मंत्र्यांच्या केबिनमध्ये सदैव गर्दी असते. मंत्री एकावेळी आठदहा जणांशी बोलून गा-हाणी समजून घेतात, पीए, पीएसना सूचना देत असतात. लगेच संबंधितांशी फोनवर बोलतात. प्रत्येकाचे समाधान करण्याचा त्यांचा आटापिटा चाललेला असतो. तरीही रोषाला तेच बळी पडतात. या उलटचे चित्र हे तलाठ्यापासून सचिवांपर्यंत दिसते. सामान्य माणूस काम घेऊन आला तर साहेबांचे पीए त्याला टरकवतात. ‘साहेब नाहीत, मिटिंगला गेलेत’ हे परवलीचे शब्द असतात. गोरगरिबांची सावलीही काही बड्या अधिका-यांना चालत नाही. तेच अधिकारी कंत्राटदारांना बरोबर भेटतात. सचिवांची दुस-या खात्यात बदली झाली की त्यांचे निष्ठावंत कंत्राटदार नवीन केबिनमध्ये दिसू लागतात. शेवटच्या माणसाशी निगडित असलेल्या एक सचिव त्यांच्या केबिनमध्ये कलर्स वाहिनीवरील मालिका बघत असतात. राज्याचे मुख्य सचिव भेटत नाहीत म्हणून नागपूरच्या एका अवलियाला हायकोर्टात जावे लागते! मुख्य सचिव संवेदनशील आहेत, साहित्यिक आहेत पण लोकांच्या मनातील अस्वस्थताही समजून घेतली पाहिजे. मंत्रालयात नागरिकांंच्या येण्यावर सुरक्षेच्या नावाखाली बंधने टाकण्यात आली आहेत. सुरक्षेपेक्षा कोणी मंत्रालयात येऊन विष घेईल आणि मग आपली बदनामी होईल याची सरकारला जास्त चिंता दिसते. अन् बाहेर किड्यांबरोबर शेतक-यांचा जीव घेणारी कीटकनाशके नोकरशाहीच्या कृपाछत्राखाली फोफावतात. भाकरीच्या चंद्रासाठी उभे आयुष्य वेचणाºया भूमिपुत्रांची ही आर्त कहाणी आहे. सामान्यांचा कुणी वाली नाही ही भावना वाढीस लागली आहे. तेव्हा सामान्यांच्या समस्यांची दखल घेण्यासाठी एखादे स्वतंत्र मंत्रालय सुरू करा. ‘पगारात भागवा’ इतकेच ‘सौजन्याने वागा’ अभियान राबवा. लोकभावनांचे बॉम्ब अन् पिस्तूल झाले तर बंड होईल.
नागपूर जिल्ह्यातील तेजराज मंगल हा शिक्षक अन् त्याचा मुलगा वर्षभरापासून त्याच्यावरील उपचाराची भरपाई मिळावी म्हणून खेटे घालताहेत. मुजोर कर्मचारी त्याची फाईल एका टेबलवरून दुसºया टेबलवर हलवायलादेखील तयार नाहीत. असे हजारो मंगल दरदिवशी तहसीलदारापासून मंत्रालयाचे उंबरठे झिजवतात. लोकांना ‘अटेंड’ करणे हे एकच काम अधिकाºयांना नाही हे खरे पण किमान आलेल्यांच्या दु:खावर फुंकर घालायला तर वेळ देता येतो?
शैलेंद्र परांजपे हे मुंबईत एक पत्रकार आहेत. ते पुण्यात असताना एकदा प्रख्यात समाजवादी नेते ग.प्र.प्रधान यांच्याकडे गेले. दबकतच बेल दाबली. शैलेंद्र म्हणाला ‘मी जरा भीतभीतच आलो. म्हटलं दुपारची; आरामाची वेळ आहे; तुम्हाला काय वाटेल?’ प्रधान यांनी त्यावर दिलेले उत्तर अफलातून होते. ते म्हणाले, माझ्याकडे येण्याची कुठल्याही कारणाने का होईना तुुला भीती वाटते हा माझा पराभव आहे. आता मला स्वत:ला दुरुस्त केले पाहिजे.’- किती ही संवेदनशीलता!
आजही ‘साहेब’ जमातीबद्दल सामान्यांना भीती वाटते. त्यांच्या केबिनमध्ये एकदम कसे जावे? असा मानसिक दबाव असतो. आजची नोकरशाही प्रधान मास्तरांच्या चष्म्यातून सामान्यांकडे पाहील तो सुदिन समजावा. शेवटच्या माणसाचा आयुष्याशी संघर्ष संपून त्याने दीपोत्सव अनुभवावा यासाठी नोकरशाहीने योगदान द्यावे. उद्यापासूनचे दीपपर्व हा या योगदानाचा नवआरंभ ठरावा.