्कात आली, पण त्यांच्यातला संवाद हरपला. त्यामुळे मन मोकळे करावे, असे भोवती कुणी सापडत नाही, यामुळेही ताणाखाली वावरणारी मने कुरतडली जात आहेत. एक चांगले झाले, यानिमित्ताने मुंबईचा आरोग्य निर्देशांक समोर आला. मनावर ताण आहे, हे मान्य करून त्याबाबत बोलण्याइतका मोकळेपणाही समाजात येऊ लागला. यामुळे पुढच्या काळात आरोग्य सुविधांना कशी दिशा द्यायची, याचे चित्र ठरवता येऊ शकते. जगण्याची भ्रांत असलेले किंवा आर्थिक सुबत्ता असलेले या दोन्ही टोकांपर्यंत धावणाºया जगण्याच्या लंबकात चित्ती पुरेसे समाधान नसल्याची बाब एकसमान असल्याचे सांगत या आकडेवारीने जीवनशैलीचे आजार ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही, हेही समोर आणले. यातून आरोग्याच्या सुविधांत बदल होतीलही, पण त्याही पलीकडे जाऊन जगण्याचा आनंद कसा वाढवता येईल, यावर लक्ष देण्याची; त्यासाठी जागृती करण्याची गरज आहे. मन प्रसन्न करण्याची गुरूकिल्ली प्रत्येकालाच सापडेल असे नव्हे! पण किमान ताणतणावांचा निचरा कसा होईल, कोंडलेली, घुसमटलेली मने मोकळी कशी होतील यावर काम करता आले; तरी ताणांचा निचरा होण्यास व आयुष्याचा खळाळता झरा वाहण्यास मदत होईल. सध्या तेवढेही पुरेसे आहे.

Web Title:  ... why is the person irritated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई