अण्णांचे आंदोलन का फसले?

By सुधीर लंके | Published: April 5, 2018 12:28 AM2018-04-05T00:28:26+5:302018-04-05T00:28:26+5:30

कार्यकर्ते घडविण्याकडे अण्णांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यातून त्यांची चळवळच थकू लागली आहे. अण्णा हजारे यांचे दिल्लीतील आंदोलन का फसले? याबाबत त्यांचे समर्थकच प्रचंड अस्वस्थ आहेत. दिल्लीतून आल्यानंतर अण्णांना थकवा जाणवतो आहे. पण, केवळ अण्णांनाच नाही त्यांच्या चळवळीलाच थकवा जाणवू लागला आहे. वेळीच दक्षता न घेतल्यास अण्णांच्या उपस्थितीतच ही चळवळ संपण्याचा धोकाही संभवतो.

Why Anna's agitation was flop ? | अण्णांचे आंदोलन का फसले?

अण्णांचे आंदोलन का फसले?

Next

अण्णा हजारे यांचे दिल्लीतील आंदोलन का फसले? याबाबत त्यांचे समर्थकच प्रचंड अस्वस्थ आहेत. दिल्लीतून आल्यानंतर अण्णांना थकवा जाणवतो आहे. पण, केवळ अण्णांनाच नाही त्यांच्या चळवळीलाच थकवा जाणवू लागला आहे. वेळीच दक्षता न घेतल्यास अण्णांच्या उपस्थितीतच ही चळवळ संपण्याचा धोकाही संभवतो.
दिल्लीतील केजरीवाल आणि त्यांची चमू सोबत आली तेव्हापासून ‘टीम अण्णा’हा शब्द बाजारात आला. तत्पूर्वी महाराष्टÑात खेड्यापाड्यातील कार्यकर्त्यांच्या जोरावर ‘भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन’ या नावाने हे आंदोलन सुरू होते. ते एकटे अण्णा नावाभोवती केंद्रित नसायचे. मीडियाचे ‘बूम’ अण्णांना व त्यांच्या कार्यकर्त्यांनाही तेव्हापर्यंत फारसे परिचित नव्हते. उपोषणस्थळांची रचनाही साधी असायची. तिरंगा हातात घेऊन तो इकडून तिकडे फिरविण्याची सवय तोपर्यंत अण्णांना नव्हती.
केजरीवालांच्या काळात आलेल्या ‘टीम अण्णा’ने आंदोलनाचे तंत्रच बदलविले. नामांकित अवॉर्ड मिळविलेले केजरीवाल यांसारखे मान्यवर, बेदींसारख्या निवृत्त अधिकारी, निवृत्त न्यायाधीश अशा लोकांची अण्णांना या आंदोलनापासून मोठी भुरळ पडू लागली. अण्णांभोवती असे कोंडाळे झाल्याने त्यांचे स्वत:च्या संघटनेकडे व सामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले. जे खरे तर त्यांचे मूळ होते.
‘भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली अण्णांनी राज्यभर संघटन उभे केले होते. या संघटनेच्या जिल्हा, तालुकावार शाखा होत्या. २०१२ मध्ये अण्णांनी या शाखा बरखास्त केल्या. पर्यायाने खाली काम करणारे कार्यकर्तेच उरले नाहीत. शासनाने तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर शासकीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नियुक्त करावी, असा कायदा अण्णांच्या आंदोलनातूनच झाला. या समित्यांवर अण्णांचा एक सदस्य नियुक्त करण्याबाबत नियम आहे. पण, गत चार वर्षांपासून या समित्यांवर अण्णांनी आपले कार्यकर्ते पाठविणेच थांबविले आहे. या समित्यांत आलेल्या तक्रारींवर योग्य कारवाईच होत नाही असा अण्णांचा आक्षेप आहे. यातून घडले असे की येथेही काम करण्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची संधी गेली. या समित्यांच्या गुणवत्तेसाठी लढण्याऐवजी अण्णांनी पळ काढला. कार्यक्रमच नसल्याने अण्णांसोबत जे कार्यकर्ते होते ते दुरावले. त्यामुळे अचानक आंदोलनात कार्यकर्ते कुठून आणायचे? हा प्रश्न यावेळच्या आंदोलनात उभा राहिला. या आंदोलनात अण्णांनी जी कोअर कमिटी नियुक्त केली तिच्याबाबतही आक्षेप होते. दिल्लीतील या समितीचे सदस्य मनींद्र जैन हे अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. महाराष्टÑातील कल्पना इनामदार यांनाही समितीत कोणत्या निकषावर घेतले? ते अण्णांनाच ठाऊक. अण्णा आपल्या जवळच्या मूळ कार्यकर्त्यांना अधिकार व संधी देत नाहीत. दुसरीकडे ‘भूछत्री’ कार्यकर्त्यांवर आंदोलनात अवलंबून राहतात. भ्रष्टाचाराविरोधातील तक्रारी आता राळेगणमध्ये स्वीकारल्या जाणार नाहीत, असाही फलक अण्णांनी लावला आहे. अण्णांचे म्हणणे आहे की मी आता एकटा किती दिवस लढणार? अण्णा एकटे पुरेसे नाहीत हे खरे. पण, आपले उत्तराधिकारीही ते स्वत:च निर्माण होऊ द्यायला तयार नाहीत.
 

Web Title: Why Anna's agitation was flop ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.